Uddhav Thackeray, Raj Thackeray Congress Reaction : जवळपास दोन दशकांच्या राजकीय दुराव्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे मुंबईतल्या वरळी येथील डोम सभागृहात शनिवारी (तारीख ५ जुलै) एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील घटकपक्षांसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेसच्या एकाही नेत्याने या कार्यक्रमाला हजेरी न लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसने हा निर्णय जाणून बुजून घेतला असून पक्षाकडून संपूर्ण घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसच्या या भूमिकेमागे राजकीय समीकरणं असल्याचं सांगितलं जात आहे. बिहार विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याचबरोबर आगामी काळात मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकाही होणार आहेत. राज ठाकरे यांनी वेळोवेळी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून कठोर भूमिका घेतली आहे. हीच बाब लक्षात घेता, काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मते, हिंदीला विरोध करून मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे लावून धरणाऱ्या ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाचा प्रभाव फक्त मुंबई महापालिका निवडणुकीपुरताच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत पक्षाने त्यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येणे टाळलं आहे. कारण- त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो. मात्र, दुसरीकडे काँग्रेस उद्धव ठाकरे यांना नाराजही करायचे नाही. भाजपाच्या हिंदुत्वाविषयीचा अपप्रचार खोडून काढण्यासाठी पक्षाला त्यांची साथ हवी आहे.
आणखी वाचा : Maharashtra Politics : ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यातील भाषिक संघर्षाला कशी चालना मिळाली?
काँग्रेसने ठाकरे बंधूंपासून दुरावा का ठेवला?
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, “ठाकरे बंधुंनी पक्षाला दिलेलं आमंत्रण हे केवळ औपचारिक होतं. महाविकास आघाडीतील घटकपक्षांना त्यांनी कार्यक्रमासाठी बोलावलं होतं; पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी कार्यक्रमाला कार्यक्रमाला हजेरी लावूनही ठाकरे बंधूंनी त्यांना व्यासपीठावर स्थान दिलं नाही. कारण- त्यांना या मराठी आंदोलनाचं सगळं श्रेय स्वतःकडेच घ्यायचं होतं.”
काँग्रेस हिंदीविरोधी आंदोलनाचा भाग नव्हती हे सांगताना पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले, “आम्ही कार्यक्रमाला गेलो नाही हे आमच्यासाठी चांगलं झालं. आमच्या नेत्यांनी काहीवेळा विधानं केली असली, तरी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नाही. दिल्लीतील पक्ष नेतृत्वाकडून या मुद्द्यावर आम्हाला स्पष्ट दिशा मिळाली नव्हती.बिहारसारख्या हिंदी पट्ट्यात काँग्रेस पक्ष पुन्हा पाय रोवण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे हिंदीविरोधी भूमिका घेणं पक्षाच्या धोरणात बसत नाही. ठाकरे बंधूंचं लक्ष फक्त मुंबई महापालिका निवडणुकीवर आहे आणि आम्हालाही या निवडणुकीत स्वबळावर लढायचं आहे. आम्ही कधीही महापालिका निवडणुकीसाठी कोणाशीही युती केलेली नाही.”
काँग्रेसचे नेते म्हणतात- ठाकरेंची मते आम्हाला मिळत नाहीत
काँग्रेसच्या दुसऱ्या एका नेत्याने सांगितले, “उद्धव ठाकरे यांनी हे सगळं केवळ मुंबई महापालिकेतील आपलं वर्चस्व टिकवण्यासाठीच केलं आहे. महापालिकेची निवडणूक आपण स्वबळावर लढवावी, असं पक्षातील बरेच नेते सांगत आहेत. सध्या आमच्याकडे ज्या जागा आहेत, त्या गमावण्याची आमची तयारी नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आम्ही युती केली तर भाजपाला हरविण्यासाठी अल्पसंख्याकांची मते त्यांना मिळतात;पण शिवसेनेचे मतदार काँग्रेसला कधीच मतदान करीत नाहीत. हे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झालं आहे.”

“मुंबईत काँग्रेसचा फारसा मतदार राहिलेला नाही आणि ही परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे. काँग्रेसची मतपाठराखण ‘मराठी माणूस’ किंवा गुजराती समाजाकडून होत नाही. आमचा आधार फक्त अल्पसंख्याकांपुरता मर्यादित आहे आणि त्यातही काही भागांमध्ये समाजवादी पक्ष (SP) व एमआयएम पार्टीकडून उमेदवार उभे केले जात असल्याने तेही मतं विभाजित होत आहेत,” अशी स्पष्ट कबुली एका काँग्रेस नेत्याने दिली. “उत्तर भारतीय मतदार काँग्रेसला थोडफार समर्थन देतात; पण जर राज ठाकरे यांच्याबरोबर पक्षाचे नेते दिसले, तर आम्हाला त्यांची मतेही गमावावी लागू शकतात. काँग्रेसकडे फारसं मताधिक्य उरलेलं नाही, ज्यामुळे पक्षातील नेते पूर्णपणे संभ्रमात आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
माध्यमांनीही ठाकरे बंधूंनाच पसंती दिली – काँग्रेस नेत्याची खंत
“राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता; पण मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी हिंदीविरोधी मोहीम अधिक जोरकसपणे राबवीत परप्रांतीयांना मारहाण केली. यादरम्यान, काँग्रेसच्या बाजूला पडली आणि माध्यमांनीही त्यांनाच पसंती दिली. कारण- त्यांना अशाच प्रकारच्या बातम्या हव्या असतात. आपण जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. जसं की, शेतमालाचे दर, कायदा-सुव्यवस्था, भ्रष्टाचार किंवा अगदी मराठी भाषेच्या मुद्द्यावरूनही रस्त्यावर उतरलं पाहिजे. मात्र, हे फक्त ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच हवं असा काही आग्रह नव्हता,” अशी खंत काँग्रेसच्या एका नेत्याने बोलून दाखवली.
काँग्रेसच्या नेत्यांची कशावरून नाराजी?
राज्यातील एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, हिंदीच्या मुद्द्यावर पक्षाने स्पष्ट दिशा दाखवायला हवी होती. मात्र त्यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी कोणतीही भूमिका घेतली नाही. मागील आठवड्यात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावले होते. त्यावेळी सर्व नेते राहुल गांधी व मल्लिकार्जुन खडगे यांना भेटण्याच्या अपेक्षेने गेले; पण दोघेही तिथे उपस्थित नसल्याने त्यांची भेट घेतला आली नाही. ही बैठक त्या दिवशी झाली, जेव्हा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पक्षाची भूमिका ठरवून पत्रकार परिषद घ्यायची असते आणि काही महत्वाचे मुद्दे मांडायचे असतात. चेन्नीथला यांनी मुंबईतच बैठक घेतली असती, तर ती पक्षासाठी अधिकच फायदेशीर ठरली असती, असंही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसला उद्धव ठाकरे का हवेहवेसे?
“उद्धव ठाकरे यांना नाराज करण्याची काँग्रेसची अजिबात इच्छा नाही. कारण- महाविकास आघाडी आधीच विस्कळीत झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस वेगवेळी लढली तरी महाविकास आघाडी टिकून राहावी अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे, असं काँग्रेसच्या एका नेत्यानं सांगितलं. “ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या कार्यक्रमापासून दूर राहणे, हिंदी लादण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणे; पण आंदोलन व हिंसाचारावर मौन बाळगणे, तसेच उद्धव ठाकरे आघाडीत कायम राहतील याची काळजी घेणे अशी काँग्रेसची भूमिका आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.