सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू पाहणा-या माढा लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने उमेदवारी डावलल्याने संतापलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून भाजपचे उमेदवार, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना कडवे आव्हान देण्याचा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी धैर्यशील मोहिते-पाटील यांनाच मिळण्याची शक्यता वर्तविली जात असताना मोहिते-पाटील कुटुंबीयांनी स्वतःचा मार्ग सुकर होण्याच्या अनुषंगाने बेरजेचे राजकारण करण्याचे ठरविल्याचे दिसून येते. स्वतःच्या माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक उत्तम जानकर यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मोहिते-पाटील यांच्याकडून समोर आला असून यासंदर्भात येत्या चार दिवसांत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भूमिका निश्चित करण्याचे जानकर यांनी ठरविले आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.

माढा लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार देण्याची भाजपकडून अपेक्षा होती. परंतु यात भाजपने फसवणूक केल्याची जनभावना वाढल्याचे उत्तम जानकर यांनी कबूल करतानाच दुसरीकडे मोहिते-पाटील यांच्याशी मैत्री करण्याची मानसिकता बोलून दाखविली आहे. यापूर्वी भाजपचे काम माळशिरसमधून करीत असताना ज्यावेळी भाजपची राज्यात सत्ता आली, त्यावेळी विकासाचे कोणतेही काम झाले नाही. आम्हाला न्याय आणि ताकद मिळणे अपेक्षित होते. परंतु भाजपकडून तसे झाले नाही. मागील २०१९ साली माळशिरस विधानसभेची उमेदवारी आणि यंदा सोलापूर राखीव लोकसभेची उमेदवारी आपल्यास मिळेल, अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण त्यात डावलले गेल्यामुळे आमचे कार्यकर्ते भाजपवर नाराज आहेत, असे जानकर यांनी स्पष्टपणे सांगितले. आगामी काळात मोहिते-पाटील आणि आपण एकत्र आलो तर यंदाच्या माढा लोकसभेसाठी माळशिरसमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणजेच मोहिते-पाटील यांना पावणेदोन लाख मतांची आघाडी मिळणे सुलभ होईल, असे जानकर यांना वाटते. मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये येऊन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना एकट्या माळशिरसमधून तब्बल एक लाख मतांची आघाडी मिळवून दिली होती. जानकर यांना मानणारे ६०-७० हजार मतदार असल्याचे मानले जाते.

हेही वाचा : केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

मागील १५-२० वर्षात उत्तम जानकर हे मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. यापूर्वी २००९ साली माळशिरस राखीव विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उभे राहून मोहिते-पाटील यांचे विश्वासू आमदार हणमंत डोळस यांच्या (८२ हजार ३६० मते, ४७.४३ टक्के) विरोधात ६६ हजार १३७ मते (३८.०९ टक्के) घेतली होती. तर मागील २०१९ सालच्या विधानसभा लढतीत भाजपने मूळ संघ परिवारातील राम सातपुते यांची उमेदवारी लादून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मोहिते-पाटील यांच्यावर सोपविली असता सातपुते यांचा अवघ्या अडीच हजार मतफरकाने काठावर विजय विजय झाला होता. त्यावेळी सातपुते यांना एक लाख ३५०७ मते (४८.०९ टक्के) तर त्याविरीधात तत्कालीन राष्ट्रवादीकडून झुंज दिलेले उत्तम जानकर यांनी एक लाख ९१७ (४६.८९ टक्के) मते मिळवून भाजपला अर्थात मोहिते-पाटील यांना फेस आणला होता.

हेही वाचा : भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक

मागील ५० वर्षाच्या इतिहासात माळशिरसमध्ये मोहिते-पाटील यांच्या विरोधात सुरूवातीला शामराव पाटील आणि नंतर भाजपचे ॲड. सुभाष पाटील यांनी आव्हान उभे केले होते. सुभाष पाटील हे अलिकडे राजकारणात सक्रिय नाहीत. त्यांनी मोहिते-पाटील यांच्याशी असलेला विरोध संपवून मैत्री केली आहे. त्यांच्या पश्चात मोहिते-पाटील विरोधातील पोकळी भरून काढण्याची जबाबदारी उत्तम जानकर यांनी घेतली आहे. त्यांनी कधी भाजप तर कधी राष्ट्रवादीच्या आधारे सोयीनुसार मोहिते-पाटील यांच्या विरोधात संघर्ष करताना त्यांना सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील विरोधकांनी रसद पुरविण्याचे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर जानकर हे आता मोहिते-पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणाला प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेत दिसून येतात. लोकसभेला मोहिते-पाटील यांना तर माळशिरस राखीव विधानसभेला उत्तम जानकर यांना मदत करण्याच्या अटीवर दोन्ही एकमेकांचे विरोधक मैत्री करून एकत्र येणार असल्याच्या चर्चेला स्वतः जानकर यांनी दुजोरा दिला आहे. त्याप्रमाणे हे दोन्ही गट एकत्र आल्यास भाजपला माढ्यात आणखी दुसरा धक्का बसू शकतो.