२५ मे रोजी केंद्रातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे(एनडीए) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची रविवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील प्रत्येक नेत्याला, विशेषतः त्यांच्या स्वतःच्या पक्षातील नेत्यांना फटकारले. पंतप्रधान मोदींनी भाजपा नेत्यांना प्रत्येक मुद्द्यावर बोलणे टाळावे असा सल्ला दिला, ही माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांनी कोणतेही विशिष्ट उदाहरण न देता नेत्यांना संयम राखण्यास सांगितले. अलीकडील नेत्यांच्या वक्तव्यांनी वाद निर्माण झाल्याने पंतप्रधान मोदींनी नेत्यांना हा सल्ला दिला. काही वाद असे होते, जे थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले. कोणत्या नेत्यांच्या वक्तव्यांनी वाद ओढवले? या नेत्यांनी महिलांबाबत काय वक्तव्ये केली? जाणून घेऊयात.
पंतप्रधान मोदींच्या सल्ल्याचे कारण काय?
भाजपा खासदार आणि मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेचा चेहरा असणाऱ्या महिला अधिकाऱ्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. ऑपरेशन सिंदूरनंतर एका सरकारी कार्यक्रमात बोलताना विजय शाह म्हणाले, “मोदीजी समाजासाठी झटत आहेत. पहलगाममध्ये ज्यांनी आमच्या मुलींना विधवा केले, त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवले.”
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांच्या विधानाची स्वतःहून दखल घेतली. त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना विजय शाह यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर पोहोचले आहे. त्यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. त्यांनी त्यांच्या वारंवार माफीला खोटेपणा म्हटले. परंतु, मोदींच्या सल्ल्यानंतर भाजपा नेते अशी विधाने करण्यापासून स्वतःला दूर ठेवतील का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विजय शाह कोण आहेत?
२०१३ मध्ये विजय शाह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नी साधना सिंह चौहान यांच्याबद्दल कथित लैंगिक छळ करणारे विधान केले होते. त्या विधानानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. २०२२ मध्ये त्यांनी राहुल गांधी ५५ व्या वर्षी अविवाहित असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते आणि २०१८ मध्येही त्यांनी अपमानजनक विधान केले होते. ते म्हणाले होते, “पंतप्रधान मोदींच्या आधी सर्व पंतप्रधान घोडा, घडा आणि हाथी छाप होते; त्यापैकी कोणालाही गरिबांची काळजी नव्हती.”
नरेंद्र प्रजापती कोण?
आक्षेपार्ह विधान करणारे शाह एकटे नाहीत. मध्य प्रदेशातून पहिल्यांदाच निवडून आलेले भाजपा आमदार नरेंद्र प्रजापती यांनी दावा केला होता की, संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपामुळे भारताने लष्करी हल्ले थांबवले. त्यांच्या या विधानावर दिशाभूल करणारे आणि पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारे विधान म्हणून टीका करण्यात आली. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि वरिष्ठ नेत्यांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी माध्यमांना दोष दिला आणि माझे विधान विकृत आणि बनावट पद्धतीने सादर केल्याचा आरोप केला.
बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. एक म्हणजे सशस्त्र दलांचे आणि ऑपरेशन सिंदूरच्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करणारा आणि दुसरा म्हणजे, जातीय जनगणना करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे समर्थन करणारा. परंतु, या बैठकीत पंतप्रधानांनी एनडीएच्या सर्व मित्रपक्षांना संयम पाळण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “कोणत्याही मुद्द्यावर बोलण्यापूर्वी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.” पंतप्रधानांनी अशा स्वरूपाच्या सूचना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, असे असले तरीही मध्य प्रदेशच्या प्रज्ञा सिंह ठाकूर, पश्चिम बंगालचे दिलीप घोष आणि कर्नाटकचे बसनगौडा पाटील यत्नाळ अशाच स्वरूपाची विधाने करताना दिसत आहेत.