२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी विरोधकांनी नवी आघाडी केली असून या आघाडीला INDIA असे नाव देण्यात आले आहे. देशातील जवळजवळ सर्वच पक्षांनी एकत्र येत हा आघाडीचा प्रयोग केला आहे. आम्ही सर्वजण मिळून भाजपाला सत्तेतून खाली खेचू, असा विश्वास आघाडीतील पक्ष व्यक्त करत आहेत. या आघाडीत देशातील सर्वच महत्त्वाचे पक्ष असले तरी बहुजन समाज पार्टीने मात्र ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. हा पक्ष आगामी निवडणुका एकट्यानेच लढवणार आहे.

विधानसभा, लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए आणि विरोधकांच्या आघाडीवरही टीका केली आहे. त्यांनी मतदारांना बसपा पक्षाला मतदान करावे, असे आवाहन केले आहे. तुम्ही आम्हाला मतदान केल्यास केंद्रात मजबूत ऐवजी मजबूर सरकारची स्थापना होईल. त्यामुळे समाजातील दुबळ्या वर्गाचे अधिकार अबाधित राहतील. दुबळे सरकार असल्यामुळे ते या वर्गाला त्रास देऊ शकणार नाहीत, असे मायावती म्हणाल्या.

“आम्ही स्थानिक पक्षांशी युती करण्यास तयार, मात्र…”

बहुजन समाज पक्ष आगामी लोकसभा तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणूक लढवणार आहे. विशेष म्हणजे कोणाशीही युती न करता बसपा या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. बसपा पक्ष कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती करण्यास तयार नाही. याबबत बोलताना आमचा पक्ष पंजाब, हरियाणा या राज्यांत स्थानिक पक्षांशी युती करण्यास तयार आहे. मात्र आमच्याशी युती करणाऱ्या पक्षाशी एनडीए तसेच विरोधकांच्या आघाडीशी कसलाही संबंध नसावा, असे मायावती यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एनडीए आणि विरोधकांच्या आघाडीचे धोरण सारखेच”

भाजपा सरकार आणि काँग्रेसचे नेतृत्व असलेल्या विरोधकांच्या आघाडीची दलित, आदिवासी, गरीब, मागास जमाती, मुस्लीम यांच्या प्रतीची धोरणे सारखीच आहेत, असा दावाही मायावती यांनी केला. एनडीए आणि विरोधकांच्या आघाडीची धोरणे सारखीच असल्यामुळे आम्ही या दोघांपासूनही अंतर राखले आहे, असे मायावती यांनी सांगितले.