रविवारी काँग्रेसने दिल्लीमधील शीखबहुल भागात जनसभा आयोजित केली होती. १९८४ नंतर प्रथमच काँग्रेसने अशा प्रकारची सभा घेतली. तसेच अशा अनेक सभा घेण्याची काँगेसची योजना आहे. काँग्रेस शीख मतदारांना पुन्हा एकत्र आणू शकेल का? काँग्रेसच्या या सभांचा आगामी निवडणुकांवर कोणता परिणाम होईल, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी ‘इंडिया’ हे गठबंधन केले आहेच, तसे काँग्रेसनेही स्वतः पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी पश्चिम दिल्ली या शीखबहुल भागामध्ये काँग्रेसने सभा आयोजित केली. १९८४ नंतर प्रथमच काँग्रेसने या भागात मोठी जनसभा घेण्याचे धाडस केले. पारंपरिक मतदारांसह नवीन मतदार मिळावेत, हाच याचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा : मिझोराममध्ये महिला आमदार का नाहीत?

“गुरु गोविंद सिंगजी का सिख हूं, काँग्रेस का सिपाही हूं, डरनेवाले दिल से पैदा नहीं हुआ हूं” म्हणजेच मी गुरू गोविंद सिंगजींचा शीख, काँग्रेसचा सैनिक आहे; मी घाबरणाऱ्या मनाचा नाही आहे, अशी घोषणा दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी रविवारी शीखबहुल पश्चिम दिल्ली येथील मोठ्या जाहीर सभेत केली. १९८४ नंतर झालेल्या शीखविरोधी आंदोलनानंतर शीख लोकांसह सभा आयोजित करण्यात आली नव्हती. काँग्रेस आणि शीख समूह यांचा संपर्क जणू तुटलाच होता, असे अनेक शीख लोकही मान्य करतील. अरविंदर सिंग लवली यांना दिल्लीचा सरदार असे घोषित करत शीखांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या सभांसाठी त्यांना प्रमुख करण्यात आले. शीख आणि निर्वासित पंजाबी लोक यांची वस्ती असणाऱ्या टिळकनगर वस्तीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. रविवारपर्यंत काँग्रेसच्या पश्चिम दिल्लीमधील मतदारसंघात झालेल्या सभांना शेकडो लोक उपस्थित होते. या सभांना नव्याने सामील झालेले समर्थकही उपस्थित होते.

हेही वाचा : मोईत्रा यांच्या प्रकरणामध्ये भाजपाचा पक्षपातीपणा; दानिश अली यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

या सभांमध्ये काँग्रेसने केंद्र सरकार, भाजपा, आम आदमी पार्टी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. दिवंगत शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दिल्लीचा विकास केला होता, हे नमूद करतानाच शीख आणि काँग्रेस यांच्यामध्ये असणाऱ्या संबंधांची आठवण करून दिली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येपूर्वी शीख समूह काँग्रेसच्या ‘प्रतिज्ञा रॅली’चा मुख्य भाग होते, हेही लवली यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाचे आमदार जर्नेल सिंग यांच्या दिल्ली येथील कार्यालयापासून काही मीटर अंतरावर झालेल्या बैठकीत लवली म्हणाले, “दिल्लीच्या जनतेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमधील सातही लोकसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव करण्याची प्रतिज्ञा केली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्या काळात झालेला दिल्लीचा विकास आता आठवत आहे. शीलाजींनी १५ वर्षांच्या काळात विकासाभिमुख कारभार केला होता.

आता लोकांना विकास हवा आहे. द्वेषाचे किंवा भेदभावाचे राजकारण नको आहे. भाजपाने लोकांना एकमेकांच्या विरोधातच उभे केले. १५ वर्षे भाजपाची दिल्ली नगर निगम (एमसीडी) सत्ता होती. आता ‘आप’ची आहे. दिल्ली नगर निगम (एमसीडी) मध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, दिल्लीकरांची लूट होत आहे”, असे शीला दीक्षित यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेते लवली म्हणाले.

त्यांनी गुरू ग्रंथ साहिब आणि प्रभू श्रीराम यांची काही उदाहरणे सांगून भाजपाच्या धार्मिक विभाजनावर निशाणा साधला. ”’गुरु ग्रंथ साहिब’मध्ये म्हटले आहे, ‘अव्वल अल्लाह नूर उपया, कुदरत के सब बंदे । म्हणजेच प्रथम अल्लाहने प्रकाश निर्माण केला; नंतर त्याने सर्व नश्वर प्राणी निर्माण केले.’ आज (रविवार, दि. २२ ऑक्टोबर) अष्टमी आहे, परवा (मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर) आपण सर्व मिळून दसरा साजरा करू.

