एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उत्तर-मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ भाजप खासदार पूनम महाजन यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत सर केला. त्या आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवून विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण यंदाची लढाई सोपी नसून त्यांना पक्षांतर्गत आणि मतदारसंघातील आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेलच, पण उमेदवारी मिळविण्यासाठीही लढावे लागणार आहे.

कोणत्याही नेत्याची लढण्याची तयारी नसल्याने पूनम महाजन यांना २०१४ मध्ये उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. महाजन यांनी मोदी लाटेत पहिल्यांदा विजय मिळविला. त्यानंतर नवीन खासदार असल्याने त्यांनी मतदारसंघात अनेक कामे केली आणि उपक्रम राबविले. राज्यात त्याकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने महाजन यांना जम बसविणे सोपे गेले. महाजन यांना २०१४ मध्ये एक लाख ८६ हजार मतांनी विजय मिळाला होता. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता असूनही महाजन यांना २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळविताना त्रास झाला आणि त्यांचे मताधिक्य घटून एक लाख ३० हजार मतांनी विजय मिळाला. भाजप-शिवसेना युती असूनही त्यांचे मताधिक्य घटले होते.

हेही वाचा : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचे अखिलेश यादवांना आमंत्रण नाही? उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय?

या निवडणुकीत भाजपला विजय मिळविण्यासाठी मुंबईतील सर्वात कठीण मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी महाजन यांना खात्री वाटत असली तरी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना उमेदवारी देण्याचीही चाचपणी सुरु आहे. आपल्याला राजकारणात रस नाही, असे दीक्षीत यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगितले जाते. मोदी यांनी महिला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला असल्याने महाजन यांचे तिकीट कापले जाणार नाही, असे वाटत असले तरी तसे झाल्यास शक्यतो महिला उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने दीक्षीत यांच्या नावाचा विचार करण्यात येत आहे. या मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांची संख्या सुमारे सहा-साडेसहा लाखांच्या घरात असून ही भाजपची डोकेदुखी आहे. अयोध्येतील राममंदिराचा मुद्द्याचा भाजपकडून राजकीय वापर होत असल्याने या मतदारसंघात मुस्लिम-ख्रिश्चन यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर भाजपविरोधी मतदान नोंदविले जाण्याची शक्यता यंदा अधिक वाटत आहे. महाजन यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिले नसल्याची आणि कामे न केल्याची नागरिक व पक्षाच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. गणेशोत्सव, नवरात्री आणि काही कार्यक्रमांना महाजन यांची उपस्थिती असली तरी प्रदेश पातळीवरील बैठकांनाही त्या फारशा फिरकत नाहीत, कार्यकर्त्यांशी संपर्क कमी आहे, अशाही काही तक्रारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे करण्यात आल्या आहेत. भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केले नसून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उमेदवारांची निवड करताना कोणते धक्कातंत्र राबविले जाईल, याची खात्री कोणालाही नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाचीही चर्चा आहे.

हेही वाचा : अडवाणींना भारतरत्न देऊन मोदींचा आणखी एक राजकीय षटकार!

भाजपने प्रत्येक मतदारसंघनिहाय दोन वेळा सर्वेक्षण केले असून त्याआधारे उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रभारी शिवप्रकाश यांनी महाजन यांना त्यांच्या कामासंदर्भात काही सूचनाही केल्या होत्या. या मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी वांद्रे(प.) येथून ॲड. आशिष शेलार, विलेपार्ले येथून पराग अळवणी हे भाजपचे आमदार आहेत. कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर आणि चांदिवलीचे दिलीप लांडे हे शिंदे गटातील आमदार असले तरी लांडे हे केवळ ५०० मतांनी निवडून आले आहेत. कालिनातील आमदार संजय पोतनीस ठाकरे गटाकडे असून वांद्रे-पूर्व येथून काँग्रेसचे झीशान सिद्दीकी निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नसले तरी ही जागा काँग्रेसच लढविण्याची शक्यता अधिक असून हा उमेदवार कोण असेल, त्यानुसार लढत अटीतटीची होणार आहे. ठाकरे गटाची मते ही काँग्रेस उमेदवाराकडे वळणार का, यावर महाजन यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. आता उद्धव व आदित्य ठाकरे, आमदार ॲड. अनिल परब आदी नेते महाजन यांच्या विरोधात जोरदार प्रचार करुन काँग्रेसच्या उमेदवारामागे खंबीरपणे उभे राहिले, तर महाजन यांना विजय मिळविणे अवघड जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांचा कुर्ला आणि मुस्लिम बहुल विभागात प्रभाव आहे. ते सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर असले तरी भाजपने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते निवडणुकीत महाजन यांच्या बाजूने काम करणार की विरोधात, हेही महत्वाचे ठरणार आहे. महाजन यांचा मुख्य आधार विलेपार्ले आणि वांद्रे (प.) मतदारसंघ असून चांदिवली, पवईतील मराठी, त्याचबरोबर मतदारसंघातील गुजराती, उत्तरभारतीयांच्या मतांचा राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे ३३, ३०७ मते मिळविली होती, तर १०,६६९ इतकी मते नोटाला पडली होती. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराची मते फोडण्यासाठी अन्य उमेदवार उभे करणे, यावर भाजपचा भर राहणार आहे.

विमानतळ झोपडपट्टीवासिय आणि अन्य प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचे गाजर दाखवून काही रहिवाशांना घाईघाईने घरांच्या प्रतिकात्मक चाव्या देण्याचा कार्यक्रम महाजन यांनी घेतला होता. पण गेल्या १० वर्षात परिस्थिती जैसे थे असून शासकीय कब्जेहक्काच्या जमिनींवरील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, त्यांना पाच टक्के प्रिमीयम व अन्य प्रश्न कायम आहेत. लोकसभेसाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाहून मतदान होईल, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा आहे. पण यंदाच्या निवडणुकीत महाजन यांना पक्षांतर्गत धुसफूस, शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील वाद आणि मतदारसंघातील आव्हानांना सामोरे जाताना मोठी कसोटी लागणार आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कुणाकुणाला भारतरत्न पुरस्कारनं गौरवण्यात आलं? त्यामागील सरकारची भूमिका काय?

काँग्रेसकडे उमेदवाराची वानवा आहे. माजी खासदार प्रिया दत्त फारशा सक्रिय नाहीत. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव होता. पण त्यांनी शेजारच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारीचा आग्रह धरला आहे. नसिम खान यांना उमेदवारी दिल्यास हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण होण्याची काँग्रेसला भीती आहे. कदाचित काँग्रेस महाविकास आघाडीत या मतदारसंघाचा फारसा आग्रह धरणार नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या मतदारसंघातून लढावे, असाही प्रस्ताव पुढे येऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ मधील उमेदवारांना मिळालेली मते :

पूनम महाजन (भाजप) : ४,८६,६७२
प्रिया दत्त (काँग्रेस) : ३,५६,६६७