कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला धूळ चारली. या निवडणुकीत १३५ जागांवर विजय मिळवून काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला. तर भाजपाला अवघ्या ६६ जागांवर विजय मिळवता आला. दरम्यान, काँग्रेसच्या या विजयासाठी अनेकांनी अथक परिश्रम घेतले. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार तसेच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला ही कामगिरी करता आली. यासह अनेक अदृश्य चेहऱ्यांनीही प्रचंड मेहनत घेतली आहे. शशिकांत सेंथिल हे हेदेखील यापैकीच एक नाव.

शशिकांत सेंथिल माजी आयएएस अधिकारी

शशिकांत सेंथिल हे माजी आयएएस अधिकारी आहेत. ४४ वर्षीय सेंथिल यांनी काँग्रेसच्या बंगळुरूमध्ये असलेल्या वॉर रुमचे नेतृत्व केले. बसवराज बोम्मई सरकारची ‘४० टक्के कमिशन मागणारे सरकार’ अशी प्रतिमा निर्माण करण्यात सेंथिल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी काँग्रेसने कर्नाटकात ‘PayCM’ ही मोहीम राबवली. ही कल्पना सेंथिल यांच्याच डोक्यातून आली होती. त्यांनी या मोहिमेंतर्गत क्यूआर कोडसोबत बोम्मई यांचा चेहरा लावला होता. संपूर्ण बंगळुरुमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले होते. असेच पोस्टर तेलंगणामधील हैदराबादमध्येही लावण्यात आले होते.

हेही वाचा >> डी. के. शिवकुमार की सिद्धरामय्या? कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण? जाणून घ्या कोणाचे पारडे जड

नोकरीचा दिला राजीनामा

सेंथिल हे २००९ च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपायुक्त असताना सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. आगामी काळात आपल्या देशाच्या मूलभूत तत्वांसमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे, असे मला वाटते. त्यामुळे सर्वांचे आयुष्य सुकर करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेच्या बाहेर पडले पाहिजे असे मला वाटते. प्रशासकीय सेवेच्या बाहेर पडून काम करायला हवे, असे मला वाटते; असे शशिकांत सेंथिल राजीनामा देताना म्हणाले होते.

सेंथिल मोदी सरकारचे विरोधक

शशिकांत सेंथिल हे समाजवादी विचाराचे आहेत. ते उजव्या विचारसरणीचा विरोध करतात. ते नरेंद्र मोदी सरकारचे टीकाकार आहेत. याच कारणामुळे त्यांनी सीएए, एनआरसी कायद्याला विरोध केला होता. या कायद्याला विरोध होत असताना त्यांनी देशभर फिरून आंदोलन केले होते. या काळात त्यांनी लोकांशी तसेच आंदोलकाशी संवाद साधला होता. पुढे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे ठरवले.

हेही वाचा >> Karnataka : भाजपा आमदाराचा पराभव होताच अल्पसंख्याकांना दिली धमकी; प्रीथम गौडा म्हणाले, “आता त्यांचा देवच त्यांना…”

तामिळनाडूमध्ये काँग्रेस पक्षासाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले

शशिकांत सेंथिल हे मूळचे तामिळनाडू राज्यातील आहेत. त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी तामिळनाडू काँग्रेसचे वरिष्ठ नेते केएस अलगिरी तसेच काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश गुंडू राव उपस्थित होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सेंथिल यांनी २०२१ सालच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत चेन्नई येथील वॉर रुममध्ये पक्षासाठी काम केले. त्यांच्या कामाने काँग्रेसमधील वरिष्ठ नेते प्रभावित झाले. त्यानंतर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये असताना सेंथिल यांच्यावर राहुल गांधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील, हे पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. ही जबाबदारीही त्यांनी नेटाने पार पडली. याच काळात त्यांची राहुल गांधी यांच्याशी जवळीक वाढली.

सेंथिल यांनी राजकीय नेत्यावर केली कारवाई

सेंथिल हे मोदी तसेच भाजपाच्या विचारसरणीचा विरोध करतात. तरीदेखील प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी जून २०१७ ते सप्टेंबर २०१९ या काळात दक्षिण कन्नड हा संवेदनशील जिल्हा उत्तमरित्या सांभाळला. त्यांच्या कामाची अनेक भाजपा नेत्यांनी प्रशंसा केली. त्यांनी या काळात वाळूची तस्करी करणारे तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यावर कारवाई केली. या भागात पुरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी उल्लेखनीय काम केले. परिणामी ते सामान्य लोकांमध्ये तसेच मुलांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते.

हेही वाचा >> कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर ममता बॅनर्जींचा सूर बदलला; काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत केले मोठे भाष्य

सेंथिल यांच्याकडे होती ५० जणांची टीम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने त्यांच्यावर कर्नाटकमधील वॉर रुमच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. सेंथिल यांच्यासोबत अन्य ५० जण काम करत होते. मात्र या काळात त्यांनी अहोरात्र मेहनत केली. याबाबत सेंथिल यांच्या जवळच्या एका व्यक्तीने याबाबत सविस्तर सांगितले आहे. “सेंथिल आणि त्यांच्या चमूने रात्रंदिवस काम केले. कर्नाटकच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी रणनीती आखली. ४० टक्के कमिशन मागणारे सरकार ही मोहीमही त्यापैकीच एक होती. सेंथिल यांच्या टीमने एक अजेंडा सेट करण्यासाठी तसेच लोकांचे भाजपाविरोधी मत तयार व्हावे यासाठी न थकता काम केले,” असे या सहकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> निष्ठावंतांना डावलल्यानेच कर्नाटकात पराभव, भाजप आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

सेंथिल यांच्याकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचीही जबाबदारी येणार का?

दरम्यान, कर्नाटकच्या निवडणुकीसाठी सेंथिल यांच्यासोबत ५० जण काम करत होते. यातील काही लोक हे चेन्नई आणि नागपूर येथून आले होते. या टीमने काँग्रेसची निवेदने प्रकाशित करणे तसेच रॅली आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे काम केले. कर्नाटकची निवडणूक संपली आहे. त्यामुळे आता ते परत तामिळनाडूमध्ये गेले आहेत. सेंथिल यांची कर्नाटकमधील कामगिरी पाहता काँग्रेस त्यांच्यावर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचीही जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे.