राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेमुळे प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या यात्रेला ११२ हून जास्त दिवस होऊन गेले आहेत. सध्या ही भारत जोडो यात्रा हरियाणात आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?

२१ व्या शतकातले कौरव कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? २१ व्या शतकातले कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत उपस्थिती लावतात. त्यांच्या हातात लाठी असते. त्यांच्या बाजूने देशातले दोन ते तीन अब्जाधीश या कौरवांच्या बाजूने आहेत असं म्हणत राहुल गांधी यांनी संघावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र

मला सांगा की नोटबंदी कुणी केली? GST चुकीच्या पद्धतीने कुणी अमलात आणला? कुणासाठी या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि कुणाच्या विरोधात केल्या गेल्या हे समजून घ्या. नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने जीएसटीची अमलबजावणी नरेंद्र मोदींनी नाही तर या दोन तीन अब्जाधीशांच्या शक्तीने हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे करायला लावलं. तुम्ही मान्य करा किंवा करू नका असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

संघाबाबत आणखी काय म्हणाले आहेत राहुल गांधी?

संघाच्या लोकांची घोषणा तुम्ही ऐका ते कधीही हर हर महादेव म्हणत नाहीत. कारण भगवान शंकर हे तपस्वी होते. मात्र हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला करत आहेत. त्यांनी जय सीताराम या घोषणेतून सीता मातेला एकदम शिताफीने वगळलं. त्यांनी जय श्रीराम ची घोषणा देऊन दहशत पसरवली. हे लोक भारताच्या संस्कृतीच्या विरोधात काम करत आहेत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केल्यापासून ते सातत्याने संघ आणि भाजपावर टीका करताना दिसत आहेत. वीर सावरकर यांच्यावर त्यांनी टीका केल्याने त्यांची भारत जोडो यात्रा थांबवण्याच्याही मागण्या भाजपाकडून झाल्या होत्या. आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा संघ स्वयंसवेकांची तुलना कौरवांशी केली आहे. तसंच आधुनिक काळातले कौरव हे हाफ पँट घालतात असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधींवर टीका होण्याची आणि त्यांना भाजपाकडून तसंच प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.