आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी आघाडी केली आहे. या आघाडीत पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असललेल्या तृणमूल काँग्रेस या पक्षाचाही समावेश आहे. या पक्षाने भाजपाशी दोन हात करण्यासाठी खास रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा पक्ष प्रादेशिक अस्मितेचा आधार घेत आहे. या पक्षाकडून ‘माँ, माटी आणि माणूस’ फॉर्म्युल्याचा वापर केला जातोय.

तृणमूल सरकार लवकरच विधेयक आणणार

पश्चिम बंगालमध्ये २२ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशानाच्या दुसऱ्या सत्रास सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान एक विधेयक सादर केले जाणार आहे. या विधेयकानुसार पश्चिम बंगालमध्ये १५ एप्रिल हा ‘पश्चिम बंगाल दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. १५ एप्रिल हा दिवस बंगाली नववर्ष आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालदेखील लवकरच आपले स्वत:चे राज्यगीत निश्चित करणार आहे. त्याचाही प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे.

राज्यपालांनी साजरा केला होता पश्चिम बंगाल दिन

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राजभवनात २० जून हा दिवस पश्चिम बंगाल स्थापना दिन म्हणून साजरा केला होता. याआधी साधारण वर्षभरापूर्वी भाजपाने हा दिवस संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जावा, अशी मागणी याआधी केली होती. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी सरकारने यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. राज्यपालांनी स्वत:च हा निर्णय घेतला असून राज्य सरकारची ही भूमिका नाही, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले होते.

तृणमूल काँग्रेसची भूमिका काय?

पश्चिम बंगाल दिन साजरा करण्याच्या मुद्द्यावरून तेव्हा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पाहायला मिळाला होता. कारण तृणमूल काँग्रेसच्या दृष्टीने या दिवशी म्हणजेच २० जून १९४७ रोजी पश्चिम बंगाल राज्याची फाळणी झाली होती. याच दिवशी मोठा संहार झाला. अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा दिवस पश्चिम बंगालच्या विभाजनाचे प्रतिक असल्यामुळे तो साजरा करू नये, असे तृणमूलला वाटते.

ममता बॅनर्जींनी लिहिले होते राज्यपालांना पत्र

मात्र राज्यपालांनी राजभवनात २० जून हा दिवस पश्चिम बंगाल दिन म्हणून साजरा केला होता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी तीव्र आक्षेप व्यक्त करणारे एक खमरीत पत्र राज्यपालांना लिहिले होते. “पश्चिम बंगाल राज्याची कोणत्याही एका दिवशी स्थापना झालेली नाही. २० जून रोजी तर ती नक्कीच झालेली नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पश्चिम बंगाल राज्य स्थापनेचा असा कोणताही दिवस साजरा करण्यात आलेला नाही,” असे ममता बॅनर्जींनी आपल्या पत्रात नमूद केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यात काहीही गैर नाही, भाजपाची भूमिका

तर दुसरीकडे तेव्हा तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीदेखील राज्यपालांवर सडकून टीका केली होती. राज्यपाल पश्चिम बंगालच्या इतिहासाचा अपमान करत आहेत, असे घोष म्हणाले होते. सीपीएम पक्षानेदेखील तेव्हा राज्यपालांवर हल्लाबोल केला होता. भाजपा इतिहासाची मोडतोड करत आहे, असे सीपीएमने म्हटले होते. दुसरीकडे भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी २० जून रोजी पश्चिम बंगाल दिन साजरा करण्यास काहीही गैर नसल्याची भूमिका घेतली होती.