हर्षद कशाळकर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळात रायगड जिल्ह्यातील एकाही आमदाराला स्थान मिळाले नाही. त्यामुळे रायगडकरांच्या पदरी निराशा आली आहे. जिल्ह्यात भाजपचे आणि शिंदे गटाचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. असे असूनही जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळू शकलेले नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. रायगडकरांच्या तोंडाला पान पुसल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपा आणि शिंदे गट यापैकी किमान एकाला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. रत्नागिरीतून उदय सामंत आणि सिंधुदुर्गातून दीपक केसरकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलेली असली तरी रायगडातून कोणालाच संधी मिळू शकलेली नाही.

हेही वाचा- पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलवण्याची चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक रायगड मधील  महाडचे आमदार भरत गोगावले यांना  मंत्रीपद मिळेल अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती . सोमवारी (८ ऑगस्ट) संध्याकाळी गोगावले यांना तातडीने मुंबईत बोलावणे आले. त्यामुळे त्यांची जागा पक्की मानली जात होती. परंतु मंगळवारी सकाळी १८  जणांच्या यादीत गोगावले यांचे नाव नव्हते. त्यामुळे समर्थकांची निराशा झाली. दुसरीकडे भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनादेखील या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. रायगड जिल्ह्याला एकही मंत्रीपद नसल्यामुळे आमदारांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील  रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात भरत गोगावले यांनीच सर्वप्रथम बंडाचा झेंडा फडकवला होता. भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी सभा घेऊन नाराजी व्यक्त केली होती. या बंडाचे  नेतृत्व गोगावले यांनी केले होते. त्याना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे यासाठीच का केला होता अट्टहास ? असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून विचारला जात आहे.

हेही वाचा- अजातशत्रू मुनगंटीवार

रायगड जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही तर दुसरीकडे मागील युती सरकारच्या काळात रायगडचे पालकमंत्री पद सांभाळणारे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. एकिकडे गोगावले यांना मंत्रीपद नाही. दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. रवींद्र चव्हाण  यांनी रायगडचे पालकमंत्री पद सांभाळले आहे. यांच्यावरच  रायगड जिल्ह्याच्या  पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रायगड मधील शिंदे गटातील अस्वस्थता वाढत चालली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे आमदार भरत गोगावले यांनी टाळले. तर शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी कुठलीही नाराजी नसल्याचे सांगितले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावले यांना स्थान मिळाले नसले तरी पुढील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा नक्की समावेश असेल असा विश्वास शिंदे गटाचे उत्तर रायगडचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी व्यक्त केला आहे.