एकीकडे केंद्रीय पातळीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपावर चर्चा केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक एकजुटीने लढवण्याचा निश्चय इंडिया आघाडीतील घटकपक्षांकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे राज्य पातळीवर मात्र वेगळी स्थिती आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी बाकावरील काँग्रेस यांच्यातील वाद वाढत चालला आहे. तृणमूल काँग्रेसने आम्ही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसाठी दोन जागा देऊ अशी भूमिका घेतली. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधील काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आम्हाला ममता बॅनर्जी यांच्या दयेची गरज नाही, असे पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले आहेत.

“ममता बॅनर्जी यांच्यावर कोण विश्वास ठेवणार?”

अधीर रंजन चौधरी मुर्शीदाबाद येथे माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचा खरा हेतू आता समोर आला आहे. आम्ही काँग्रेसला फक्त दोन जागा देऊ, असे तृणमूलकडून सांगितले जात आहे. ज्या दोन जागांवर २०१९ साली आमचा विजय झालेला आहे, त्याच जागा आम्हाला दिल्या जातील, असे ममता बॅनर्जी म्हणत आहेत. असे असेल तर तृणमूल आम्हाला वेगळं काय देत आहे? ममता बॅनर्जी आणि भाजपाला पराभूत करून आम्ही या दोन्ही जागांवर विजय मिळवलेला आहे. मग आम्हाला ते नेमकं नवं काय देत आहेत? ममता बॅनर्जी यांच्यावर कोण विश्वास ठेवणार?

“ममता बॅनर्जी यांची दया म्हणून दोन जागा नको”

“काँग्रेस पक्ष स्वत: लढाई लढू शकतो. आगामी लोकसभेत पूर्ण ताकदीने लढून आम्ही आणखी जागांवर विजय मिळवू शकतो. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही ते दाखवून देऊ. ममता बॅनर्जी यांच्या दयेवर आम्हाला दोन जागा नको आहेत,” असेही अधीर रंजन चौधरी म्हणाले.

तृणमूल काँग्रेसला युतीच करायची नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट वाटेल, असे कोणतेही काम ममता बॅनर्जी करणार नाहीत, अशी टीकादेखील अधीर रंजन चौधरी यांनी केली.

“काँग्रेसला आम्ही फक्त दोन जागा देऊ”

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू आहे. आम्ही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसाठी फक्त दोनच जागा देऊ, अशी भूमिका तृणमूल काँग्रेसने घेतलेली आहे. बेहरामपूर आणि मालदा दक्षिण अशा या दोन जागा आहेत. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या दोन्ही जागांवर विजय मिळवला होता. तर दुसरीकडे काँग्रेसला अधिक जागा हव्या आहेत. याच कारणामुळे सध्या काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून वाद चालू आहे.

“ममता बॅनर्जी यांना युती करायचीच नाही”

ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचे प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचे नाहीत, असा आरोपही अधीर रंजन चौधरी यांनी केला. “ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमधील युती मोडायची करायची आहे. तुम्ही ममता बॅनर्जी यांचे विधान व्यवस्थित ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येईल की त्यांना पश्चिम बंगालमध्ये कोणाशीही युती करायची नाही. आम्ही फक्त राष्ट्रीय पातळीवर युती करण्यात उत्सुक आहोत, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला युती करायची नाही, अशी भूमिका तृणमूल काँग्रेसची आहे. यावरून बॅनर्जी यांना युती करायचीच नाही हे स्पष्ट होते,” अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक स्वबळावर लढवणार

दरम्यान, आमचा काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. तर चौधरी यांच्या या विधानानंतर काँग्रेसकडे पश्चिम बंगालमध्ये संघटनात्मक ताकद नाही, असे मत तृणमूल काँग्रेसने व्यक्त केले.