नागपूर: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर अध्यक्षपद आपल्या गटाकडे असावे यासाठी नागपूर भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच आहे. विद्यमान अध्यक्ष बंटी कुकडे गडकरी समर्थक मानले जातात. आता आ. प्रवीण दटके  यांचे नाव अचानक या पदासाठी पुढे आले आहे. आ. दटके माजी महापौर आहेत. त्याही पेक्षा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत हे महत्त्वाचे आहे.

दरम्यान शहर अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून तीन नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन नावांपैकी कोणाला अध्यक्ष करायचे याबाबत नेत्यांमध्ये सहमती होत नाही. महापालिका निवडणूक काळात शहर अध्यक्षपद आपल्या गटाकडे राहावे असा आग्रह एका गटाचा आहे. रस्सीखेचे हे सुद्धा एक कारण आहे

२००७, २०१२ आणि २०१७ अशा सलग तीन निवडणुका जिंकून भाजपने १५ वर्ष नागपूर महापालिकेवर सत्ता राखी.  मार्च २०२२ पासून आतापर्यंत प्रशासकीय राजवट सध्या सुरू आहे.  राज्यात भाजप सरकारच असल्याने अप्रत्यक्ष भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला त्यांची सत्ता राखणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना कुठल्याही परिस्थितीत महापालिका निवडणूक जिंकावी लागणार आहे. या प्रक्रियेत पक्षपातळीवर शहर भाजप अध्यक्ष हे पद महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ते आपल्याच गटाकडे असावे, असा भाजपमधील दोन प्रमुख गटांचा प्रयत्न आहे.

महापालिका निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची का?

राज्याच्या राजकारणात भाजपमध्ये महत्त्वाचे असणारे तीन प्रमुख नेते नागपूरचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा याआ तीन नेत्यांमध्ये समावेश आहे. गडकरी नागपूरचे खासदार आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ दक्षिण पश्चिम हा नागपुरातील आहे. त्यामुळे महापालिकेतील विजय हा जसा नेत्यांचा असेल तसाच पराभव झाल्यास तो नेत्यांचा मानला जातो. या पूर्वी पदवीधर मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा  लागला होता. ती नामुष्की महापालिका निवडणुकीत येऊ नये यासाठी ही निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे.

आ. प्रवीण दटके की संजय भेंडे?

महापालिका निवडणुकीत भाजप नेते नितीन गडकरी सक्रिय भूमिका बजावतात. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम मानला जायचा. २०१७ च्या निवडणुकीत असेच चित्र होते. २०१९ नंतर चित्र बदलले. शहर अध्यक्षपदाच्या स्पर्धेत फडणवीस समर्थक आ. दटके यांचे नाव येणे यातच सर्व काही आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षातर्फे शहर अध्यक्षपदासाठी तीन नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली. त्यात आ. प्रवीण दटके, माजी स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर व विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांचा समावेश आहे. संजय भेंडे हे नाव तटस्थ आहे. बोरकर पूर्वी आ. खोपडे समर्थक होते. आता नाही. हे येथे उल्लेखनीय.  शहर अध्यक्षांच्या नावाची आतापर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र पाकसोबत युध्द सुरू झाल्याने ते थांबले, असे पक्षाचे नेते सांगतात. मात्र नेत्यांमध्ये नावाबद्दल एकमत न होणे हे सुद्धा एक कारण असल्याचे सांगितले जाते.