गणेश जेवरे, लोकसत्ता

कर्जत : भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून राम शिंदे यांना पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार विजयी झाले. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या दोघांतील संघर्ष शमलेला नाही. अर्थात राम शिंदे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याने भाजपचा उमेदवार कोण असेल, याविषयी उत्कंठा आहे. परंतु, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे काही नेते रोहित यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करून त्यांना आव्हान देऊ लागले आहेत.

रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरून महाविकास आघाडीतील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये नापसंतीचे वातावरण आहे. मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच रोहित पवार यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावोगाव जाऊन बाहेरचा उमेदवार नको असा प्रचार सुरू केला आहे. त्याविरोधात रोहित पवार समर्थकांनी ह्यसुपारीबाज नेतेह्ण असे फलक ठिकठिकाणी लावून प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे मतदारसंघात रंग भरू लागला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षातून काहीजण बाहेर पडले तर काहींनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री अजित पवार किती बळ देतात, यावर रोहित यांच्या विरोधातील वातावरण अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा >>> चावडी : कोण सुक्काळीचा चाललाय तो!

राष्ट्रवादीत फूट पडण्याच्याही आधीपासून रोहित पवार यांचे पक्षात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी सातत्याने या ना त्या कारणावरून यात्रा काढल्या. रोहित पवार यांना मतदारसंघात जखडून ठेवण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना बळ देण्यासाठी विधान परिषदेवर नियुक्ती केली. मात्र परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. एमआयडीसीच्या प्रश्नावरून दोघांतील श्रेयवाद विधिमंडळाच्या दारात पोहोचला होता.

हेही वाचा >>> ‘अजित पवारांना स्वतंत्र लढण्याचा सल्ला’; जयंत पाटील यांचा दावा

विधानसभेच्या विजयानंतर रोहित पवार यांनी सुरुवातीच्या काळात राम शिंदे यांचे अनेक समर्थक आपल्याकडे वळवले. सहकारातील अनेक संस्थांवरही वर्चस्व मिळवले, मात्र नंतरच्या काळात रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरून मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार थेट जनतेत जात आहेत. मात्र अद्याप रोहित पवार यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण? हे निश्चित झालेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधात कोण?

राम शिंदे यांचा विधान परिषदेवरील बराचसा कार्यकाळ अद्याप बाकी आहे. मात्र त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भाजपमध्ये आलेले विखे समर्थकही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांचे चिरंजीव जय यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्याचा दौरा केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी कर्जतमधील अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून जम बसवलेला आहे. त्यामुळे पुन्हा कुटुंबात लढत होणार का, याचीही चर्चा होऊ लागली आहे.