जयेश सामंत
नवी मुंबई : भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्षपद आपल्या मुलाच्या पदरात पडताच राज्याचे माजी मंत्री आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे पक्षाचे आमदार गणेश नाईक नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघात पुन्हा एकदा सक्रिय झाले असून मंगळवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शहरातील संपूर्ण १११ महापालिका प्रभागांसाठी त्यांनी आयोजित केलेल्या विशेष जनता दरबारामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिकेतील १११ प्रभागांपैकी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक जागा या बेलापूर विधानसभा मतदारसंघात मोडतात. या मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि गणेशदादांमधील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रूत आहे. असे असताना नाईकांच्या या जनता दरबारामुळे भाजपच्या गोटातही तर्कवितर्कांना उधाण आले असून मंदाताई समर्थक सावध झाल्याचे पहायला मिळत आहेत.
बेलापूर विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी गणेश नाईक यांचा बालेकिल्ला राहीला आहे. २००९ मध्ये मतदारसंघांची पुर्नरचना झाली आणि नवी मुंबईत बेलापूरसह ऐरोली असे दोन विधानसभा मतदारसंघ तयार झाले. ऐरोलीत नाईकांच्या मुशीतून तयार झालेले विजय चौगुले यांचे तगडे आव्हान असतानाही गणेशदादांनी बेलापूर या वाशी ते बेलापूर मधील उपनगरांचा मिळून तयार झालेल्या विधानसभा क्षेत्रातून रिंगणात उतरणे पसंत केले आणि तेथून ते निवडूनही आले. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तयार झालेल्या भाजपच्या लाटेत मात्र नाईकांचा कट्टर प्रतिस्पर्धी मंदा म्हात्रे यांच्यासमोर अडीच हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. हा पराभव नाईकांच्या जिव्हारी लागला आहे. पुढे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करताना नाईकांच्या वाट्याला नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघ येतील हा अंदाज मात्र भाजप श्रेष्ठींनी खोटा ठरविला. बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गणेशदादांना लगतच्या ऐरोली मतदारसंघात उडी मारावी लागली. येथून विजयाची हॅट्रीक करण्याच्या तयारीत असलेले त्यांचे सुपूत्र संदीप यांचेही स्वप्न त्यामुळे भंगले.
हेही वाचा >>>विश्वजीत कदम यांचे नेतृत्व वसंतदादांचे वारसदार मानणार का ?
गणेशदादांची बेलापूरवर नजर ?
राज्यात मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर गणेश नाईकांचा राज्य मंत्रीमंडळात समावेश होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. जिल्ह्यातून रविंद्र चव्हाण या एकमेव चेहऱ्याला संधी देताना भाजप श्रेष्ठींनी नाईकांना सध्या तरी ही संधी दिलेली नाही. मात्र दोन महिन्यांपुर्वीच पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी संदीप नाईक यांना संधी देत संपूर्ण शहराची पक्षीय सुत्र पुन्हा एकदा नाईक कुटुंबियांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वीच पक्षाच्या खासदार, आमदारांची एक बैठक मुंबईत घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित खासदार, आमदारांना पक्षाच्या सर्वेक्षणातून आलेली माहिती देण्यात आली. या बैठकीनंतर गणेश नाईक यांनी तातडीने संपूर्ण शहरासाठी जनता दरबाराचे आयोजन केल्याने येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंगळवारी सकाळी वाशीतील भावे नाट्यगृहात गणेशदादांनी संपूर्ण १११ प्रभागांसाठी जनता दरबार बोलाविला आहे. असा दरबार ते मंत्रीपदी असताना बोलवित. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रभागांमधील लोकप्रतिनिधी, नागरिक यांनाही या दरबारात आमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय महापालिका, सिडको, महावितरणचे अधिकारी यांनाही याठिकाणी पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीमुळे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांमध्ये चलबिल सुरु झाली असून ताईंच्या मतदारसंघात दादांचा हा जाहीर जनता दरबार नवी मुंबईत नवे राजकीय रंग भरु लागला आहे.
हेही वाचा >>>भाजपाच्या मित्रपक्षाची राजस्थान निवडणुकीत उडी; युती न झाल्यास जेजेपी स्वबळावर लढणार
गणेश नाईक हे महाराष्ट्रातील आणि ठाणे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. नवी मुंबईत करोना काळापासून ते अव्याहतपणे काम करताना दिसत आहेत. महापालिकेतील प्रशासकीय प्रमुखांसोबत प्रत्येक महिन्याला बैठक घेत त्यांनी संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांच्या हिताचे अनेक प्रश्न मांडले आहेत आणि सोडवून घेतले आहेत. त्यामुळे मंगळवारी त्यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होईल. याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.
अनंत सुतार, नेते भाजप