नागपूर : भाजपने पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत भाजपचे सुधाकर देशमुख यांना पराभूत केले होते.

भाजपची बहुप्रतिक्षित उमेदवार यादी सोमवारी जाहीर झाली असून त्यात नागपूरच्या उत्तर, पश्चिम आणि मध्य नागपूर या तीन मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. सुधाकर कोहळे (पश्चिम नागपूर) व आमदार प्रवीण दटके (उत्तर नागपूर) आणि मध्यमधून माजी डॉ. मिलिंद माने यांना संधी देण्यात आली आहे. प्रवीण दटके विधान परिषदेचे सदस्य असून ते पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढत आहेत.

हेही वाचा – विदर्भातील निवडणूक रिंगणात कोण कोणाचे नातेवाईक ?

भाजपने नागपूरसारख्या महत्वाच्या शहरातील तीन नावे पहिल्या यादीत जाहीर केली. पण तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली होती. आज ती जाहीर केली. यावेळीही नागपुरात पांरपरिक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. सुधाकर कोहळे हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी २०१४ मध्ये दक्षिण नागपुरातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. परंतु २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तेव्हापासून ते नाराज होते. नाराजी दूर करण्यासाठी त्यांना नागपूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले. परंतु त्यांची नाराजी दूर झाली नव्हती. आता त्यांना पश्चिम नागपूरमध्ये संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघातील पक्षाचे संघटन आणि त्यांचे कुणबी असणे हे त्यांचे बलस्थान आहे. या आधारावर ते काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचे आव्हान कसे पेलतात ते बघावे लागेल. तर काँग्रेसने पश्चिम नागपूरमध्ये विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. ते लोकसभेत पराभूत झाले होते. परंतु त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिलेली लढत उल्लेखनीय ठरली होती.

हेही वाचा – नवी मुंबईत नाईक विरोधक चक्रव्युहात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ मध्ये प्रथमच काँग्रेसने विकास ठाकरे यांच्या रुपात हा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणला होता. तो कायम ठेवण्याचे आव्हान यावेळी ठाकरेंपुढे राहणार आहे. नगरसेवक, महापौर ते आमदार अशी राजकीय करकीर्द असणारे विकास ठाकरे यांचा पाच वर्षांचा आमदार म्हणून केलेल्या कामाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. मागील दहा वर्षांपासून ते काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत. त्यामुळे मतदारसंघाची केलेली उत्तम बांधणी हे त्यांचे बलस्थान मानले जाते.