Top Five Political News in Today : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांना अजिबात वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना मदत करण्याची मानसिकताच नसल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर पैशांचा महापूर आला असता, असे म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह केद्रीय गृहमंत्री अमित शाहांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातील या पाच महत्वांच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

भ्रष्टाचाराच्या आरोपांना नितीन गडकरींचं प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. एकीकडे इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा गाजत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. गडकरी यांनी टोलच्या माध्यमातून जमा होणारे पैसे स्वतःच्या मुलांच्या कंपनीत वळते केल्याचा दावा दमानिया यांनी केला. आज एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी एकाही कंत्राटदाराकडून कधी एक रुपयाही घेतला नसल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. “माझ्यावर लोकाचा विश्वास असल्याने मी कुठल्याही प्रकारची खोटी कामे केली नाहीत. येणाऱ्या काळात कुणी कितीही आरोप केले, तरी मी विचलित होणार नाही. जनतेला सत्य माहिती असते. राजकारण हे इर्षा आणि अहंकाराचा खेळ असून आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या आशेपोटी अनेकजण खोटे आरोप करतात,” असे गडकरी म्हणाले.

नुकसानभरपाईबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी राज्य सरकारकडे मदतीची याचना करीत आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी मोठी घोषणा केली. राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. मात्र, दुष्काळ पडल्यानंतर जशा सवलती दिल्या जातात तशाच सवलती देणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. “राज्य सरकारने राज्य सरकारने २ हजार २१५ कोटी रूपये वितरित करणे सुरू केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच मदत जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही मदत करत असताना ई-केवायसीची अट शिथील करण्यात आली आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

आणखी वाचा : ‘राहुल गांधी भाजपाचे एजंट’ माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप, काँग्रेसचे प्रत्युत्तर; इंडिया आघाडीत फूट?

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. “आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधला असून त्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत. असा पाऊस गेल्या कित्येक वर्षात पडला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी खचून गेले असली तरी आम्ही त्यांचा पाठिशी ठामपणे उभे आहोत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली आणि शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही”, असे शिंदेंनी स्पष्ट केले. “शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री (अजित पवार आणि एकनाथ शिंदे)एकत्र मिळून त्यांच्या हिताचा निर्णय घेऊ. शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे,” असे आश्वासनही शिंदेंनी दिले.

मुख्यमंत्र्यांची मदत देण्याची मानसिकताच नाही : संजय राऊत

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली. “जिथे पूरस्थिती आहे तिथे सरकारने कॅबिनेट घ्यायला हवी होती. तसे न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. त्यावेळी मोदींनी सांगितले की नुकसानीचा अहवाल पाठवा. हा अहवाल राज्य सरकारकडून पाठवला की नाही हे माहिती नाही. राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. त्यांना सरकारने प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत दिली पाहिजे. मात्र, ही मदत देण्याची मानसिकता मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये दिसत नाही,” असे राऊत यांनी म्हटले. एक दिवसाचे किंवा दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत चर्चा व्हायरला हवी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना केली होती, त्याची आठवणही राऊत यांनी करून दिली.

हेही वाचा : Pok Protest Against Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमध्ये उडाला आंदोलनांचा भडका; कारण काय? पाकिस्तानला कोण करतंय लक्ष्य?

आमदार आदित्य ठाकरेंची मोदी-शाहांवर टीका

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यासह कर्जमुक्त करण्याची गरज आहे, पण हे सरकार त्यांचे न ऐकता आपल्याच मस्तीत पुढे जात असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यानी केली. आम्ही मागत असलेली मदत ही आमच्या हक्काची आहे. शेतकरी कर्जमुक्त करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी नुकसानभरपाईची विनंती करत असताना दुसरीकडे बिहारमधील महिलांना भाजपा सरकारकडून प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. याच मुद्द्याला हाताशी धरून आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. बिहारमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे मोदी सरकारने तेथील महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयाची आर्थिक मदत दिली आहे. आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर पैशांचा महापूर आला असता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज कुणीही ऐकत नाही. सरकार आपल्या मस्तीत पुढे जात आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.