परंडा तालुक्यातील वडनेर नावाच्या गावात दोन वर्षाची मुलगी,तिचे आई – वडील आणि एक आजी २४ तासापासून पुराच्या पाण्यात वेढलेली. या मंडळींना बाहेर काढण्यासाठी लष्कर, राष्ट्रीय आपत्ती पथकातील जवानांच्या मदतीला एक खासदार उशिरा रात्रीपर्यंत पाण्यात उभा होता. हातात दोर घेऊन गावकऱ्यांबरोबर तो दोर खेचत होता. माणसे सुखरुप सुरक्षित स्थळी आली आणि सगळ्यांनी ज्यांचं कौतुक केलं ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर. लढवय्या ही वृत्तीच असल्याने ओम राजेनिंबाळकर हे कधी शेताच्या बांधावर दिसतात तर कधी पूरग्रस्तांना घरातून बाहेर काढताना दिसतात.
आपण लोकप्रतिनधी असतो तरी त्याचा भपका न करता ‘ सर्वसामांन्यांमध्ये मिळसणारा’ अशी त्यांनी त्यांची प्रतिमा बनली आहे. कोणाचाही दूरध्वनी येवो, तो उचलून त्याला समाधान वाटेल असे बोलणारा नेता अशी त्यांची धाराशिव जिल्ह्यात प्रतिमा आहे. गाडीची काच खाली करता निघून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या गर्दीत ओम राजेनिंबाळकर मात्र उठून दिसत आहेत.
वडील पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर राजकारणात आलेल्या ओम राजेनिंबाळकर तेव्हा अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गाला शिकत होते. तेथून आल्यानंतर तेरणा साखर कारखान्यातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. २००७ मध्ये त्यांनी तेरणा साखर कारखाना निवडणुकीमध्ये यश मिळवले. तेव्हा डॉ. पद्मसिंह पाटील यांची या कारखान्यावर पकड होती. साखर घोटाळा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कारखान्यात घोळ झाल्याचे आरोप तेव्हा होते. साखर कारखान्यातील अनेक गैरप्रकार तेव्हा कॉग्रेसचे नेते नानासाहेब पाटील यांनी चव्हाट्यावर मांडायला सुरुवात केली होती. याचा लाभ ओम राजेनिंबाळकर यांना झाला.
तेरणा साखर कारखान्यात विजय मिळविल्यानंतर त्यांनी २००९ च्या निवडणुकीमध्ये राणा जगजीतसिंह पाटील यांचा १९९६५ मतांनी पराभव केला. पुढे २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये पाच लाख ९१ हजार ६०५ मते मिळवली. आणि २०२४ मध्ये ते ३ लाख २६ हजार ८९८ मतांच्या फरकाने निवडून आले. हे सारे करत असताना गावागावातील तरुणांशी त्यांनी संपर्क वाढवला. एखाद्या गावात तरुण मुले क्रिकेट खेळत असतील तर त्यात सहभागी व्हायचे. गावात एखाद्याने कीर्तना बोलावले तरी जायचे आणि मरणा – तोरणालाही हजर रहायचे.येणाऱ्या प्रत्येकाचा दूरध्वनी घेत होईल तेवढी मदत करायची असा त्यांच्या कामाचा भाग.
प्रसंगी अधिकाऱ्यांशी भांडताना, राजकीय पटलावर वेगळयाच पद्धतीने लढताना ते दिसतात त्यामुळे लढवय्या खासदार अशी बिरुदावली त्यांना लावली जात आहे. वडनेरच्या पुरातून चौघांना बाहेर काढण्याविषयीच्या प्रसंगाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘ हेलिकॉप्टरने २७ जणांना बाहेर काढल्यानंतर ते खराब हवामानामुळे परत येऊ शकले नाही. जवानांची एक चमू घटनास्थळी पोहचला होता. वडनेरची स्थिती पाहण्यासाठी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पोहचलो होते. तेरणा नदीला पाणी आल्यावर शेतातून मोटारी काढण्यासाठी पूर्वी छातीएवढ्या पाण्यात आम्ही उतरत होतो. चांगले पोहता येत असल्याने आपण मदत करू, असा विश्वास होता.
नेमके जवानांची बोट बंद पडली. त्यामुळे त्यांनी बांधलेली दोर काढावी, असा संदेश आला. पाण्याला वेग चांगला होता. पण पोहता येणाऱ्या गावातील दोघा- चौघांना बरोबर घेतले. एक मोठा ओंडका दुसऱ्या झाडात अडकला आणि दोर सोडवली. तोपर्यंत बोट सुरू झाली आणि बंदही झाली. एक पाणी पुरवठा शुद्धीकरणाच्या टाकीला बोट अडली. तो बोट ओढून काढली. सगळे वाचले याचा आनंद आहे. ’ संकट आल्यावर मागेपुढे पहायचे नसते, अशा वेळी मदत करायची नाही तर कधी करायची, एवढेच डोक्यात होते. चांगल्या कामाला देवही सहकार्य करतो. ते चारजण वाचले.