नितीन गडकरी हे नाव उच्चारले की आठवतात देशभरातले प्रशस्त महामार्ग. पण अशा महामार्गाच्या महानिर्मात्या गडकरींना सध्या त्यांच्याच गडातील अर्थात नागपुरातील चिंचोळय़ा गल्ल्यांमधून प्रवास करावा लागतोय. नाही म्हणायला, या गल्ल्या तशा गडकरींसाठी नवीन नाहीत. आधी त्यांच्या महालातल्या ‘भक्ती’वर जाणाऱ्या भाविकांना व त्याच ‘भक्ती’वरून ‘भोवताल’ अनुभवणाऱ्या खुद्द गडकरींनाही अशाच गल्लीतून जावे लागायचे. पण गडकरी देशाचे नेते झाले आणि गल्लीतले घर महामार्गावर आले. आता याच महामार्गावरील घराच्या टेरेस गार्डनमध्ये खुर्ची लावून ते चार वर्षे अकरा महिने सांगत असतात देशभरातील माध्यमांना त्यांनी केलेल्या विकासकामांच्या कोटी-कोटींचे आकडे. हे आकडेच बोलत असताना मी वेगळी मते मागू कशाला, स्वत:चा प्रचार करू कशाला, हा त्यांचा प्रश्नही नित्याचाच. पण चार वर्षे  अकरा महिने संपले की गडकरी टेरेस गार्डनची खुर्ची माजघरात ठेवून रस्त्यावर उतरतात आणि महामार्गावरील घरापासून लांब  चिंचोळय़ा गल्ल्यांत प्रचार सुरू करतात. ‘‘मी प्रचार करणार नाही ते मी प्रचार करणार’’ या स्थित्यंतराला नागपूरकर पक्के सरावलेले. त्यामुळे गडकरींना रस्त्यावर बघून त्यांना एरवी धक्का बसत नाही. पण यंदा तो बसतोय. कारण गडकरींचा प्रचाररथ अतिचिंचोळय़ा गल्लीतही जाऊ पाहतोय. प्रचाररथाचा हा मार्ग दिल्लीतल्या ‘दाजीबां’मुळे बदललाय की गल्लीतल्या प्रतिस्पध्र्यामुळे, हे मात्र गडकरींनाच ठाऊक..!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र चव्हाणांचा सल्ला

रत्नागिरी भाजपचा बूथ कार्यकर्ता आणि सुपर वॉरियर्स संमेलन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी उत्साहात पार पडले . या वेळी बोलताना चव्हाण यांनी, लोकसभा निवडणुकीत कशा प्रकारे प्रचार करावा, याबाबत उपस्थित कार्यकर्त्यांना तपशीलवार मार्गदर्शन केलं. मोदी यांच्या कामगिरीतील काही प्रमुख मुद्दे सांगितले आणि ते जनतेपर्यंत पोहोचवण्याची सूचना केली. इतकंच करून मंत्री महोदय थांबले नाहीत तर जाता जाता पत्रकारांनाही ‘मार्गदर्शन’ करत त्यांनी सांगितलं की, सरकारने केलेली कामगिरी तर माध्यमांनी जनतेपर्यंत पोहोचवावीच, त्याचबरोबर विरोधी पक्षांचे नेते आले तर त्यांना त्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल जाबही विचारावा! शिवाय, हे काम तुम्ही करणं अपेक्षित आहे, असं बजावतानाच, त्या विरोधकांच्या सभा कसल्या अटेंड करता, असा अजब प्रश्नही केला. किंबहुना प्रसारमाध्यमांनी फक्त सत्ताधारी भाजपच्या गेल्या दहा वर्षांतल्या देदीप्यमान कामगिरीचे गोडवे गावेत आणि विरोधकांवर बहिष्कार टाकावा, असं त्यांना सुचवायचं होतं. अर्थात त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा प्रसारमाध्यमांबद्दलचा दृष्टिकोन पाहता हे स्वाभाविकच म्हणायला हवं!

हेही वाचा… भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?

हेही वाचा… ओमर अब्दुल्ला मेहबूबा मुफ्तींवर का संतापले? पीडीपी जम्मू काश्मीरमध्ये पाच जागांवर लढणार

नगरच्या प्रचारात इंग्रजी!

नगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे नीलेश लंके या दोघांची उमेदवारी निश्चित झाली असली तरी उमेदवारी दाखल करण्याची सुरुवात होण्यास अद्याप १५ दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे प्रचार सभांतून दोघेही परस्परांवर टीकास्त्र सोडताना, आरोप-प्रत्यारोप करताना नाव न घेता ‘समोरचा उमेदवार’ असा उल्लेख करतात. विखे यांच्या समर्थनार्थ आमदार संग्राम जगताप यांनी नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजितदादा गट) मेळावा घेतला. या मेळाव्यात खासदार विखे यांच्या संसदेतील इंग्रजी व हिंदी भाषणाची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. त्याचा उल्लेख करत विखे यांनी लंके यांना एक आगळेवेगळेच आव्हान दिले. मी संसदेत केलेले इंग्रजी व हिंदीतील भाषण लंके यांनी महिनाभरात जसेच्या तसे तोंडपाठ करून दाखवावे, मी उमेदवारी अर्जच भरणार नाही, असे ते आव्हान आहे.. यामागे शैक्षणिक पात्रतेचा संदर्भ होता. या आव्हानाची चर्चा सुरू झाली तेव्हा लंके यांनीही विखे यांना प्रत्युत्तर दिले.  संसदेत इंग्रजीत बोलता का यापेक्षा शेतकऱ्यांची बाजू किती लावून धरता, हे जास्त महत्त्वाचे आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

(संकलन : शफी पठाण, सतीश कामत, मोहनीराज लहाडे)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chavadi maharashtra political crisis political chaos in maharashtra amy
First published on: 04-04-2024 at 05:06 IST