Kumar Ketkar on Gandhi-Sawarkar Controversy : अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची २ ऑक्टोबर २०२५ रोजी १५६ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने ‘प्राईम टाईम महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीने ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक कुमार केतकर यांची मुलाखत घेतली. महात्मा गांधी यांनी मांडलेले विचार मागे पडून देशात नथुराम प्रवृत्ती वाढतेय का? या विषयावर आधारित ही मुलाखत होती. या मुलाखतीत कुमार केतकर नेमके काय म्हणाले? त्याबाबत जाणून घेऊ…

कुमार केतकर म्हणाले, “फक्त आपल्या देशाला नव्हे तर संपूर्ण जगालाच आज गांधी विचाराची गरज आहे आणि आपल्यापेक्षाही जगाने ही गरज जास्त प्रमाणात जाणली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास नेल्सन मंडेला यांनी २८ वर्षे तुरुंगात काढली. तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला महात्मा गांधी यांच्याकडूनच ताकद आणि प्रेरणा मिळाल्याचे सांगितले होते. बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्यावर मार्टिन ल्यूथर किंग आणि महात्मा गांधी यांचे संस्कार असल्याचे मान्य केले होते. गाझामधील नरसंहार आज जग मुकाट्याने पाहत आहे. महात्मा गांधी जर आज असते तर हे युद्ध झालं नसतं किंवा त्याला आटोक्यात ठेवता आलं असतं, असं मत युरोपिन युनियनमधील काही लोकांनी त्यांच्याकडील चर्चेदरम्यान मांडलेलं आहे.”

कुमार केतकर पुढे म्हणाले, “गांधी विचाराची गरज आज जगाने ओळखली आहे. भारतामध्ये मात्र प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या काहींना महात्मा गांधी देशद्रोही आणि नथुराम गोडसे हे खरे देशभक्त वाटतात. उत्तर प्रदेशातील एका विशिष्ट गांधीविरोधी कार्यकर्त्याने गांधीजींचा पुतळा उभारला आणि त्यावरती गोळ्या झाडून तो पुतळा पाडला. अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्याकडे वाढत असून त्याला काही माध्यमांकडून उत्तेजन मिळते आहे. समाजामध्ये अजूनही मूळात गांधी विचारच रुजलेला आहे. परंतु, तो पुसून टाकण्यासाठी व्यापक पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. दुर्दैवाने सरकार त्याबद्दल काही बोलत नाही आणि तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्नही करीत नाही.”

आणखी वाचा : Chirag Paswan : भाजपाने चिराग पासवान यांना झुकतं माप का दिलं? बिहारमधील मतांचे समीकरण काय?

“रामाने रावणाचा तर नथुरामाने गांधीजींचा वध केला अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा आहे, त्यामुळे असा भ्रम होईल की गांधीजींचा विचार पाठीमागे चालला आहे. मात्र, तसे अजिबात नाही. लोकांमध्ये हा विचार इतका रुजलेला आहे की तो तिथून पुसला जाणे शक्य नाही”, असेही कुमार केतकर यांनी म्हटले आहे. दरम्यान गांधी विचार, सावरकरी विचार आणि आंबेडकरी विचार यांची दिशा एकच आणि विचार वेगवेगळे होते का? असा प्रश्न केतकर यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “सावरकरी विचार आणि गांधी विचारांची दिशा एक असूच शकत नाही. त्याचप्रमाणे आंबेडकरी विचार आणि गांधी विचार यांच्यातही खऱ्या अर्थाने एकच दिशा असू शकत नाही; कारण गांधी विचार हा सर्वार्थाने वैश्विक विचार असून तो फक्त भारतापुरता मर्यादित नाही”, असे केतकर यांनी स्पष्ट केलं.

“गांधी यांचा वैश्विक विचार असल्याचं विश्वानेच मान्य केलं आहे. तसं सावरकरी विचार मान्य केल्याचं तुम्हाला दिसणार नाही. गांधीजींना विचारलं, तुमचा धर्म कोणता? तर ते प्रत्यक्षात म्हणायचे, ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान… ‘ महात्मा गांधी हे कधीही कोणत्याही मंदिरात गेल्याचे पुरावे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यांचा मंदिरातील पूजेचा किंवा प्रार्थनेचा एकही फोटो दिसणार नाही, तरीसुद्धा मंदिरात दलितांना प्रवेश मिळण्याच्या मागणीवर त्यांनी पाठिंबा दिला होता. याचाच अर्थ ते सर्वधर्म समभाव होते. आता तशी वृत्ती लोकांची राहिली नसून ‘ईश्वर अल्लाह’ यामधील अल्लाह हे नाव काढून टाका, अशी मागणी काहींनी केली आहे.”

हेही वाचा : Shiv Sena-MNS Alliance : मुंबईतील २२७ पैकी ‘इतक्या’ प्रभागांमध्ये मनसेचा दरारा; ठाकरे बंधूंची युती झाल्यास कुणाला फटका?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने सावरकरांच्या माफीनाम्याचा उल्लेख करतात. त्यानंतर सावरकरवादी आणि गांधीवादी यांच्यात एक वादंग उठतो. तुम्ही या दोन्ही भूमिकांकडे कसे पाहता? असा प्रश्न कुमार केतकर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “मूळात मी सावरकरांची भूमिका मानत नाही, कारण भूमिकेमध्ये काहीतरी विचार किंवा तत्वज्ञान असायला हवे. हिंदू राष्ट्राच्या तत्वज्ञानामध्ये इतर धर्मांच्या लोकांना स्थान नाही. जर खरोखरच हिंदू राष्ट्र झालं तर मिझोराम आणि काश्मीर वेगळा पडेल, कारण तिथे अनुक्रमे ख्रिस्ती आणि मुस्लीम समुदायाचे लोक आहेत. सावरकरांनी देशाचा धर्माच्या आधारे विचार केला होता, मात्र गांधीजींना तो मान्य नव्हता आणि आजही अनेकांना तो मान्य होणार नाही”, असे कुमार केतकर म्हणाले.

स्वातंत्र्य चळवळीतलं सावरकरांचं योगदान आपण मानत नाही का? असा प्रश्न विचारला असता, “मी त्यांच्या योगदानाबद्दल काहीच बोलत नाही. ते १९१० पासून १९२४ पर्यंत तुरुंगातच होते. त्यांना जन्मठेप झाली होती आणि त्यांच्या दृष्टीने ती स्वातंत्र्य चळवळीतील लढ्यासाठी होती. मुख्य मुद्दा त्यांच्या तुरुंगात जाण्याचा नाही तर विचारांचा आहे. ते हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी तुरुंगात गेले असतील तर आम्ही त्यांच्या त्यागाला ‘सॅल्यूट’ करू, पण विचाराला नाही”, असे केतकर यांनी म्हटले. आताचा प्रश्न फक्त विचाराचा असून त्यातून भूमिका ठरतात, त्यामुळे गांधी आणि सावरकर यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही, असेही केतकर म्हणाले.