काही महिन्यांनी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (BRS) एकूण ११९ जागांपैकी ११७ जागांवर आपले उमेदवार घोषित करून टाकले आहेत. त्यामुळे बीआरएसशी आघाडी करण्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (CPI(M) यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. दोन्ही डाव्या पक्षांनी आता काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू केला असून काँग्रेसकडे डोळे लावले आहेत. आघाडी करण्यासंदर्भात या आठवड्यात तीनही पक्षांची बैठक होणे अपेक्षित होते, मात्र काँग्रेसकडून फारसा उत्साह दाखविण्यात आलेला नाही. सोमवारी (दि. ४ सप्टेंबर) रोजी होणारी बैठक काँग्रेसकडून रद्द करण्यात आली.

डाव्यांसाठी जागाच शिल्लक नाहीत

ऑक्टोबर २०२२ मध्ये तेलंगणाच्या मुनूगोडे (Munugode) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असता डाव्या पक्षांनी आपला पाठिंबा बीआरएसला देऊ केला होता. मात्र यावेळी दोन्हीही पक्षांना विश्वासात न घेता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली. त्यामुळे सीपीआय आणि सीपीआय (एम) पक्षाला धक्का बसला. दरम्यान बीआरएसमधील सूत्रांनी सांगितले, “सीपीआय आणि सीपीआय (एम) पक्षांचा बीआरएसला पाठिंबा आहे, असे समजून आम्ही चाललो आहोत. राहीला प्रश्न जागावाटपाचा. तर यावेळी तिकीटाच्या मागणीसाठी अनेक उमेदवार रांगेत आहेत. तसेच पक्षाने आपल्या सर्व विद्यमान आमदारांना तिकीट देऊ केल्यामुळे आता जागाच शिल्लक राहिल्या नाहीत.”

हे वाचा >> तेलंगणा विधानसभा निवडणूक : BRS पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, केसीआर दोन जागांवर लढणार!

सीपीआय आणि सीपीआय (एम) यांना तेलंगणाच्या ग्रामीण भागातील प्रत्येकी पाच जागा हव्या होत्या. तथापि, २०१८ सालच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकाही जागेवर विजय मिळवलेला नाही. त्यामुळे बीआरएस किंवा काँग्रेस जागावाटपात डाव्या पक्षांना मतदारसंघ सोडायला तयार नाही. डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सीपीआय (एम) ने ०.४४ टक्के मतदान मिळवले होते. तर सीपीआयला ०.४० टक्के मते मिळाली होती. नालगोंडा, भद्राद्री कोठागुडम आणि खम्मम या जिल्ह्यात डाव्या पक्षांना माननारा वर्ग आहे.

आंध्र प्रदेशमधून विभाजन होऊन २०१४ साली तेलंगणाची पहिलीच विधानसभा निवडणूक संपन्न झाली. त्यावेळी सीपीआय आणि सीपीआय (एम) यांनी अनुक्रमे देवरकोंडा आणि भद्राचलम येथे प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. सध्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत, त्या काही जागांवर डाव्या पक्षांचा डोळा आहे. उदाहरणार्थ, मधिरा हा मतदारसंघ सीपीआय (एम) ला हवा आहे. याठिकाणी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि तीन वेळा आमदारकी भूषविलेले मल्लू भट्टी विक्रमार्का आमदार आहेत. याचप्रमाणे, सीपीआयला बेल्लाम्पल्ली हा मतदारसंघ हवा आहे, याठिकाणी बीआरएस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत.

मुनूगोडे मतदारसंघात डाव्यांना चांगला पाठिंबा आहे. डाव्यांच्या मदतीमुळेच मागच्यावर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत बीआरएस पक्षाने भाजपाच्या कोमतीरेड्डी राजगोपाल रेड्डी यांचा पराभव केला होता. तथापि, शेजारच्या कर्नाटक राज्यात काँग्रेसने काही महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत एक हाती विजय मिळवल्यानंतर तेलंगणातही काँग्रेस आश्वासक पावले टाकत आहे. म्हणूच बीआरएस पक्ष काँग्रेसला आपला प्रमुख प्रतिस्पर्धी मानत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काँग्रेससह आघाडी केलेल्या डाव्या पक्षांना स्वतःसोबत घेण्यास बीआरएस इच्छूक दिसत नाही.

त्याचप्रकारे, कर्नाटकमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन केल्यामुळे तेलंगणातही हाच कित्ता गिरवला जाऊ शकतो, असा आत्मविश्वास काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे ते कुणालाही सोबत घेण्यासाठी आतातरी इच्छूक नसल्याचे दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डाव्या पक्षातील नेत्यांनी काँग्रेसचे तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यापर्यंत आपले म्हणणे पोहोचवले आहे. मात्र डाव्यांशी युती केल्यानंतर काँग्रेसला कितपत फायदा होईल? असा प्रश्न तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख ए. रेवंथ रेड्डी यांनी उपस्थित केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीपीआय (एम) पक्षाचे तेलंगणा सरचिटणीस टी. वीरभद्रम म्हणाले की, काँग्रेससह आमची अनौपचारिक चर्चा सुरू आहे. ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा केली आहे, पण आघाडी करण्यावर अद्याप स्पष्टता झालेली नाही. काँग्रेस आम्हाला काही जागा लढण्यास देईल की नाही? याचीही आम्हाला कल्पना नाही. दुसरीकडे सीपीआयचे सचिव के. सम्बाशिव राव म्हणाले की, काँग्रेसचा प्रस्ताव काय आहे? त्यावर पुढचा निर्णय अवलंबून आहे.