सुमारे चार दशके सत्ताकारणात राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे मागील सलग दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे सोलापूर राखीव मतदारसंघात पुन्हा शिंदे कुटुंबीय केंद्रबिंदूस्थानी राहिले आहेत. ८३ वर्षांचे शिंदे हे वृध्दापकाळी निवडणूक राजकारणापासून स्वतः दूर असले तरी आपल्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे त्यांनी भाजपने पक्षात प्रवेश करण्यासाठी दोनवेळा प्रस्ताव ठेवल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे काँग्रेस व महाविकास आघाडीसह सत्ताधारी भाजपसाठीही हा चर्चेचा विषय ठरला आहे. भाजप पुन्हा तिसऱ्यांदा खासदारकी राखण्यासाठी तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे.

सोलापूर मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा पारंपारिक गड मानला जायचा. परंतु १९९६, २००३ (पोटनिवडणूक) आणि २००४ सालच्या लोकसभा लढतीत भाजपने विजय मिळवून काँग्रेसला धक्के द्यायला सुरूवात केली होती. विशेषतः २००४ साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा भाजपचे सुभाष देशमुख यांनी केलेला निसटता पराभव शिंदे यांना जिव्हारी लागला होता. १९९८, १९९९ आणि २००९ साली तीनवेळा सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा व गृहमंत्री आणि अन्य महत्वाच्या सांभाळल्या होत्या. परंतु २०१४ साली देशात मोदी लाटेत शिंदे यांचा निभाव लागला नाही. भाजपच्या शरद बनसोडे यांच्यासारख्या अनुनभवी आणि बिनचेहऱ्याच्या उमेदवाराने त्यांचा धक्कादायक पराभव केला होता. त्यानंतर २०१९ साली भाजपने वीरशैव लिंगायत समाजात अध्यात्मिक आणि धार्मिकस्थान असलेल्या गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींना निवडणूक रिंगणात उतरवून धार्मिक आणि जातीय राजकारणाचे कार्ड खेळले. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रिंगणात असल्याने सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत भर पडली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे भाजपविरोधी मतांची मोठी विभागणी होऊन त्याचा मोठा फटका बसून शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले होते.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
Supriya Sule, Sharad Pawar,
भाजपचे एकच स्वप्न, शरद पवारांना संपवणे; सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार

हेही वाचा : कर्नाटक काँग्रेसला मोठा झटका; जगदीश शेट्टर यांची भाजपामध्ये ‘घर वापसी’, नेमकं कारण काय?

पुढे विधानसभा निवडणुकीत सोलापूरच्या सहापैकी चार जागा भाजपने सहज जिंकल्या. सोलापूर महापालिकेवरही एकहाती सत्ता मिळविली. जिल्हा परिषदेच्या सत्तेतही आघाडी करून अस्तित्व वाढविले. याउलट, काँग्रेसची झालेली घसरण थांबू शकली नाही. मित्र पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीचा आणखी एक फटका काँग्रेसला सहन करावा लागला. राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील-अनगरकर हे अजित पवार गटात गेल्यामुळे महायुतीची ताकद आणखी भक्कम झाली. सध्या मतदारसंघात महायुतीकडे पाच आमदार (भाजपचे चार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक) आहेत. तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या एकमेव आमदार शिल्लक आहेत. यातून काँग्रेससह महाविकास आघाडीची स्थिती केविलवाणी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद, धर्मांतर, वक्फ बोर्ड कायद्याच्या मुद्यांवर प्रक्षोभक भाषणे करून भाजपला अनुकूल ठरणाऱ्या धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग पध्दतशीरपणे राबविला जात आहे. तर दुसरीकडे अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या माध्यमातून राममय आणि हिंदुत्वाचा माहोल चेतवत ठेवला जात आहे. यात भर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या १९ जानेवारी रोजी सोलापुरात रे नगर योजनेंतर्गत असंघटित कामगारांना घरांच्या चाव्या देण्यासाठी आले होते. त्यांनीही स्थानिक विकासाचे मुद्दे वाऱ्यावर सोडून, अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुद्यासह स्थानिक बहुसंख्य स्थानिक पद्मशाली समाजाला चुचकारत त्यांच्या भावनांना हात घातला आणि हिंदुत्वाचे वातावरण तेवत राहण्यासाठी प्रेरणा दिली. त्याचा लाभ भाजपला मिळणार, यात शंका नाही.

हेही वाचा : कर्पूरी ठाकूर यांना दिलेल्या ‘भारतरत्न’वरून बिहारमध्ये राजकारण, नितीश कुमार यांची मोदींवर खोचक टीका; म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत सलग दोनवेळा झालेला पराभव, महापालिकेसह इतर सत्तास्थाने हातून निसटलेली या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पुनश्च बांधणी होणे अपेक्षित होते. ही जबाबदारी अर्थात सुशीलकुमार शिंदे यांचीच असताना त्यादृष्टीने जोमदार प्रयत्न झाले नाहीत. उलट, पक्षातून एका पाठोपाठ एक सहकारी साथ सोडून निघून गेले. आता सरतेशेवटी शिंदे हे मतदारसंघात हुरडा पार्ट्यांसह या ना त्या कारणांमुळे फिरत आहेत.

दुसऱ्या बाजूला भाजपची निवडणुकीची नियोजनबध्द तयारी सुरूच असून नेत्यांचे दौरे वाढले आहेत. विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्यांचे जात प्रमाणपत्र न्यायप्रवीष्ट ठरल्यामुळे आणि त्यांची कामगिरी यथातथाच असल्यामुळे केवळ जनतेतच नव्हे तर भाजपच्या वर्तुळातही त्यांच्याविषयी चांगले बोलले जात नाही. त्यामुळे अधिक चांगला उमेदवार देण्याचे संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच दिले आहेत. भाजपमध्ये मोठी गटबाजी कायम आहे. परंतु संघ परिवाराची करडी नजर राहणार असल्यामुळे निवडणुकीत गटबाजी बाजूला ठेवून पक्षाचे काम करणे भाग पडते. भाजपकडून माजी खासदार अमर साबळे, मूळचे संघ परिवारातील समजले जाणारे माळशिरसचे आमदार राम सातपुते व इतरांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. इकडे काँग्रेसकडून सुशीलकुमारांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावरच एकमेव मदार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या अगोदर शेवटच्या क्षणी प्रणिती शिंदे कोणता राजकीय निर्णय घेतील ? त्या काँग्रेसच्या उमेदवार राहतील की भाजपच्या, याविषयी राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. यातच पुन्हा वंचित बहुजन आघाडी किंवा एमआयएमसारखे पक्षाकडून उमेदवार भाजपविरोधी मतविभागणीसाठी उतरून काँग्रेसपुढील अडचणी वाढविणार काय, यावरही यशापयश अवलंबून आहे.

हेही वाचा : अधिवेशनाचा नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला राजकीय फायदा किती ?

(मागील २०१९ सालचे मतदान )

डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य (भाजप) : ५ लाख २४ हजार ९८५
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) : ३ लाख ६६ हजार ३७७
प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) : १ लाख ७० हजार ७