आजपासून (१९ सप्टेंबर २०२३) नव्या संसद भवनाच्या इमारतीमध्ये संसदेच्या कामकाजाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आठ वेळा खासदार राहिलेल्या आणि तीन दशकांची संसदीय कारकीर्द असलेल्या सुमित्रा महाजन यांच्याशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने संवाद साधला. महाजन १६ व्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या; तसेच आजवर त्यांनी वेगवेगळ्या पंतप्रधानांसह काम केले आहे. संसदीय कारकिर्दीची सुरुवात केल्यापासून राजकारणात कसे कसे बदल होत गेले, याचा ऊहापोहही त्यांनी केला आहे. संसदेची नवी इमारत ही जुने आणि नवे यांना जोडणारी दुवा ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलेले विचार प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून खालीलप्रमाणे :

तुम्ही १९८९ ते २०१९ या काळात आठ वेळा इंदूर मतदारसंघातून संसदेत लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. तुमची तीन दशकांतील सर्वांत संस्मरणीय आठवण कोणती?

महाजन : या काळात काँग्रेस आणि भाजपामधील अनेक मोठे नेते मी पाहिले; ज्यांचा माझ्या मनावर खोलवर प्रभाव पडला. चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंह राव, अटलजी, अडवाणीजी आणि इतर अनेक मोठ्या नेत्यांना पाहण्याची संधी मिळाली. मला त्यांच्यासोबत संसदेत बसता आले. या सर्व नेत्यांनी संसदेला दुर्मीळ भव्यता अर्पण केली.

हे वाचा >> विश्लेषण: नव्या- जुन्या संसद भवनांच्या वेगवेगळ्या आकारामागील समीकरण काय?

मंगळवारी नव्या संसद भवनात प्रवेश केला जात आहे. त्याबद्दल काय वाटते?

महाजन : जुन्या संसद भवनाला गौरवशाली इतिहास आहे. पण, नव्या इमारतीचीही तेवढीच आवश्यकता होती. नव्या सुविधांची आता गरज भासणार आहे. जसे की, खासदारांच्या जागेवर संगणकाची सुविधा असणे. नवी इमारत जुन्या आणि नव्या पिढीमध्ये एक नवा संगम साधेल. दोन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा तो दुवा ठरेल, असे मला वाटते. जुन्या इमारतीमध्ये जागा छोटी होती, पण त्यामुळे इतर सदस्यांशी मोकळा संवादही होत होता. आता नवीन सभागृह मोठे आहे. या सभागृहातील ‘वेल’ही (अध्यक्षांच्या समोरची आणि विरोधक-सत्ताधारी यांच्यादरम्यानची मोकळी जागा) मोठी आहे. या जगात बदल अपरिहार्य आहेl. जुन्या इमारतीमध्ये वैदिक मंत्र, संस्कृत श्लोक, चित्रे होती… पण मी ऐकले आहे की, नवीन इमारतीमध्येही चांगल्या कलाकृती मांडल्या असून, त्यांच्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण माझ्यासारखे लोक (जुने खासदार) जेव्हा केव्हा संसदेला भेट देतील, तेव्हा ते उजवीकडे न वळता डावीकडे (जुन्या संसदेकडे) वळू शकतात.

तुम्हाला आजवर आवडलेले अविस्मरणीय, आवडते भाषण कोणते?

महाजन : अशी अनेक भाषणे आहेत. पण, १९९६ साली अटलजी जेव्हा अविश्वास प्रस्तावाला सामोरे गेले होते, त्यावेळी त्यांनी केलेले भाषण हे मला आजही स्पष्टपणे आठवते. ते भाषण मंत्रमुग्ध करणारे होते. अटलजींनी ज्या प्रकारे भाषणाचा शेवट केला, त्याची आठवण आजही त्यावेळी संसदेत बसलेले खासदार काढतात, त्यात विरोधकही आले. अटलजी म्हणाले होते, “अध्यक्षजी, मी माझा राजीनामा राष्ट्रपतींना द्यायला चाललो आहे.”

मला माजी अर्थमंत्री अरुण जेटली व माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचीही भाषणे आठवतात. सुषमाजी यांच्याकडे वेगळीच वक्तृत्व शैली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार व माजी केंद्रीय गृहमंत्री इंद्रजित गुप्ताजी यांचीही भाषणे मला आठवतात. ते जेव्हा बोलायचे, तेव्हा इतर खासदार काळजीपूर्वक त्यांचे भाषण ऐकायचे. त्यांनी संसदेत एक चांगला दृष्टिकोन आणि तपशील सादर केला होता. कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार गीता मुखर्जी यांचेही भाषण मला आवडायचे.

आणखी वाचा >> सत्तांतर, वाद, आंदोलनांसह अनेक ऐतिहासिक घटना पाहिलेल्या जुन्या संसद भवनाचं नेमकं काय होणार?

जुन्या काळापासून आता कोणते राजकीय बदल झाले आहेत?

महाजन : त्या काळात सभागृहात चर्चा अधिक आणि गोंधळ कमी व्हायचा. सभागृह मोठ्या नेत्यांचे भाषण तल्लीन होऊन ऐकत असे. एखाद्या मोठ्या नेत्याला त्रास देणे, हे असभ्य मानले जात असे. एखाद्याची टर उडवणे किंवा त्यांच्या वक्तव्याला छेद देणे हे चांगले वर्तन मानले जात नव्हते.

तुम्ही लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेय. खासदारापेक्षा हा अनुभव वेगळा होता?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाजन : माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सभागृहात अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली मी पाहिली. पण मला एक कळले की, विरोधकांनी कधीही मला वैयक्तिक लक्ष्य केले नाही किंवा माझा अवमान होईल, असे कृत्य केले नाही. जेव्हा मी त्यांच्यावर रागवायचे, तेव्हा ते हसून म्हणायचे की, त्यांचा मला विरोध नाही. एकमेकांप्रति असलेला आदर मला पाहायला मिळाला. विरोधकही माझे मित्र बनले होते. तसेच नवीन सदस्यांनी मला ज्येष्ठत्वाचा मान दिला.

मी अध्यक्ष या नात्याने परदेशात अध्यक्षांच्या परिषदांना सहभागी होण्यासाठी गेले, तेव्हा तिथेही मला आदर मिळाला. आठ वेळा खासदारपदी राहिलेली व्यक्ती म्हणून माझी ओळख आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारताला परदेशात मिळणारी प्रतिष्ठा मला जाणवली.