प्रभू रामाच्या चौपाईमध्ये लिहिले आहे की, ‘निर्मल मनुष्य जन सो मोहि पवा, मोहि कपट छल छिद्र न भव म्हणजेच ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे तेच देवाला प्राप्त करू शकतात”, ही उदाहरणे सांगून लवली पुढे म्हणाले की, ”प्रभू राम स्वतः भाजपाला भेटतील आणि म्हणतील की, तुम्ही या निवडणुकीसाठी पात्र नाही आहात.”

काँग्रेसमधील एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार ”काँग्रेसने आयोजित केलेल्या या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या भागात आधी सभा आयोजित केल्या होत्या, तेव्हा आम्ही वाहनव्यवस्थाही केली होती. परंतु, लोकांनी या सभांकडे पाठ फिरवली. आजच्या सभांसाठी आमच्याकडून कोणतेही वाहन नव्हते, तरीही मतियाला आणि नजफगढपासूनचे समर्थक आले होते.”
पुढील वर्षीच्या लोकसभा आणि २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने ‘आप’ पक्षावर हल्ला केला. दिल्लीचा विकास करण्याच्या उद्दिष्टाने, दिल्लीमध्ये स्वतःचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठीचे माध्यम म्हणून पश्चिम दिल्लीतील या सभा आहेत. शीख आणि काँग्रेस यांचे आंतरसंबंध जागृत करणे हे महत्त्वाचे आहे.
१९८४ ला झालेल्या शीख दंगलीनंतर दक्षिण दिल्ली भाजपाचा बालेकिल्ला बनले. रविवारी ही सभा होण्याआधी माजी आमदार मुकेश शर्मा यांनी बैठका घेऊन अनेक शीख कुटुंबांशी संपर्क साधला. ते सर्व आज या सभांना आलेले दिसत आहेत”, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

‘आप’ आणि काँग्रेस हे भाजपाविरुद्ध असणाऱ्या ‘इंडिया’ या महागठबंधनात सहभागी आहेत. मग काँग्रेस ‘आप’ पक्षाला विरोध का करत आहे, या प्रश्नावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की,” ‘इंडिया’मध्ये सर्व भाजपा विरोधी पक्ष सहभागी आहेत. राजकीय पक्ष, आघाड्या यांचा यामध्ये सहभाग आहे. पण, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ येथे काँग्रेस आणि ‘आप’ एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी काँग्रेस आणि आप यांच्यात युतीची कोणतीही घोषणा होत नाही, तोपर्यंत ते आपापल्या राजकीय धोरणांनुसार प्रचार करतील.”
आपल्या भाषणात मुकेश शर्मा यांनी लवली यांचा उल्लेख ‘दिल्ली का सरदार’ असा केला. त्यांनी शीख आणि पंजाबी समुदायाला संबोधित करताना काँग्रेस आणि शीख-पंजाबशी असणारे संबंध सांगितले. तसेच, दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी निर्वासितांसाठी केलेल्या कार्याबद्दल सांगितले. दिल्लीच्या सीमेवर गुरु तेग बहादूर स्मारक कोणी बनवले आहे, तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित आणि अरविंदर लवली यांनी निर्माण केले. दिल्लीत पंजाबीला द्वितीय क्रमांकाच्या भाषेचा दर्जा कोणी दिला, तर तो आम्ही दिला”, असेही शर्मा यांनी सांगितले. सुभाष चोप्रा यांनी सभेमध्ये सांगितले की, ”पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना भारतामध्ये स्थायिक होण्यास काँग्रेसने मदत केली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द इंडियन एक्सप्रेसने आधी दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही वर्षांमध्ये काँग्रेसचा दिल्लीमधील निवडणुकांमध्ये पराभव होत असून ‘आप’चेही कोणतेही राजकीय सहकार्य नाहीये. काँग्रेस दिल्लीच्या प्रत्येक भागामध्ये सभा घेण्याचा विचार करत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक आठवड्यात शक्तिप्रदर्शन करण्यात येईल. यासंबंधीची पहिली बैठक गेल्या आठवड्यात बवाना येथे झाली होती आणि पुढची बैठक ईशान्य दिल्लीतील मुस्तफाबाद येथे होईल. मुस्तफाबादचे २०२० मध्ये दिल्ली येथे झालेल्या दंगलीत सर्वात जास्त नुकसान झाले होते. तिथे रविवारी बैठक घेण्यात येईल.