सोलापूर : प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी डावलल्याने संतापलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपच्या विरोधात बंड करीत थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला व रिंगणात उतरले आहेत. राजकारणात मोहिते-पाटील कुटुंबीयांचे हे पहिलेच बंड झाले नसून तर यापूर्वीही त्यांनी एकदा तत्कालीन राष्ट्रवादीत राहून भाजपच्या तिकिटावर सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना निवडून आणले होते.

हे बंड २००३ सालचे असून आश्चर्याची बाब अशी की, त्यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे उपमुख्यमंत्री तर त्यांच्याच सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी सुशीलकुमारांचे सहकारी आनंदराव देवकते यांना पराभूत केले होते. या पराभवामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अस्वस्थ झाले होते. त्यावेळी पवार आणि मोहिते-पाटील यांच्यात झालेले शीतयुद्ध महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजले होते.

हेही वाचा – डाव्यांची साथ नसल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसणार ?

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे धाकटे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी तसे पाहता सुरूवातीला १९९७ साली तत्कालीन सेना-भाजप युती सरकारच्या काळात कुटुंबांतर्गत बंड केले होते. त्यावेळी त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडून थेट भाजपमध्ये जाऊन सहकार खात्याचे राज्यमंत्रिपद मिळविले होते. तेव्हा मोहिते-पाटील कुटुंबीयांनी फारसे आडेवेडे न घेता प्रतापसिंह यांना मोकळीक दिली होती. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर विजयसिंह मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत जाणे पसंत केले असताना प्रतापसिंह मोहिते-पाटील हे मात्र भाजपमध्येच राहिले होते.

याच पार्श्वभूमीवर पुढे योगायोगाने सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे एकाच सोलापूर जिल्ह्यातील दोघे दिग्गज नेते अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे सुशीलकुमारांनी सोलापूर लोकसभेची खासदारकी सोडली होती. नंतर रिक्त झालेल्या सोलापूर लोकसभेच्या जागेची पोटनिवडणूक झाली असता सुशीलकुमारांसाठी आमदारकीचा त्याग केलेले काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री आनंदराव देवकते यांना शरद पवार यांच्या इच्छेनुसार सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली. तेव्हा भाजपने प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना रणांगणात आणले. तेव्हा विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या कुटुंबीयांपुढे मोठे धर्मसंकट निर्माण झाले असता विजयसिंह यांना उघडपणे मैदानात उतरणे शक्य नव्हते. मात्र त्यांचा अपवाद वगळून उर्वरीत मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपच्या बाजूने बंधू प्रतापसिंह यांच्या पाठीमागे भक्कम ताकद उभी केली. त्यावेळी शरद पवार यांच्यावर एवढी परिस्थिती ओढवली की ते सोलापुरात देवकते यांच्या प्रचारासाठी इच्छा असूनही जाऊ शकले नव्हते. मोहिते-पाटील यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला होता.

हेही वाचा – भिवंडीत आगरी-कुणबी मतांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे प्रतापसिंह मोहिते-पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि त्यांचा राजकीय प्रवास लयास जात असताना मोहिते-पाटील कुटुंबीयांमध्ये त्यांची वाट वेगळी झाली. तद्पश्चात विजयसिंह मोहिते-पाटील यांचा राष्ट्रवादीत संघर्ष वाढत गेला. परिणामी, त्यांना मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये जाणे भाग पडले. गेल्या पाच वर्षात मोहिते-पाटील यांचा भाजपमध्येही संघर्ष सुरू झाला. त्यातूनच भाजपने माढा लोकसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे विजयसिंहांचे पुतणे धैर्यशील यांना अर्थात कुटुंबीयांसह भाजपच्या विरोधात बंड करून पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात घरवापसी करावी लागली. मोहिते-पाटील कुटुंबीयांचे गेल्या २१ वर्षांच्या फरकाने झालेले पहिले बंड काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी धर्माच्या विरोधात भाजपला बळकटी देणारे होते. तर आताचे दुसरे बंड सत्ताधारी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूने ठरले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा विचित्र योगायोग मानला जातो.