अलिबाग : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी झाल्याने महायुतीचा वरचष्मा पहायला मिळाला. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे तर दोन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे वर्चस्व पहायला मिळाले.

आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालिम म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्यामुळे निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहीले होते. निवडणूक लोकसभेची असली तरी प्रतिष्ठा विधानसभेच्या आमदारांची पणाला लागली होती. जिल्ह्यातील सातही आमदार आपआपल्या मतदारसंघात मताधिक्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते. बदलत्या राजकीय समिकरणामुळे मतदारांचा अंदाज लागत नव्हता. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निकालाबाबत साशंक होते. निवडणूक निकालानंतर आगामी विधानसभा निवडणूकीचे चित्र बऱ्याच प्रमामात स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-निकालानंतर बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते घर सोडून पक्ष कार्यालयात ठाण मांडून का बसलेत?

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघाची मावळ आणि रायगड अशा दोन लोकसभा मतदारसंघात समावेश होता. मावळ मतदारसंघात पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघ होते. तर रायगड मतदारसंघात अलिबाग, पेण, श्रीवर्धन आणि महाड या चार मतदारसंघ समाविष्ट होते. मावळ आणि रायगड या दोन्ही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाले असले तरी मावळ मतदारसंघातील उरण आणि कर्जत मतदारसंघात महाविकासघाडीच्या उमेदवारांला मताधिक्य मिळाल्याचे पहायला मिळाले. तर पनवेल मतदारसंघात महायुतीने वर्चस्व कायम राखले. दुसरीकडे रायगड मतदारसंघात अलिबाग, पेण, मुरूड आणि श्रीवर्धन याचारही मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले. त्यामुळे उरण आणि कर्जत मतदारसंघाचा अपवाद सोडला तर उर्वरीत पाचही मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-राजकीय क्षितीजावर अस्त ते पुन्हा दमदार ‘एंट्री’; चंद्राबाबू नायडूंनी ‘टीडीपी’ला कशी दिली उभारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीत धोका कोणाला….

कर्जत मधून शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार आहेत. तर उरण मधून भाजपचे महेश बालदी आमदार आहेत. दोघांच्याही मतदारसंघात महायुतीचे मताधिक्य घटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांसाठी ही धोक्याची घंटा वाजली आहे. या निकालातून दोघांनी बोध घेणे गरजेचे आहे. महाड मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले आमदार आहेत. या मतदारसंघात महायुतीला अवघ्या तीन हजाराचे मताधिक्य मिळाले आहेत. त्यामुळे गोगावलेसाठी पुढील निवडणुकीतील धोक्याची पूर्व सूचना असणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत महाविकास आघाडीचा एकही आमदार नसला तरी आगामी काळात दोन ते तीन मतदारसंघात महाविकास आघाडीला शिरकाव करण्याची संधी असल्याचे लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले आहे.

पक्षीय बलाबल

  • अलिबाग, कर्जत, महाड (शिवसेना शिंदे गट)
  • पनवेल, उरण, पेण (भाजपा)
  • श्रीवर्धन (राष्ट्रवादी काँग्रेस)अजित पवार गट