मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह असंख्य मराठा आंदोलकांनी गेल्या आठवड्यात मुंबई गाठली. आझाद मैदानासह आजूबाजूच्या परिसरात सलग तीन दिवस मराठ्यांनी आंदोलने केली. सोमवारी (१ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात या आंदोलनाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. वैधानिक मागणीसाठी मराठा आंदोलकांना आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी मुंबईकरांना वेठीस धरण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला. मुंबईकरांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी जरांगे यांच्यासह आंदोलनाच्या आयोजकांना न्यायालयाने मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत मुदत दिली. त्यानंतर मराठा आंदोलकांचं नेमकं काय चुकलं याची चर्चा सुरू झाली. त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…
मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनासाठी पोलिसांनी सुरुवातीला केवळ एक दिवसाची परवागी दिली होती. त्याचबरोबर पाच हजार आंदोलक आणि १५०० वाहने मुंबईत आणण्याची अट घातली होती. आम्ही शांततेत आंदोलन करू, अशी हमीही जरांगे पाटील यांनी पोलिसांना दिली होती; पण मुदत संपूनही जरांगे यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. इतकंच नव्हे, तर त्यांनी आंदोलन तीव्र करून राज्यभरातील लाखो मराठ्यांना मुंबईत दाखल होण्याचं आवाहनही केलं. त्यानंतर असंख्य मराठा आंदोलकांनी विशेष करून दक्षिण मुंबईतील रस्ते, शिवाजी छत्रपती महाराज स्थानक, मंत्रालय, हुतात्मा चौक परिसरातील रस्त्यांवरच ठिय्या मांडला. परिणामी वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
मराठा आंदोलकांचं काय चुकलं?
कुणालाही त्रास न देता आपल्याला शांततेच्या मार्गानेच आंदोलन करून आरक्षण मिळवायचं आहे, असं मनोज जरांगे पाटील आंदोलकांना वारंवार सांगत होते. मात्र, काही मराठ्यांनी त्यांच्या आवाहनाकडे कानाडोळा केल्याचं सांगितलं जातं. आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी असतानाही अनेक मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावरील फलाटांचा जणू ताबाच घेतला होता. जेवण्यासाठी रात्री झोपण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी सीएसएमटी स्थानक हे मराठा आंदोलनाचं केंद्र झालं होतं. फलाटांवर हलगीच्या तालावर नाचणं, गोंधळ घालून लोकल रेल्वेच्या मार्गात अडथळा आणणं, असे प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओंमधून दिसले.

रस्त्यावरच ठिय्या मांडल्यामुळे वाहतूक कोंडी
राज्य सरकारनं आमच्यासाठी कोणतीही सोई-सुविधा उपलब्ध केली नाही, तसेच परिसरातील हॉटेल्सही बंद ठेवली आहेत, असा आरोप करीत शनिवारी काही मराठ्यांनी थेट मुंबई महापालिकेसमोरच ठिय्या मांडला होता. काहींनी पालिकेसमोर शेगडी पेटवत नाश्ता बनवला, तर काहींनी थेट कृत्रिम तलाव उभारून त्यात अंघोळ केली. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येत असलेले प्रयत्नही अयशस्वी ठरले. अखेर त्यांनी मनोज जरांगे यांना याबाबत माहिती दिली आणि त्यांच्या आवाहनानंतर आंदोलक बाजूला झाल्याने साडेचार तासांनंतर वाहतूक कोंडी फुटली.

बस, रस्तारोधकांवर चढून आंदोलकांचा निषेध
शनिवारी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या बेस्ट बसच्या टपावरून चढून काही आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. तसेच मुंबई महापालिकेच्या समोरील सिग्नलच्या खांबावर, पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेड्सवर चढून काही आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे महानगरपालिकेने उभारलेल्या सेल्फी पॉईंटसमोर कपडे काढून आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे मुंबईकरांमध्ये निर्माण झालेली मराठा आंदोलकांविषयीची सहानुभूती कमी झाल्याचं सांगितलं जातं.

