ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी होणार आहेत. त्याच अनुषंघाने काँग्रेसने मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी आठ, तर विधानसभा निवडणुकीसाठी ४७ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, काँग्रेसने अनेक जागांवर पिता-पुत्रांना संधी दिल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अनेकांकडून काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने भाजपा उमेदवाराच्या भावाला लोकसभेचं तिकीट दिल्याने आता आगामी निवडणुकीत दोन भाऊ ‘आमने-सामने’ आल्याचं बघायला मिळणार आहे. याचीही सध्या जोरदार चर्चा आहे.

ओडिशातील नबरंगपूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या जागेवर काँग्रेसने माजी आमदार भुजबळ माझी यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांची मुलगी लिपिका माझी यांना डबुगम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. डबुगम विधानसभा मतदारसंघातून भुजबळ हे २०००, २००९ आणि २०१४ असे तीन वेळा आमदार राहिले आहेत. गेल्या निवडणुकीत बीजेडीच्या मनोहर रंधारी यांनी भुजबळ माझी यांचा ७ हजार ३६३ मतांनी पराभव केला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांचा सामना बीजेडीचे प्रदीप माझी आणि भाजपाचे बलभद्र माझी यांच्याशी होणार आहे.

हेही वाचा – सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

२००९ मध्ये प्रदीम माझी हे नबरंगपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत बीजेडीच्या बालभद्र माझी यांनी २०४२ मतांनी त्यांचा पराभव केला, तर २०१९ मध्ये रमेश माझी यांनी ४१ हजार ६३४ मतांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर २०२२ मध्ये प्रदीम माझी यांनी बीजेडीमध्ये प्रवेश केला.

या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेशी बोलताना भुजबळ माझी म्हणाले, ”नबरंगपूरच्या जनतेने आधीच दोन माझी बघितले आहेत. तसेच त्यांनी मतदारसंघासाठी काय केले हे देखील जनतेला माहिती आहे, त्यामुळे येथील जनतेने आता तिसऱ्या माझीला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.”

माझी पिता-पुत्री व्यतिरिक्त काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांना नार्ला विधानसभा मतदारसंघ आणि त्यांचा मुलगा सागर यांना भवानीपटना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. १९८९, १९९६ आणि २००९ साली कालाहंडी मतदारसंघातून विजय मिळवलेल्या दास यांना गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे त्यांनी यंदा विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय त्यांचा मुलगा सागर यांनी २०१९ मध्ये भवानीपटना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत ते ३५ हजार ४९४ मते मिळवून तिसऱ्या स्थानावर होते.

काँग्रेसने कोरापूट लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सप्तगिरी उलाका यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे, तर बालनगीरमधून काँग्रेसने नुकताच पक्षात प्रवेश घेतलेल्या अभिनेता मनोज मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष सरत पटनायक यांना नुआपाडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर तलसारामधून काँग्रेसने भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार प्रबोध तिर्की यांना उमेदवारी दिली आहे.

प्रबोध तिर्की हे दिलीप तिर्की यांच्यानंतर राजकारणात येणारे दुसरे माजी हॉकीपटू आहेत. दिलीप तिर्की हे सुंदरगड लोकसभा मतदारसंघातून बीजेडीचे उमेदवार आहेत. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने आपल्या अनेक आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे, तर काही ठिकाणी पक्षातील नेत्यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने ओडिशाचे माजी मुख्य सचिव बिजय पटनायक यांना आंध्र प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या परलाखेमुंडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. बिजय पटनायक यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता.

हेही वाचा – राहुल आणि प्रियांका गांधींमुळे अमेठी आणि रायबरेलीची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात; काँग्रेसमधील संभ्रमाचे कारण काय?

महत्त्वाचे म्हणजे चिकीटी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने माजी सभापती चिंतामणी दयान सामंतरा यांचे पुत्र रबीनारायण दयान सामंतरा यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे रबीनारायण दयान सामंतरा हे यांचे धाकटे भाऊ मनोरंजन दयान सामंतरा यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून दोन भावांमध्ये लढत बघायला मिळणार आहे. याशिवाय या दोन्ही भावांचा सामना बीजेडीच्या श्रीरूप देब यांच्याशी होणार आहे.

मनोरंजन सामंतरा यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये चिकीटी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही निवडणुकीत त्यांना उषा देवी यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.