BJP Strategy of Mumbai Municipal Election : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने एका मोठा राजकीय डाव टाकला. गेल्या महिन्यात पक्षाने मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा आमदार अमित साटम यांच्याकडे सोपवली. ४९ वर्षीय साटम हे मराठा नेते असून, त्यांची राजकीय शैली आक्रमक आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला शह देण्यासाठी भाजपाने साटम यांची नियुक्ती केल्याचे सांगितले जाते. दी इंडियन एक्स्प्रेसच्या टाउन हॉल कार्यक्रमात मुंबई भाजपाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी आगामी महापालिका निवडणूक आणि पक्षाचा निवडणूक कार्यक्रम या विषयावर परखड मते मांडली. त्या संदर्भातील हा आढावा…
प्रश्न : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपासमोर कोणती आव्हाने आहेत?
अमित साटम : “आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आमच्या आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचून आमची विकासकामे सांगणार आहोत. गेल्या ११ वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने मुंबईमध्ये मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड यांसारखी कामे केली आहेत. याच प्रकारची कामे महापालिकेतूनही व्हावीत, अशी अपेक्षा मुंबईकरांना आहे. आतापर्यंत मुंबईकरांनी फक्त महापालिकेचा भ्रष्ट कारभार पाहिला आहे. स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन उभारणे हा आमचा उद्देश आहे. त्याचबरोबर मुंबईकरांच्या सुरक्षिततेची हमी देणे हेदेखील महत्त्वाचे आहे.”
प्रश्न : २०१७ पर्यंत भाजपा एकसंध शिवसेनेबरोबर होता, मग आपल्यालाही या स्थितीसाठी का जबाबदार धरू नये?
अमित साटम : “२०२२ पर्यंत मुंबई महापालिकेत ना भाजपाचा स्थायी अध्यक्ष होता, ना महापौर. ही दोन्ही पदे नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे होती. महापालिकेचे कामकाज स्थायी समिती, महापौर आणि महापालिका आयुक्तांमार्फत चालवले जाते. अशा वेळी शहराला योग्य दिशा देण्याची जबाबदारी ठाकरे यांच्या शिवसेनेची होती. परंतु, त्यांच्या राजकीय नेतृत्वाला शहराची विकासकामे करता आलेली नाहीत. आज महापालिकेचे नाव नकारात्मक गोष्टींशी जोडले गेले आहे आणि ही प्रतिमा बदलणे हेच आमच्यासमोरील पहिले आव्हान आहे.”
प्रश्न: महापालिका निवडणुकीत तुमच्या पक्षाचा मुख्य निवडणूक अजेंडा काय असेल?
अमित साटम : “विकास आणि प्रशासनातील पारदर्शकता हा आमचा मुख्य अजेंडा असेल. आज मुंबईसमोर नागरिकांची सुरक्षितता आणि शहराची ओळख जपण्याचे मोठे आव्हान आहे. पाश्चात्त्य देशांमधील कट्टरपंथीयांनी शहरांचा रंग बदलून टाकला आहे. तिथे एक तर लोक गप्प राहिले किंवा राजकीय नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही मुंबईचे असे होऊ देणार नाही. आर्थिक राजधानीचे रक्षण करणे आणि तिचा ‘रंग’ बदलू न देणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही मुंबईकरांबरोबर चर्चा करून, त्यांनी सुचवलेले मुद्दे आमच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करणार आहोत. आमचा महापौर निवडून आल्यावर हे सुचवलेले मुद्दे प्रत्यक्षात राबवले जातील.”
प्रश्न : तुमच्या मते, जर मुंबईचा ‘रंग’ धोक्यात असेल, तर तिचा ‘मूळ रंग’ काय होता?
“जेव्हा महिला सोन्याचे दागिने घालून रस्त्यावर सुरक्षितपणे फिरत होत्या आणि त्यांना सुरक्षित वाटत होते, तोच मुंबईचा मूळ रंग आहे. हेच शहराचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचे रक्षण करणे हे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान आहे,” असे अमित साटम यांनी स्पष्ट केले.
प्रश्न : तुम्ही ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहात, त्यातील बरेच जण तुमचा मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाहीत का?
“भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काहीच नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलेले आहेत. शेवटी दृष्टी महत्त्वाची असते. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईला योग्य दिशा आणि विकासाच्या वाटेवर नेणार आहोत,” असे साटम म्हणाले.
प्रश्न: मुंबईला बहुसांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या प्रतिमेत बदल झाला असेल, तर जबाबदार कोण?
“हा मुद्दा अल्पसंख्याकांचा नाही, तर राष्ट्रवादी भावनांचा आहे. बॉम्बस्फोटात दोषी ठरलेली व्यक्ती निवडणुकीत एका विशिष्ट उमेदवारासाठी प्रचार करीत असेल, तर ते कसे सहन केले जाऊ शकते? आम्ही लोकसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’ पाहिले आहे. मालवणीमध्ये एकरभर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून झोपडपट्ट्या व बेकायदा स्टुडिओ उभारले गेले आहेत. जर कोणी शहराचे स्वरूप आणि ओळख बदलण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जातील,” असे उत्तर साटम यांनी दिले.
प्रश्न: मुस्लीम मतांच्या एकत्रीकरणाला त्या गोष्टीशी जोडणे योग्य आहे का?
अमित साटम : “परदेशातून आलेल्या लोकांना शहरात बेकायदा वसवून त्यांना मतदार करण्याचा पॅटर्न आम्ही ओळखला आहे. जेव्हा आम्ही या बेकायदा स्थलांतरितांविरोधात कारवाई करतो, तेव्हा आम्हाला जातीयवादी म्हटले जाते. आम्हाला भारतमातेविषयी प्रेम आहे. जर समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न केला गेला, तर आम्ही त्याविरोधात ठाम भूमिका घेऊ.”

प्रश्न : मराठा आरक्षणाच्या नव्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल, अशी भीती ओबीसी नेत्यांना आहे. त्याबाबत भाजपाची भूमिका काय?
“मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील शासन निर्णय स्पष्ट आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होत नाही. काही लोकांमध्ये चुकीची धारणा निर्माण झाली असेल, तर आम्ही वेळोवेळी त्याबाबत स्पष्टीकरण देऊ आणि लोकांपर्यंत खरी माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करू, असे साटम यांनी स्पष्ट केले आहे.
प्रश्न: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महापालिका निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल का?
अमित साटम : “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यास त्याचा मुंबई महापालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण- कोण कोण एकत्र येत आहे हे महत्त्वाचे नाही; गेल्या ११ वर्षांत शहरासाठी कोणी काम केले आणि विकास प्रकल्प पूर्ण केले हे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईकरांनी आम्ही केलेली कामे पाहिली आहेत आणि भविष्यातही त्यांना असाच विकास हवा आहे.”
प्रश्न : महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यामुळे भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते नाराज होणार नाहीत का?
अमित साटम : “प्रत्येक कार्यकर्त्याच्या काही महत्त्वाकांक्षा असतात; पण पक्ष वैयक्तिक महत्त्वाकांक्षेनुसार काम करीत नाही. भाजपाचा कार्यकर्ता हा स्वत:साठी नाही, तर समाजातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करतो. हाच भाजपा आणि इतर पक्षांमधील महत्त्वाचा फरक आहे. आमचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर चांगले संबंध आहेत. जागावाटपाची वेळ आल्यावर आम्ही त्यावर तोडगा काढू. शिंदे यांच्या शिवसेनेकडे मुंबईत पाच आमदार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत तसेच जिल्हाध्यक्षांसोबत बसून जागावाटपावर चर्चा करू. जिथे ज्या पक्षाची जिंकण्याची संधी जास्त आहे, तिथे त्यांना जागा देण्यात येतील.”
प्रश्न: याचा अर्थ मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट ‘धाकटा भाऊ’ असेल का?
अमित साटम : “इथे मोठा-लहान, असा प्रश्नच येत नाही. आम्ही सर्व समान असून, सध्या एकत्र आहोत. मुंबईत महायुतीचाच महापौर होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मुंबईत मजबूत ताकद आहे. गेल्या वेळच्या ८४ पैकी ५४ नगरसेवक त्यांच्याबरोबर आहेत. उरलेले नगरसेवकही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपा किंवा शिंदे गटाची कास धरतील,” असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुढील वर्षी जानेवारीत मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांत नेमकी कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.