Top 5 Political Breaking News Today : महाराष्ट्रातील आजच्या पाच महत्वाच्या घडामोडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफींच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले. नाशिकच्या एका माजी नगरसेवकाने भाजपा आमदाराला मारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा अंबादास दानवे यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
पार्थ पवारांवर घोटाळ्याचे आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ४० एकरांचा भूखंड विकत घेतल्यानंतर विरोधकांनी आरोपांची राळ उठवली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईनंतर ‘अधिकाऱ्यावर नाही तर हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा’, असे आव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला दिले. दुसरीकडे, ‘मी आजपर्यंत कधीही माझ्या जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकाला लाभ होईल, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत’, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांचे फडणवीसांना आव्हान
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. “मी मुख्यमंत्री असताना फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी आमच्या सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता सत्तेत आल्यानंतर ते म्हणतात ओला दुष्काळ ही संज्ञाच नाही. तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं का ते सांगा? एक हजार रुपये बक्षीस देतो”, अशी टीका ठाकरे यांनी केली. पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला असता, “मी सांगतो काही होणार नाही. चौकशी करतील आणि क्लीन चिट मिळेल. ते जमिनी कमवतील आणि तुम्ही बसा असे”, असेही ते म्हणाले.
भाजपा आमदाराला मारण्याची सुपारी- अंबादास दानवे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज नांदेडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना एक खळबळजनक दावा केला. नाशिकच्या एका माजी नगरसेवकाने भाजपा आमदाराला मारण्याची सुपारी दिल्याचे दानवे यांनी म्हटले. विशेष म्हणजे संबंधित माजी नगरसेवक भाजपाचे पक्षाचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समर्थक असल्याचा दावा दानवे यांनी केला. महाजन यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांकडून चांगलाच दणका दिला जात आहे. यादरम्यान भाजपा आमदाराच्या कथित सुपारीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी दिला राजीनामा
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का बसला असून दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण चिपळूण दौऱ्यावर आले असता सावंत यांनी त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. रत्नागिरी शहराचे नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे भाजपामधून ठाकरे गटात गेलेले बाळ माने यांनी नगराध्यक्षपदासाठी त्यांची सून शिवानी माने हिला उमेदवारी मिळवून देण्याची तयारी केली आहे. शिवानी माने ही राजेश सावंत यांची मुलगी आहे. उमेदवारी मिळाल्यास तिचा प्रचार करण्यासाठीच सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट?
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द जरांगे पाटील यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात उद्या (शुक्रवार) सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर आपण मृत्यूला घाबरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “माझ्या हत्येचा कट एका मोठ्या व्यक्तीने रचला गेला असून या प्रकरणात जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालून आहेत. मी उद्या सकाळी अकरा वाजता याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार, असे जरांगे यांनी ‘टीव्ही नाईन’ला सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
