Top Five Political News in Today : येत्या काही दिवसांत ५० लाख लोकांची ओबीसीमध्ये बेकायदा घुसखोरी होणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी केला… मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा इशारा दिला… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणासंदर्भात मोठं भाष्य केलं… ठाकरे ब्रँडवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी रिफॉर्मची घोषणा केली… आज दिवसभरात घडलेल्या या पाच महत्वाच्या राजकीय घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

५० लाख लोकांची ओबीसीमध्ये घुसखोरी होणार?

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा नव्या वादाला सुरुवात झाली असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मोठं भाष्य केलं. राज्यातील काही मंत्र्यांच्याच सहभागाने मराठा समाजाला बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ५० लाख लोकांची ओबीसीत घुसखोरी होणार असल्याचं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला. “ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध नाही. परंतु, राज्य सरकारने काढलेल्या या अधिसूचनेमुळे ओबीसी, भटक्या विमुक्त आणि एसबीसी प्रवर्गातील आरक्षण धोक्यात आलं आहे. हा शासकीय अध्यादेश म्हणजे ओबीसींच्या हक्कावर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा आहे. ओबीसी समाजाला नामशेष करण्यासाठी रचलेला घातक कट आहे,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. “सध्या प्रत्येक तहसीलदाराला महिन्याभरात किमान हजार दाखले देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा पद्धतीने तब्बल ५० लाख लोकांची ओबीसीमध्ये बेकायदेशीर घुसखोरी होणार आहे. आजवर किती बोगस प्रमाणपत्रे वाटली गेली याची संपूर्ण श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी,” अशी मागणीही वडेट्टीवर यांनी केली.

मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जरांगेंचा इशारा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध करणाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला. जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढं मराठे खोलात घुसतील असं जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा समाजाने कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही, पण मराठ्यांच्या आरक्षणाला जर विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याला उत्तर देणार असं जरांगेंनी स्पष्ट केलं. अगदी दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिल्लीकडे कूच करण्याचं सूतोवाच केलं होतं. ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण देण्यावर जरांगे ठाम आहेत. सध्या हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटनुसार, राज्य सरकारने कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेही काही मराठा बांधवांना याविषयीचे प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.

आणखी वाचा : BJP Strategy of BMC Election : भाजपासमोर कोणकोणती आव्हानं? ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाला फटका? अमित साटम काय म्हणाले?

नितीन गडकरी यांचं आरक्षणासंदर्भात मोठं विधान

राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या प्रश्नावरून आरोप प्रत्यारोप होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत एक महत्वाचं विधान केलं. “ब्राह्मण समाजाला आरक्षण दिलx नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचे कर्तृत्त्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो, असं गडकरींनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये शनिवारी हलबा महासंघाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान गडकरींनी हे विधान केलं आहे. “आज बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती बरोबर सामाजिक प्रगतीही महत्त्वाची आहे. आरक्षणाचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, मी माझ्या आयुष्यात या ५० वर्षांत सगळ्यात जास्त प्रयत्न नोकऱ्या मिळवून देण्यासाठी केले. एक गोष्टीत आपण यशस्वी झालो की आपण अनेक लोकांच्या नोकऱ्या वाचवू शकलो. आपण त्यामुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष चालू ठेवू. समाजाच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे,” असंही गडकरी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना टोला

‘आमचा ब्रँड आहे’ असे म्हणणाऱ्यांचा बेस्टच्या निवडणुकीत ‘बॅण्ड वाजला’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना अप्रत्यक्ष टोला लगावला. ते भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते. “आमदार अमित साटम यांच्या हाती मुंबई भाजपाची सूत्रे देऊन पक्षाने संघटनेला आक्रमक व तरुण चेहरा दिला आहे. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आणि विरोधकांना भिडण्यास मागे-पुढे पाहत नाहीत”, असे गौरवोद्गार फडणवीसांनी काढले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस यांना ठाकरे ‘ब्रँड’ची चिंता नसून भीती आहे. ठाकरे हाच ब्रँड आहे, असा पलटवार केला. फडणवीस सरकारमधील एकनाथ शिंदे यांच्यावरही राऊतांनी यावेळी टीकास्त्र सोडलं. आतापर्यंत ‘आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हण ऐकली होती, आता ‘आमचा तो ब्रँड दुसऱ्याची ती ब्रँडी’ ही म्हण रुढ झाली तर आश्चर्य वाटायला नको. असा अप्रत्यक्ष टोला राऊतांनी शिंदेंना लगावला.

हेही वाचा : Visual Storytelling : पंतप्रधान मोदींना पुन्हा शिवीगाळ? आईविषयी वापरले अपशब्द? बिहारमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

पंतप्रधान मोदींकडून जीएसटी रिफॉर्मची घोषणा

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत जीएसटी परिषदेने महत्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार जीएसटीमध्ये आता फक्त ५ आणि १८ टक्के जीएसटी असे दोनच स्लॅब असणार आहे. याआधीचा १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब सरकारने संपुष्टात आणल्याने नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आणि या नव्या जीएसटी दर प्रणालीची माहिती दिली. हा बचत उत्सव असून याचा सर्वांना मोठा फायदा होणार होणार असून प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीत स्थान मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. “देशात नवरात्रीचा उत्सव सुरु होत असतानाच नव्या बदलाना आपला देश सामोरा जातो आहे. जीएसटीमधल्या सुधारणा उद्याच्या पहिल्या किरणापासून सुरु होतो आहे. जीएसटी बचत उत्सव सुरु होतो आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी सोप्या पद्धतीने खरेदी करु शकणार आहात,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, दुकानदार, महिला, उद्योजक या सगळ्यांना बचत उत्सवाचा फायदा होणार आहे. सणवार सुरू होत आहेत आणि सगळ्यांचा उत्सव गोड होणार आहे, असंही ते म्हणाले.