लोकसभा निवडणूक २०२४ ला काही दिवस बाकी असताना भाजपाने सलग तिसर्यांदा सत्ता मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळी भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) रोखण्यासाठी २८ विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या एनडीए आणि इंडिया आघाडीची लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभेत नेमकी किती ताकद आहे याचा हा आढावा…
लोकसभा
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर ३०३ जागांसह बहुमत मिळवले. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाला २८२ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपाला हिंदी भाषिक राज्यांमध्ये चांगलं यश मिळालं. इतकंच नाही, ईशान्येतही सर्वाधिक जागा मिळवल्या. दक्षिण भारतात मात्र ते केवळ कर्नाटकपुरते मर्यादित राहिले. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या.
सध्याच्या आघाड्यांचा विचार केला, तर २०१९ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे ३३२ खासदार होते आणि इंडिया आघाडीच्या सध्याच्या २८ पक्षांचे मिळून १४४ खासदार होते. २०१९ नंतर एनडीएतील मित्रपक्षांची संख्या बदलली आहे. कारण एआयएडीएमके, जेडीयू आणि अकाली दलासारख्या प्रादेशिक पक्षांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
लोकसभेत एकूण ५४३ सदस्य आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत ३१९ खासदार एनडीएचे, तर १३९ खासदार इंडिया आघाडीचे आहेत. मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला, तर सध्या एनडीएत असलेल्या पक्षांना २०१९ लोकसभा निवडणुकीत एकूण ४० टक्के मतं मिळाली होती. दुसरीकडे सध्या इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांना एकूण ३५ टक्के मतं मिळाली होती.
एनडीएच्या एकूण खासदारांपैकी २९० खासदार भाजपाचे आहेत. त्यापैकी किमान १२ खासदारांनी अलीकडील विधानसभा निवडणुका लढण्यासाठी खासदारकी सोडली. सध्या एनडीएचा सर्वात मोठा भागीदार शिवसेना (शिंदे गट) आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात सध्या १३ खासदार आहेत.
इंडिया आघाडीत सर्वाधिक ४८ खासदार काँग्रेसचे आहेत. डीएमकेचे २४ खासदार, तृणमूल काँग्रेसचे २२ खासदार आणि जेडीयूचे १६ खासदार आहेत.
राज्यसभा
राज्यसभेतही भाजपा आणि काँग्रेस हेच आपापल्या आघाडीतील सर्वात मोठे पक्ष आहेत. एनडीएतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाचे राज्यसभेत ९३ खासदार आहेत, तर इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे राज्यसभेत ३० खासदार आहेत. २३८ जागांपैकी सध्या राज्यसभेत एनडीएकडे १०४ खासदारांचं बळ आहे, तर इंडिया आघाडीकडे ९४ खासदार आहेत.
राज्यसभेत भाजपाचा सर्वात मोठा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आहे. अजित पवार गटात राज्यसभेचे ३ खासदार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचा राज्यसभेतील सर्वात मोठा मित्रपत्र तृणमूल काँग्रेस आहे. तृणमूलचे राज्यसभेत १३ खासदार आहेत, तर आप आणि डीएमकेचे प्रत्येकी १० खासदार आहेत.
२०२३ मध्ये १० नवीन राज्यसभा सदस्य निवडून आले. त्यापैकी भाजपाचे ५ आहे, तर तृणमूलचे ५ खासदार आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक झाल्यावर जुलै आणि ऑगस्टमध् राज्यसभेचे नवे ६५ खासदार निवडले जातील. निवडणूक होणाऱ्या या ६५ जागांपैकी सध्या भाजपाकडे २९, काँग्रेसकडे ११, टीएमसीकडे ४, आप, सपा आणि भारत राष्ट्र समितीकडे (बीआरएस) प्रत्येकी तीन आणि बीजेडी, जेडी(यू) व आरजेडीकडे प्रत्येकी दोन जागा आहेत.
विविध राज्यांमध्ये कुणाची किती ताकद?
या वर्षी ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यापैकी ५ राज्यांमध्ये सरकार बदललं. त्यातील ४ राज्यांमध्ये भाजपाने विजय मिळवला, तर काँग्रेसने २ राज्यांमध्ये विजय मिळवला. उरलेल्या तीन राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी विजय मिळवला.
भाजपाने मध्य प्रदेशात पुन्हा दणदणीत विजय मिळवला आणि राजस्थान व छत्तीसगढमध्ये काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळवली. यासह आता देशभरात एनडीएची १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्ता आली. इंडिया आघाडी देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्तेत आहे. आंध्र प्रदेशात सत्तेत असलेला वायएसआर काँग्रेस आणि ओडिशात सत्तेत असलेला बिजु जनता दल पक्ष एनडीए किंवा इंडिया आघाडीचा भाग नाहीत.
आमदारांच्या संख्येचा विचार केला तर इंडिया आघाडीचे सर्वाधिक आमदार पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये एनडीएचे वर्चस्व आहे. २०२४ मध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांबरोबरच होतील. त्यानंतर या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र, हरियाणा, आणि झारखंडमधील विधानसभांच्या निवडणुकाही होणार आहेत.
महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंडमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीत थेट लढत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वातील एनडीचं सरकार आहे. येथे एनडीएचे २८८ पैकी १८९ आमदार आहेत, तर इंडिया आघाडीचे ८१ आमदार आहेत. हरियाणाच्या ९० सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी एनडीएकडे ५२ आमदार आहेत आणि काँग्रेसचे ३२ आमदार आहेत. झारखंडमध्ये ८१ आमदारांच्या विधानसभेत इंडिया आघाडीचे ४८ आमदार आहेत, तर एनडीएकडे केवळ २९ आमदार आहेत.