चंद्रशेखर बोबडे

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाला पाठिंबा देणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांंनी आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणातच उडी घेण्याची घोषणा केली असून त्यासाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्ष बांधणीसाठीराव यांनी तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या विदर्भातील काही जिल्ह्यांवर यांनी लक्ष केंद्रीत केले असले तरी त्यांच्यासोबत जुळणाऱ्या नेत्यांमध्ये जनसमर्थन गमावलेल्या या नेत्यांचा भरणा असल्याने त्यांच्या जोरावर चंद्रशेखर राव राज्यातील सत्ताधारी भाजपपुेढे कसे आव्हान उभे करणार आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष (भारत राष्ट्र समिती) वाढवण्याची आणि महाराष्ट्रातील निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. पक्ष बांधणीसाठी केसीआर यांनी नांदेडमध्ये पहिलं महाअधिवेशन घेण्याचं नियोजन केलं आहे. त्यानंतर राज्यातील विदर्भासह इतरही भागांमध्ये ते जाणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी तेलंगणातील एमआयएमनंही नांदेडमधूनच महाराष्ट्रात प्रवेश केला होता. त्यानंतर आता राव यांचा पक्ष देखील नांदेडमार्गेच महाराष्ट्रात प्रवेश करीत असल्याने त्याची राज्याच्या राजकारणात चर्चा आहे. राजकीय मोर्चेबांधणीसाठी केसीआर यांनी महाराष्ट्रातील तेलंगणालगतच्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले असून त्यात पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांचाही समावेश आहे. त्याभागातील इतर प्रमुख राजकीय पक्षातील नेते गळाला लागतात का याची चाचपणी केली जात आहे. विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम हे केसीआर यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. नागपूरमध्ये शिवसेना ते काँग्रेस असा प्रवास करणारे ज्ञानेश वाकुडकरही भारत राष्ट्र समितीशी जुळले आहे. याशिवाय स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनात अनेक वर्ष सक्रिय असणारे अहमद कादर हे सुद्धा राव यांच्यासोबत जात आहेत. या सर्वांचा अधिकृत पक्ष प्रवेश नांदेड येथील सभेत होण्याची शक्यता आहे. इतर राजकीय पक्षांच्याच्या नेत्यांवरही भारत राष्ट्र समितीचे लक्ष आहे. मात्र ही सर्व नेमंडळी एक तर राजकारणापासून दूर गेलेली, जनसमर्थन गमावलेली व ते सध्या ज्या पक्षात आहेत तेथे नकोशी झालेली आहेत.

हेही वाचा… प्रणिती शिंदे यांच्यापुढे पक्ष बांधणीचे आव्हान

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या राज्यातील काही लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील तेलगू भाषिक मतदारांवर राव यांचा डोळा आहे. महाराष्ट्रातील तेलगू भाषिकांसह स्थानिक नेत्यांच्या मदतीने दलित आणि ओबीसी समाजाला सोबत घेण्याचा राव यांचा प्रयत्न आहे. अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम यांचा राव यांच्या पक्षात होत असलेला प्रवेशाकडे याच अनुषंगाने बघितले जात आहे. अहेरीचा बराचसा भाग तेलंगणाला लागून असून तेथे बहुसंख्य तेलगू भाषिक आहेत. हे येथे उल्लेखनीय. ज्ञानेश वाकुडकर यांचा राजकारणातील प्रवेश शिवसेनेच्या माध्यमातून झाला. पूर्व नागपूरमधून त्यांनी निवडणुकाही लढवली होती. पण नंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांचा राजकारणाशी संबंध कमी झाला. त्यामुळे या नेत्यांचा राव यांच्या पक्षाला किती फायदा होईल हे सांगणे अवघड आहे. राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आव्हाण द्यायचे असेल तर भक्कम जनसमर्थन असणारा नेत्याची गरज राव यांच्या पक्षाला लागणार आहे. मात्र सध्या तरी असे एकही नाव पुढे येताना दिसत नाही.

हेही वाचा… सांगली : तासगाव-कवठेमहांकाळमध्ये तिहेरी संघर्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे त्यांचा भारत राष्ट्र समितीला नागपूरमध्ये पक्ष बांधणीसाठी कितपत लाभ होईल याबाबत साशंकताच आहे. दुसरीकडे काँग्रेसमधील काही माजी खासदार राव यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री म्हणून तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांचा प्रचार राज्यातील २०० विधानसभा मतदारसंघात केला जाणार असल्याचे ज्ञानेश वाकुडकर यांनी सांगितले.