Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्यामुळे अनेकांची धावपळ सुरु आहे. अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळावी, म्हणून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचंही या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीत एक नवा ट्रेंड पाहायला मिळला आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या किमान पाच नेत्यांनी विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी महायुतीच्या इतर मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर या पाच नेत्यांनी महायुतीतील मित्र पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच तिकीट देखील देण्यात आलं आहे. या पाचही उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, महायुतीमधील प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागा आणि त्यामध्ये सर्वात मजबूत उमेदवार उभा केला जाईल, याची खात्री करत उमेदवारी दिली जात असून महायुतीमध्ये हे समन्वयाच्या भूमिकेतून सुरु असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : आमदार रत्नाकर गुट्टे यांची उमेदवारी महायुती ‘पुरस्कृत’, गंगाखेड मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांची कोंडी

भाजपाच्या कोणत्या पाच नेत्यांनी मित्र पक्षात प्रवेश केला?

भारतीय जनता पक्षाचे नेते, तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर लगेचच निलेश राणे यांना कुडाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाही झाली. दरम्यान, निलेश राणे यांची लढत आता कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याशी होणार आहे.

तसेच भारतीय जनता पक्षाचे सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. निशिकांत पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून त्यांना उमेदवार देण्यात आली. यामध्ये निशिकांत पाटील यांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून आणि संजयकाका पाटील तासगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रोहित पाटील यांच्या विरोधात आता संजयकाका पाटील हे निवडणूक लढवत आहेत. रोहित पाटील हे आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत. तसेच निशिकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. इस्लामपूर विधानसभेची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे मला भाजपामधून राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागला असून मी राष्ट्रवादीच्या तिकिटावर इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकेन, असं निशिकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही लोहा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात शुक्रवारी प्रवेश केला. ते नांदेडचे माजी खासदार असून लोहा येथून दोन वेळा आमदार राहिले आहेत. याबरोबरच भाजपाचे माजी राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनाही अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली.