मुंबई : भाजपच्या यादीत मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह १३ विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असली तरी तीन विद्यामान आमदारांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पक्षाच्या पहिल्या यादीत सुनील राणे (बोरिवली), भारती लव्हेकर (वर्सोवा) आणि पराग शहा (घाटकोपर पूर्व) या तीन विद्यामान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे या तिन्ही आमदारांना पुन्हा संधी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> अकोला पूर्व’तून रणधीर सावरकर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात; भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत मानाचे स्थान

मिहिर कोटेचा यांचा लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात पराभव झाला होता. मुलुंडमध्ये उमेदवारीसाठी अनेक इच्छुक होते. पण पक्षाने कोटेचा यांनाच पुन्हा संधी दिली. सायन-कोळीवाडा मतदारसंघात प्रसाद लाड यांना उमेदवारी हवी होती. पक्षाने विद्यामान आमदार सेल्वन यांच्यावरच पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. बोरिवली मतदारसंघात गेल्या निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारून सुनील राणे यांना पक्षाने संधी दिली होती. या वेळी राणे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबबात साशंकता व्यक्त केली जाते. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा बोरिवलीसाठी आग्रह आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटकोपर पूर्व मतदारसंघात मावळत्या १४व्या विधानसभेतील सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा यांच्या उमेदवारीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी टोकाची भूमिका घेतल्याने पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. उमेदवारी नाकारल्यास बंडखोरी करण्याचा इशारा मेहता यांनी दिल्याने पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. यामुळे मेहता की शहा याबाबत पक्षाला निर्णय घ्यावा लागणार आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मिहिर कोटेचा यांना घाटकोपर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघांमधून पक्षाला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, ही बाबही पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने घेतली आहे. पराग शहा हे मतदारसंघात कमी वेळ देतात, अशी त्यांच्याबद्दल तक्रार करण्यात आली आहे. वर्सोवा मतदारसंघातून विद्यामान आमदार भारती लव्हेकर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे पक्षात सांगण्यात येते.