Ranjeet Singh Neeta Founder Of Khalistan Zindabad Force : गेल्या काही काळापासून असक्रिय असलेल्या खलिस्तान झिंदाबाद फोर्सने पुन्हा छोटे-छोटे हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान खलिस्तान झिंदाबाद फोर्स (KZF) पंजाबमधील पोलीस चौक्यांवर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यातील तीन आरोपी नुकतेच उत्तर प्रदेशातील पिलिभीतमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या तिघांचा खलिस्तान झिंदाबाद फोर्सच्या कार्यपद्धतीशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. पोलि‍सांनी पुढे सांगितले की, खलिस्तान झिंदाबाद फोर्सकडून हल्ले किंवा कारवाया करण्यासाठी छोट्या-छोट्या गुन्हेगारांच्या नेमणुका केल्या जातात. यासाठी त्यांनी नेमलेले लोक किरकोळ गुन्हेगार असतात ज्यांना फोनवरून काय कारायचे हे सांगितले जाते.

कोण आहे खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा संस्थापक?

रणजीत सिंह नीता याने १९९० च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद कमी असताना खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना केली होती. नीता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला ट्रक ड्रायव्हर होता. कारवाईपासून वाचण्यासाठी तो पाकिस्तानला पळून गेला होता आणि तिथेच त्याने खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना केली होती. असे असले तरी नीतावर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झाले नाहीत. परदेशात स्थायिक झालेला रणजीत सिंह नीता भारताला हव्या असलेल्या २० प्रमुख आरोपींपैकी एक आहे. सध्या नीताचे वय ६५ च्या आसपास असून, तो गंभीर आजारांनी त्रस्त आहे.

रणजीत सिंह नीता त्यावेळी पत्नी चरणजीत कौरसह पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्थायिक झाला होता. त्यानंतर काही काळातच तो खलिस्तान चळवळीकडे वळला. पण पाकिस्तानात असलेल्या परमजीत सिंह पंजवार आणि वाधवा सिंह बब्बर यांसारख्या खलिस्तानी दहशतवाद्यांबरोबर काम करण्याऐवजी त्याने खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना केली. यासाठी त्याने जम्मू आणि पंजाब दरम्यान ट्रक चालवताना पाकिस्तान स्थित तस्कर नेटवर्कशी जवळीक साधली होती. पंजाब पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, इतक्या वर्षांनंतरही नीता तस्कर आणि गुंडांच्या त्याच नेटवर्कद्वारे काम करत आहे.

जम्मूमध्ये हल्ले आणि शस्त्रांची तस्करी

पाकिस्तानमध्ये स्थायिक झाल्यानंतर नीताने १९८८ ते १९९९ या कालावधीत जम्मू आणि पठाणकोट दरम्यान धावणाऱ्या ट्रेन्स आणि बसमध्ये बॉम्बस्फोटांच्या घटना घडवल्या. ऑक्टोबर २०२१ मध्ये, जम्मूच्या कठुआ येथे पोलीस उपअधीक्षक देविंदर शर्मा यांच्या हत्येसाठी नीतावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रणजीत सिंह नीताने २०१९ मध्ये ड्रोनचा वापर करत शस्त्रास्त्रांची पहिली खेप भारतात आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अमृतसर स्पेशल ऑपरेशन्स सेलने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, नीतावर भारतात शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके आणि बनावट चलनाची तस्करी करण्यासाठी जर्मन स्थित गुरमीत सिंग उर्फ बग्गा याच्याशी संगनमत करून काम केल्याचा आरोप आहे.

अलीकडच्या काळात झालेल्या अनेक छोट्या हल्ल्यांमागे खलिस्तान झिंदाबादचा हात असल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात शिवसेना नेते हरकिरत सिंह खुराना यांच्या घरावर झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी खलिस्तान झिंदाबाद फोर्सने स्वीकारली होती. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नव्हते.

हे ही वाचा : नागरिकांच्या गोपनीयतेला ‘सर्वोच्च’ स्थान, आरोपींचा मोबाइल किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी

धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल

दरम्यान पीलीभीत चकमकीत ठार झालेले तिघे खलिस्तान झिंदाबादच्या संपर्कात कसे आले याचा तपास पोलीस करत आहेत. सूत्रांनुसार, चकमकीत ठार झालेल्या तिघांपैकी एकजण खलिस्तान झिंदाबाद फोर्सशी संबंधित असलेल्या काही दहशतवाद्यांच्या संपर्कातील असू शकतो. ही चकमक झाल्यापासून, नीताचे कथित रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांना तो धमकी देत ​​आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khalistan zindabad force the militant group linked to punjab attacks aam