Manipur Violence Reason : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ महिन्यांनंतर पहिल्यांदाच शनिवारी (१३ सप्टेंबर) हिंसाग्रस्त मणिपूर राज्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी चुराचांदपूर येथील एका शिबिरातून राज्यातील विविध संघटनांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले. मणिपूरसारख्या संघर्षग्रस्त राज्याला शांतता आणि समृद्धीचे प्रतीक करण्यासाठी केंद्र सरकार काम करीत आहे, अशी ग्वाहीदेखील पंतप्रधानांनी दिली. मात्र, मोदींच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळल्याचे दिसून आले. दी इंडियन एक्स्प्रेसने त्या संदर्भातील वृत्त दिले आहे. नेमकी काय आहेत हिंसाचार उफाळण्याची कारणे? त्याबाबत जाणून घेऊ…
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार का उफाळला?
दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात रविवारी (१४ सप्टेंबर) हिंसाचार उसळला. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी चुराचंदपूरमध्ये करण्यात आलेल्या सजावटीची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली होती. मात्र, हे दोन्ही तरुण निर्दोष असून, त्यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात आलं आहे, असा आरोप स्थानिकांनी केला. पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे स्थानिकांनी थेट रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली.
संतप्त आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक
रविवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही तरुणांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. यादरम्यान काही आंदोलकांनी थेट पोलिस ठाण्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. चुराचांदपूर जिल्ह्यात कुकी-झो समुदायाची संख्या सर्वाधिक आहे. रविवारच्या आंदोलनादरम्यानच्या काही आंदोलक रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) च्या जवानांवर दगडफेक करतानाचे व्हिडीओ समोर आले. यावेळी काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या. या गोंधळानंतर पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
आणखी वाचा : PM Modi Manipur: सुभाषचंद्र बोस, स्वतंत्र भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर; नेमके काय आहे हे समीकरण?
न्यायालयाकडून दोन्ही तरुणांना जामीन
दरम्यान, अटकेत असलेल्या व्यक्तींची सुटका करायची असेल, तर ती कायदेशीर मार्गानेच होईल, अशी समज पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्यानंतर काही आंदोलकांनी वकिलामार्फत थेट जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्या अर्जावर तत्काळ सुनावणी घेऊन रविवारी सायंकाळपर्यंत दोन्ही तरुणांना जामीन मंजूर केला. सध्या जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता असून, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. दुसरीकडे स्थानिक संघटनांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या काही नेत्यांनी केली आहे.
मणिपूरमध्ये गुरुवारी रात्री काय घडलं होतं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चुराचांदपूरमध्ये सजावट केली होती. मात्र, गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी या सजावटीची तोडफोड आणि जाळपोळ केली. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास दोन तरुणांना अटक केली. पोलिस व स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. पीअरसनमुन भागात घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच चकमक झाली आणि नंतर दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी रात्रीच्या या तणावानंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती आटोक्यात आली. स्थानिक सामाजिक संघटनांनी तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शांततापूर्ण वातावरण राखण्याचे आवाहनही केले. शनिवारी पंतप्रधान मोदींचा दौरा कोणत्याही अडचणीशिवाय पार पडला.
हेही वाचा : Shivsena-BJP Controversy : भारत-पाकिस्तान सामन्यावरून रणकंदन; उद्धव ठाकरेंनी भाजपाला कसं लक्ष्य केलं?
हिंसाचारापासून दूर राहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन
चुराचांदपूर जिल्ह्यातील सभेतून उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मणिपूर ही आशा आणि आकांक्षांची भूमी आहे. दुर्दैवानं या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडली. विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या ११ वर्षांत ईशान्येकडील राज्यांतील अनेक संघर्ष आणि वाद सोडवले गेले. त्यानंतर येथील लोकांनी शांतीचा मार्ग निवडला, तसेच विकासाला प्राधान्य दिलं. मणिपूरच्या नावात ‘मणि’ असून, येणाऱ्या काळात हे रत्न संपूर्ण ईशान्य भारतासाठी चमकणार आहे. केंद्र सरकार मणिपूरला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मी आज तुमच्या सर्वांमध्ये आहे. राज्यातील विविध संघटनांनी हिंसाचारापासून दूर राहायला हवं. केंद्र सरकार मणिपूरमधील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.”
“तुमचा राजधर्म कुठे आहे?” काँग्रेसची भाजपावर टीका
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये स्वत:च्या स्वागतासाठी भव्य सोहळा आयोजित केला. त्यांची ही कृती येथील पीडितांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार आहे,” अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ’तुमच्या स्वत:च्या शब्दांत… तुमचा राजधर्म कुठे आहे’ असा प्रश्नही खरगे यांनी ‘एक्स’वरून पंतप्रधानांना विचारला. मोदी यांच्या दोन वर्षे उशिराने झालेल्या मणिपूर दौऱ्यावर काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनीही शनिवारी टीका केली. मोदींचा हा दौरा येथील नागरिकांऐवजी स्वत:च्या प्रतिमेवर जास्त भर देणारा होता, असा आरोप गोगोई यांनी केला.