लातूर : लोकसभा निवडणुकीमध्ये ‘ मुस्लिम- दलित – मराठा’ अशी मतपेढी महाविकास आघाडीच्या बाजूला झुकल्याचे दिसल्यानंतर मुस्लिम लोकसंख्या गृहीत धरुन प्रत्येक जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघात उमदेवारी मिळावी अशी मागणी काँग्रेसकडे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अलिकडेच छत्रपती संभाजीनगर येथे या अनुषंगाने एका बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. काही माजी आमदारांनी या कामात पुढाकार घेतला.

लातूर येथे १० ऑगस्ट रोजी काँग्रेस नेत्यांची विभागीय बैठक होणार आहे. या बैठकीस काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेनीथल्ला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात ,पृथ्वीराज चव्हाण आदी नेते येणार आहेत. या वेळी ही मागणी अधिक नीटपणे करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. मुस्लिमांना विधिमंडळात काँग्रेसने अधिक प्रतिनिधीत्व द्यावे ही मागणी पुढे रेटण्यासाठी माजी आमदार एम. एम. शेख, माजी आमदार सिराज देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अहमद चाऊस, युसुफ शेख, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार शेख, उपमहापौर मसूर शेख ,प्रदेश सरचिटणीस हाफिज शेख , प्रदेश सचिव खलील पठाण, प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद, शकील मौलवी ,रशीद मामू ,आरिफ शेख यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रश्नी राहुल गांधी यांची भेट घेण्याची तयारी असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख यांनी सांगितले.

हेही वाचा : राजधानी दिल्लीचा कारभार नक्की कोणाच्या हातात? कोलमडलेल्या पायाभूत सुविधांसाठी कोण जबाबदार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठवाड्यात नांदेडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती. काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटानेही मुस्लिमांना प्रतिनिधीत्व दिले जाईल असे संकेत दिले आहेत. परभणीच्या बाबा जानी यांना नुकतेच पुन्हा एकदा पक्षात प्रवेश देण्यात आला. फौजिया खान याही राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्या मानल्या जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी देताना हात आखडते ठेवले जातात असा आरोप नेहमी ‘ एमआयएम’ चे नेतेही करत असतात. त्यामुळे मराठवाड्यात मुस्लिम मतपेढीला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणी वाढत आहे. काँग्रेसच्या नेत्यांना या मागणीला अधिक टोकदार करत नेत्यांच्या भेटीगाठीचा उपक्रम हाती घेतला आहे.