संजीव कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड: देगलूर शहरातील एस.एम.जोशी सभागृहाची दुरावस्था पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारसह सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारलाही दूर करता आलेली नाही. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत याच सभागृहालगतच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर करण्याचे निश्चित झाल्यानंतर काँग्रेसने ही दुरवस्था लपविण्यासाठी सभागृहाचा दर्शनी आणि बाजूचा भाग तिरंगी कापडाने झाकून त्यावर आकर्षक रोषणाई केल्याचे दिसले.

महाराष्ट्रातील मोजक्या समाजवादी नेत्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणच्या वास्तूंना देण्यात आलेली आहेत. मागील शतकाच्या शेवटच्या कालखंडात देगलूर शहरात नगर परिषदेतर्फे एक भव्य सभागृह बांधून त्यास समाजवादी नेते एस.एम.जोशी यांचे नाव देण्यात आले होते. काही वर्षे हे सभागृह चांगल्याप्रकारे चालविले गेले. त्याची निगाही राखली गेली; पण नंतरच्या काळात या सभागृहाचा वापर लग्नकार्ये व इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी केला गेला. अलीकडच्या काळात त्याची दुर्दशा झाल्याने त्याचा वापरही थांबला.

हेही वाचा : ठाण्यात मनसे-राष्ट्रवादीच्या मैत्रीत तणाव?; हर हर महादेव चित्रपटावरून अविनाश जाधव- जितेंद्र आव्हाड आमने सामने

२०१४-१९ दरम्यान देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात या सभागृहाच्या नूतनीकरणाचा विषय शासनाकडे मांडला गेला होता; पण ५ वर्षांत त्यासाठी निधी मिळाला नाही. तीन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीेचे सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देगलूरमधील वेगवेगळ्या कामांना भरीव निधी देताना, एस.एम.जोशी सभागृहासाठी देखील निधीची तरतूद केली होती; पण अडीच वर्षात तेथे कोणतेही काम सुरू झाले नाही.

हेही वाचा : शहाजी बापू म्हणतात, आम्ही भाजपचे मांजर मारले म्हणून गुवाहाटीला जाऊन प्रायश्चित घेतले

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत या सभागृहालगतच्या छ. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर करण्याचे निश्चित झाले तेव्हा या सभागृहाची दुर्दशा ठळकपणे लक्षात आल्यामुळे संयोजकांनी सभागृहाच्या समोरचा भाग तिरंगी कापडाने तर छत पांढर्‍या कापडाने झाकून टाकल्याचे व त्यावर रोषणाई केल्याचे सोमवारी रात्री दिसून आले. या उपाययोजनेमुळे तेथील नेपथ्यरचना उठावदार झाली तरी तिरंगी आणि पांढर्‍या कापडाच्या आवरणाखाली एका महान नेत्याचे नाव असलेले सभागृह दडलेले आहे, हे बाहेरून आलेल्या कोण्याही माध्यम प्रतिनिधींच्या लक्षात आले नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plight of sm joshi hall congress covered board and lighting deglur bharat jodo yatra mva and shinde fadanvis government nanded print politics news tmb 01
First published on: 09-11-2022 at 09:07 IST