scorecardresearch

“…तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदींचा नक्की पराभव होणार,” ममता बॅनर्जींचा दावा!

ईशान्येतील मेघालय राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे येत्या २७ फेब्रुवारी रोजी ६० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

mamata banerjee in meghalaya elections
ममता बॅनर्जी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ईशान्येतील मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे २७ फेब्रुवारी रोजी ६० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये प्राबल्य असलेल्या तृणमूल काँग्रेसनेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी येथे प्रचारासाठी उतरल्या आहेत. दरम्यान, त्यांनी येथील जनतेला संबोधित करताना मोठे विधान केले आहे. ईशान्येतील जनतेने आम्हाला मत केल्दियास २०२४ साली नरेंद्र मोदींचा नक्कीच पराभव होईल, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

मी मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशा सर्वच धार्मिक स्थळांमध्ये जाते

मेघालयमधील राजबाला येथे ममता बॅनर्जी एका जाहीर सभेला संबोधित करत होत्या. येथे मुकूल संगामा हे तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. यावेळी प्रचारसभेत बोलताना त्यांनी भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. “या राज्यातील सीमाभागात रोजच गोळीबार होतो. मात्र आतापर्यंत किती केंद्रीय पथकं इथे पाठवण्यात आली. कालच बीएसएफच्या एका महिला जवानावर अत्याचार झाला, असे मी ऐकले आहे. आम्ही प्रत्येक धर्मावर प्रेम करतो. मी मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशा सर्वच धार्मिक स्थळांमध्ये जाते. सर्वांसोबत एकत्रितपणे राहणे हाच सर्वांत मोठा धर्म आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक सन साजरा करतो,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

तुम्ही तृणमूल काँग्रेसला मत दिले तर…

“आपण भाजपाविरोधात युद्ध लढत आहोत. रोजच भाजपा आमच्या दारात ईडी तसेच सीबीआय पाठवते. मेघालयचा राज्यकारभार कोण हाकणार? दिल्ली मेघालयमधील राज्यकारभार हाकणार का?” असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच “आम्ही तुमचे शेजारी आहोत. आम्ही तुमची काळजी घेऊ. बंगालमध्ये लागू केलेली प्रत्येक योजना मेघालयमध्येही आणू. तुम्ही तृणमूल काँग्रेसला मत दिले, तर २०२४ च्या लोकसभी निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, याची मी खात्री देते,” असे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 22:16 IST