दिगंबर शिंदे

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांना तपास यंत्रणेने निर्दोषत्व बहाल केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत: सांगली जिल्ह्यातील नेते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भिडे यांना निर्दोषत्व मिळण्यामागे राष्ट्रवादीचे नेते, त्यातही पालकमंत्री जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. या आरोपावरून लगोलग मंत्री पाटील यांनी आंबेडकरांना प्रतिआव्हान देत असे बेछूट आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे देण्याची तंबी दिली आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे सांगलीमधील पडद्याआडचे राजकारण राजकीय पटलावर पुन्हा एकदा चमकू लागले आहे.

संभाजी भिडेगुरुजी हे सांगलीचे असले तरी त्यांचे समाजातील वलय हे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील सीमेलगतच्या जिल्ह्यापर्यंत सर्वदूर आहे. त्यांच्या शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे राष्ट्रीय विचारांची त्यातही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचाराची समाजात विशेषत: तरुणांमध्ये सतत पेरणी सुरू असते. आज ८३ व्या वर्षीही सायकल, पायी फिरत, तरुणांमध्ये मिसळत त्यांचे हे कार्य सुरू असते. यातून त्यांना मानणारा तरुणांचा एक मोठा वर्ग आहे. या भागातील बहुतांश सर्वच राजकीय पक्षांचे नेतेही त्यांच्याविषयी आदरभाव बाळगून आहेत. हाच धागा पकडून भीमा कोरेगावची दंगल झाली त्या वेळी ॲड. आंबेडकर यांनी भिडे गुरुजींच्या पाठीशी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच पक्षाचे नेते असल्याचा आरोप केला होता. यामध्येही त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसवर अधिक होता. त्या वेळी देखील आंबेडकर विरुद्ध या नेतेमंडळींमध्ये असेच आरोप-प्रत्यारोप झडले होते. त्याचेच प्रत्यंतर आता पुन्हा एकदा भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना तपास यंत्रणेने निर्दोषत्व बहाल केल्यानंतर दिसू  लागले आहे.

दोन वर्षापूर्वी भीमा कोरेगाव येथे दंगल उसळली होती. या दंगलीमध्ये भिडे गुरुजी यांचा सहभाग होता असा आरोप ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. यामुळे सांगलीतील शिवप्रतिष्ठान राज्यात चर्चेत आली. भिडे गुरुजींवर आरोप होताच, सांगलीतील हजारो कार्यकर्त्यांनी सन्मान मोर्चा काढत या आरोपांचा निषेध केला होता. याचे पडसाद आजूबाजूच्या जिल्ह्यातही उमटले होते. यामध्ये बहुतांश सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही दंगल घडली त्या वेळी गुरुजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या सांत्वनासाठी गेले होते. हाच धागा पकडत अनेक नेत्यांनी देखील या आरोपाचा इन्कार करत गुरुजींच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले होते.ही घटना घडली त्या वेळी राज्यात भाजपा-सेनेचे सरकार होते. त्या वेळीही भिडे गुरुजींविरुद्धच्या आरोपांबाबत तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. पुढे राज्यात सत्ता परिवर्तन घडले. राष्ट्रवादीचा मुख्य सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या काळात या दंगलीचा सखोल तपास केल्यानंतर तपास यंत्रणेने भिडेगुरुजी निर्दोष असल्याचे जाहीर केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला. दरम्यान या वेळीही ॲड. आंबेडकर यांनी भिडे यांना निर्दोष ठरविण्यामागे राष्ट्रवादीचे नेते, त्यातही पालकमंत्री जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला. या आरोपावरून लगोलग मंत्री पाटील यांनी आंबेडकरांना प्रतिआव्हान दिले. भिडे गुरुजींबाबत असे बेछूट आरोप करणे थांबवावे. त्यांना निर्दोषत्व देण्यात आपला सहभाग असल्याचे पुरावे आंबेडकरांकडे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे आव्हान दिले.

आंबेडकरांच्या आरोपांवर अन्य राजकीय नेत्यांकडूनही दबक्या आवाजात अशीच प्रतिक्रिया उमटली आहे. भिडे गुरुजींच्या मुद्द्यावर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दिलेले हे आव्हान आंबेडकरांनी अद्याप स्वीकारलेले नाही. परंतु या निमित्ताने आंबेडकर विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रातील नेते पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचे पाहायला  मिळाले.