कर्नाटकचे मंत्री झमीर अहमद खान यांनी भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आणखी एका नव्या वादाला सुरुवात केली आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्नाटकचे झमीर अहमद खान यांनी आत्मघातकी बॉम्ब घेऊन पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्यास तयार असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील गृहनिर्माण, वक्फ आणि अल्पसंख्याक मंत्री खान यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. “मी हे अनेकदा सांगितले, आम्ही भारतीय आणि हिंदुस्तानी आहोत, आमचा पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही. आम्ही पाकविरुद्ध युद्ध करण्यासही तयार आहोत. मंत्री म्हणून मला युद्ध करायला पाठवले तर मी जाण्यास तयार आहे. मी देशासाठी लढेन”, असे खान यांनी यावेळी म्हटले आहे.

“जर गरज पडली तर मी आत्मघातकी बॉम्ब घेऊन जाईन. मी हे विनोद म्हणून किंवा उत्साहाच्या भरात बोलत नाही. जर देशाला माझी गरज असेल तर पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी मला आत्मघातकी बॉम्ब द्यावा. अल्लाहची शपथ, मी तो बांधून पाकिस्तानात जाईन”, असे धक्कादायक वक्तव्य खान यांनी केले आहे.

खान यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकातील भाजपाचे वरिष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी झमीर यांच्या वक्तव्याला बालिश म्हटले आहे. “लष्करावर विश्वास ठेवा आणि शांत राहा, तेवढंच पुरेसं आहे. तुम्हाला भाषणं देण्याची किंवा तिथे जाण्याची गरज नाही. आपल्या सैनिकांवर आणि गुप्तचर यंत्रणेवर विश्वास ठेवा आणि शांत राहा, हीच तुमची देशासाठी सर्वात मोठी सेवा असेल”, अशी टीका जोशी यांनी खान यांच्यावर केली.

कोण आहेत झमीर अहमद खान?

५८ वर्षीय झमीर हे वाहतूक व्यावसायिक असलेल्या कुटुंबातील आहेत. ते पाच वेळा आमदार होते. त्यांनी जनता दलापासून त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. २००५ मध्ये झमीर यांनी चामराजपेट विधानसभा मतदारसंघातून त्यांची पहिली पोटनिवडणूक लढवली. त्यानंतर जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचे जवळचे सहकारी असलेले झमीर पक्षाचे एक प्रमुख मुस्लीम नेते म्हणून समोर आले. जानेवारी २००६ मध्ये धर्म सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस युती सरकार कोसळले, त्यावेळी कुमारस्वामी यांनी ४२ जेडीएस आमदारांसह पक्षाला रामराम ठोकला, तेव्हा पक्षाच्या आमदारांना लांब ठेवण्यासाठी झमीर यांनी त्यांना एका बसने रिसॉर्टमध्ये नेले होते. २०१८ मध्ये झमीर आणि जेडीएसचे सहा आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यानंतर झमीर यांचे कुमारस्वामी यांच्याशी मतभेद होऊ लागले. काँग्रेसमध्ये असताना झमीर यांचे सिद्धरामय्या यांच्याशी चांगले संबंध तयार झाले. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झमीर यांनी सिद्धरामय्या यांना चामराजपेट मतदारसंघातून निवडणूक लढवायची असल्यास ते ती जागा सोडतील असे म्हटले होते, तेव्हा सिद्धरामय्या मुख्यमंत्रि‍पदी परतल्यावर काँग्रेसने निवडणूक जिंकली.

अनेक वादांच्या केंद्रस्थानी

झमीर हे आतापर्यंत अनेक वादांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. गुंतवणूक एजन्सीने ठेवीदारांना लाभांश देणे बंद केल्यानंतर उघड झालेल्या आय-मॉनेटरी अ‍ॅडव्हायझरी घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने झमीर यांच्या जागांवर छापे टाकले होते. डिसेंबर २०२४ मध्ये ईडीने या घोटाळ्यात झमीर यांच्या कथित सहभागाशी संबंधित बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कर्नाटक लोकायुक्त पोलिसांना अहवाल सादर केला. लोकायुक्त पोलिसांनी याप्रकरणी त्यांची चौकशीही केली आहे. अद्याप हा खटला प्रलंबित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोव्हेंबर २०२४ मध्ये कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या महाधिवक्त्यांना झमीर यांच्या विरोधात तातडीने कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले होते. म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण प्रकरणात सिद्धरामय्या यांच्या पत्नीचा सहभाग असल्याचा आरोप असलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल झमीर यांच्याबाबत हा आदेश देण्यात आला होता.
२०२३ च्या निवडणुकीत झमीर यांनी ७० कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जाहीर केली होती. इतर व्यवसायांसह त्यांचे काही कुटुंबीय श्रीलंकेत कॅसिनोदेखील चालवतात. झमीर यांचे बॉलीवूडमध्येही खास कनेक्शन असल्याचे बोलले जाते. त्यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात संजय दत्त, शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ यांसारखी दिग्गज मंडळी उपस्थित होती.