नाशिक : एखाद्याने चुकीचे काम, फसवेगिरी किती करावी याला काही मर्यादा असतात. या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या असून अशा धोकेबाजाला विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करत राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लक्ष्य केले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या मंगळवारी येवल्यासह जिल्ह्यातील पाच मतदारसंघात जाहीर सभा झाल्या. यातील चार मतदारसंघ हे अजित पवार गटाच्या आमदारांचे होते. येवला येथील सभेत भुजबळांवर अतिशय कठोर शब्दांत पवार यांनी टीका केली.

हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई

भुजबळ यांना गृहमंत्रिपद सोडावे लागल्याचा दाखला पवार यांनी दिला. अशाच चुकीच्या उद्याोगामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. अडचणीच्या काळात आपण त्यांना आधार दिला. कारागृहात कोणी त्यांना भेटायला तयार नव्हते. तेव्हा मुलगी भेटायची. त्यांच्या सर्व चुका विसरून आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत सहकार्य केले होते, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुजबळ यांच्या कारनाम्यांचे दाखले देत पक्षाला फसविणाऱ्यास येवलेकरांनी धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या संपूर्ण भाषणात पवार यांनी भुजबळ यांचे नाव एकदाही घेतले नाही.