नितीन पखाले

एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांना मंत्रीमंडळात पुन्हा सामावून घेण्यासाठी विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता राठोड यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरागडावरील महंतांसह ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने यात आघाडी घेतली आहे.

काय घडले-बिघडले?

पोहरादेवी येथील महंतांसह ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संजय राठोड यांच्यावरील ‘त्या’ आरोपांच्या अहवालातकाय निष्पन्न झाले, असा प्रश्न उपस्थित केला. आरोप सिद्ध झाले नसतील तर संजय राठोड यांना तत्काळ ‘क्लीनचिट’ देऊन त्यांच्या राजकीय प्रगतीतील अडथळा दूर करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली. फेब्रुवारी २०२१ मध्ये एका तरुणीने पुणे येथे इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संजय राठोड आणि त्या तरुणीसंदर्भात विविध चर्चांना उधाण आले. भाजपने हे प्रकरण लावून धरले. या घटनेनंतर पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शानंतर तर भाजपने मुख्यमंत्र्यांना संजय राठोड यांचा राजीनामा घेणे भाग पाडले. तेव्हापासून राठोड समर्थक अस्वस्थ आहेत. या प्रकरणाशी राठोड यांचा कुठलाही संबंध नसताना त्यांना मुद्दामहून यात गोवले गेल्याची समर्थकांची भावना आहे.

संजय राठोड वाशिमचे पालकमंत्री असताना त्यांनी राज्य शासनाकडून १२५ कोटींचा ‘पोहरादेवी (जि. वाशिम) विकास आराखडा’ मंजूर करून आणला. त्याचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. मात्र संजय राठोड यांचे मंत्रीपद गेल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून या विकासकामांना खीळ बसल्याचा आरोप पोहरादेवीचे महंत कबीरदास महाराज यांनी केला आहे. ‘त्या’ युवतीच्या आत्म्हत्याप्रकरणात राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही तसेच कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. तरीही पोलिसांकडून राज्य शासनास हा चौकशी अहवाल देण्यास विलंब होत असल्याचा आरोप महंत कबीरदास महाराज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. संजय राठोड यांच्या पुढाकाराने पोहरादेवीत भव्य नगारा वस्तुसंग्रहालय साकारत आहे. विकासाची दृष्टी असलेला असा लोकप्रतिनिधी सत्तेत नसल्याने पोहरादेवी तीर्थक्षेत्रासह समाजाचे मोठे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच आज शनिवारी माझ्यासह महंत सुनील महाराज, शेखर महाराज, जितेंद्र महाराज, कर्नाटकातील जुगनू महाराज यांच्यासह ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे शंकर पवार आदींनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा तपास कुठवर आलाय, संजय राठोड यांच्याबाबत काय निष्पन्‍न झाले, याबाबत चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही, असे सांगितले. या तपासाची ‘बी-समरी’ लवकरच वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती दिल्याचे कबीरदास महाराज यांनी सांगितले.

पुणे पोलिसांकडून संजय राठोड यांना पूर्णपणे ‘क्लीन चिट’ मिळाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून योग्य निर्णय घेण्याची मागणी करणार आहो, असे कबीरदास महाराज म्हणाले. ‘त्या’ तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माझा राजकीय बळी घेतला. मी निर्दोष होतो म्हणून मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. चौकशी निष्पक्ष व्हावी, हीच माझीही भूमिका होती. मी ३५ वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावरतो आहे. चार वेळा नागरिकांनी मला बहुमताने निवडून दिले आहे. मी आणि माझे चारित्र्य कसे आहे, हे मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे माहिती आहे. महंतांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचे बातम्यांमधून बघितले. पोलिसांचा अहवाल काय आहे, हे मला माहिती नाही, असे संजय राठोड यांचे म्हणणे आहे.

संभाव्य राजकीय परिणाम

राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेच्या गोटात नाराज आमदारांवरून चिंता आहे. राठोड हे बंजारा समाजातील नेते असल्याने त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याबाबत विचार होऊ शकतो. अर्थात विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याचाही अंदाज त्याआधी घेतला जाईल.