मराठ्यांचा कबड्डी अन् क्रिकेटचा खेळ
एकीकडे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असताना दुसरीकडे मात्र काही आंदोलक सीएसएमटी रेल्वेस्थानकाबाहेर कबड्डी आणि क्रिकेट खेळताना दिसले. त्याच वेळी काही आंदोलक तर थेट ताज हॉटेलबाहेर गोंधळ घालताना दिसून आले. पाणी द्या, पाणी द्या, आम्ही तुम्हाला पैसे देतो, असे म्हणत ते ताज हॉटेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना डिवचत होते. नरिमन पॉइंट परिसरातील समुद्रकिनाऱ्याजवळ पोलिसांनी मोठ्या संख्येने रस्तारोधक लावले आहेत; पण या रस्तारोधकाची गाडी करून, अनेक मराठे त्यावर बसलेले होते. चौथ्या दिवशीही शहरात गोंधळाचे वातावरण असल्याने त्याचा फटका मात्र मुंबईकरांना बसत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत होती.

मुंबईतील पर्यटनस्थळी मराठ्यांचे जथे
आंदोलनासाठी आलेल्या मराठ्यांनी ‘मुंबई आपलीच आहे, फिरून घ्या,’ असं म्हणत पर्यटन केलं. रविवारी आझाद मैदानावरील गर्दी कमी होती; पण शहरातील चौपाट्या, नरिमन पाईंट, मरीन ड्राइव्ह, जुहू येथील इस्कॉन मंदिर, हाजी अली दर्गा, महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, गेटवे ऑफ इंडिया आदी ठिकाणांवर मराठ्यांचे जतेच्या जथे दिसून आले. हलगी आणि झांज वाजवत तसेच नाचत मराठा आंदोलकांनी मुंबई पाहण्याचा आनंद लुटला. दिवसभर फिरल्यानंतर पुन्हा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आश्रयाला आले आणि तिथेही गोंधळ निर्माण झाला.
मराठा आंदोलक रेल्वे रुळांवर
सोमवारी दुपारी सीएसएमटी रेल्वेस्थानकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच, काही आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले होते. यावेळी काहींनी लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून, ‘एक मराठा, लाख मराठा’चे फलक नाचवले. परिणामी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिरानं धावली. तर, हार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटं उशिरानं सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.

न्यायालयाने मराठा आंदोलकांना काय निर्देश दिले?
मुंबईत काही मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्यानं राज्य सरकारच्या वतीनं हाच मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्यात आला. त्यावर न्यायालयानं संताप व्यक्त करीत वैधानिक मागणीसाठी मराठा आंदोलकांना आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी मुंबईकरांना वेठीस धरण्याचा अधिकार नाही, असे ताशेरे ओढले. हेच तुमचे शांततापूर्ण आंदोलन आहे का? आंदोलनस्थळ सोडून इतरत्र का भटकत आहात? अशी विचारणा न्यायालयान केली. तुमच्या या अशा आंदोलनामुळे संपूर्ण दक्षिण मुंबई ठप्प झाली आहे, असे खडेबोलही सुनावले. तसेच मुंबईकडे येणाऱ्या इतर आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखा, असे आदेश न्यायालयानं सरकारला दिले.

मराठा आंदोलक आरोपी नाहीत : वकील श्रीराम पिंगळे
दरम्यान, न्यायालयात मनोज जरांगे यांची बाजू मांडणारे वकील श्रीराम पिंगळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मराठा आंदोलन शांततेतच सुरू आहे; पण काही समाजकंटक या आंदोलनात घुसले आहेत. त्यांचा आंदोलन भरकटवण्याचा डाव आहे. रेल्वे रुळांवर उतरणारे, रस्त्यात धिंगाणा घालणारे, तसेच महिला पत्रकारांची छेड करणारे मराठा आंदोलक नाहीत. जरांगे पाटील यांनी न्यायालयाच्या नियमांचं पालन करायला सांगितलं आहे. मराठा आंदोलक हे आरोपी नाहीत, त्यांना सरकारनं अन्न, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा देणं गरजेचं होतं. आता जरांगे पाटील पुढील निर्णय घेतील.” दरम्यान, मराठा आंदोलनप्रकरणी आज पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे- आझाद मैदानावर उपोषण करणारे जरांगे पाटील यांना पोलिसांनी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जरांगे आपलं उपोषण सुरूच ठेवणार की माघार घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.