चंद्रपूर : चंद्रपूर, वरोरा, राजुरा व बल्लारपूर या चार मतदारसंघांत काँग्रेस आणि भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. सोमवारी (दि. ४) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंड शमविण्यासाठी काँग्रेस व भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. अशातच, ही बंडखोरी आणि बंडखोरांच्या मागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, कोणता नेता सक्रिय आहे, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राजुरा येथे देवराव भोंगळे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर व खुशाल बोंडे हे तिघे नाराज आहेत. याच नाराजीतून ॲड.धोटे व निमकर या दोन्ही माजी आमदारांनी बंडखोरी करीत भोंगळेंविरोधात दंड थोपाटले आहे. बोंडे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे कट्टर समर्थक आहेत, तर भोंगळे हे मुनगंटीवार समर्थक आहेत.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात राज ठाकरे फोडणार प्रचाराचा नारळ

चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे ब्रिजभूषण पाझारे व काँग्रेसचे राजू झोडे यांनी बंड पुकारले आहे. पाझारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाझारे मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय आहेत, तर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश अहीर यांनी घडवून आणला आहे. दुसरीकडे, काँग्रेसने चंद्रपुरात प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी दिली आहे. पडवेकर यांच्या विरुद्ध काँग्रेसचेच राजू झोडे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. झोडे हे खासदार प्रतिभा धानोरकर गटात सक्रिय आहेत.

हेही वाचा >>> गडचिरोलीत आत्राम, गेडाम, मडावी बंडखोरीवर ठाम, होळी, कोवासे, कोवे माघार घेण्याची शक्यता?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बल्लारपूर मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी बंडाचा झेंडा उंचावला आहे. त्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गोटातील आहेत. याच मतदारसंघात काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार यांनीही बंड पुकारले आहे. महाआघाडीत सहभागी शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल कला आहे. वरोरा मतदारसंघात काँग्रेसचे प्रवीण काकडे यांच्या विरुद्ध भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर व डॉ. चेतन खुटेमाटे यांनी बंड पुकारले आहे. क्षमता नसताना काकडे यांना उमेदवारी दिली गेली, याबद्दल या दोघांची नाराजी आहे. या दोघांच्या बंडाला काँग्रेसमधील काही नेत्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी काकडे खरच लायक उमेदवार आहेत का, असाही प्रश्न मतदार उपस्थित करित आहेत.