Pm Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमॅन या प्रसिद्ध पॉडकास्टरना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली आहे. सव्वा तीन तासांच्या या पॉडकास्टमध्ये मोदींनी त्यांचं बालपण, त्यांच्या आयुष्यावरचा आई वडिलांचा प्रभाव, विवेकानंदांची शिकवण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण, ट्रम्प यांच्याशी मैत्री या आणि अशा सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. एवढंच नाही मृत्यूची भीती वाटते का? याबाबतही त्यांनी उत्तर दिलं आहे.

गुजरात दंगलींबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी?

२००२ च्या गुजरात दंगलींकडे मोदी कसे पाहतात? असं विचारलं असता मोदी म्हणाले की, “२००२ च्या दंगली भोवतीच्या चर्चेला खोटी कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. २००२ पूर्वी गुजरातमध्ये २५० हून अधिक दंगली झाल्या होत्या आणि जातीय हिंसाचार वारंवार होत होता. २००२ पूर्वी देशात सतत दहशतवादी हल्ले आणि अस्थिरतेचे वातावरण होते, त्यामुळे तणाव शिगेला पोहोचला होता. तेव्हा जगातही दहशतवादी कारवायांमध्येही वाढ दिसून आली होती. १९९९ मध्ये कंधार अपहरण प्रकरण झालं होतं, २००० मध्ये लाल किल्ल्यावर हल्ला झाला होता आणि २००१ मध्ये आपल्या संसदेवर हल्ला झाला होता. तो काळ मोठ्या आव्हानांचा होता. पण २००२ नंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल घडलेली नाही. आता राज्यात कायमस्वरूपी शांतता आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मृत्यूबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी?

लेक्स फ्रिडमन यांनी मोदींना अनेक सवाल विचारले. फ्रिडमॅन म्हणाले, तुम्ही तुमच्या मृत्यूचा विचार करता? तुम्हाला मृत्यूची भीती वाटते? यावर मोदी जोरात हसले. मोदी म्हणाले, “मी या बदल्यात तुम्हाला एक सवाल करू शकतो का? जन्मानंतर जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण त्यात अधिक निश्चित कोणती बाजू आहे? त्यावर मोदींनी स्वत: उत्तर दिलं मृत्यू. जो जन्माला येतो, त्याचा मृत्यू होतो हे आपल्याला माहीत आहे. आयुष्य तर फुलतं”, असं मोदी म्हणाले.

मृत्यूची भीती का वाटावी?

मोदी पुढे म्हणाले, जी गोष्ट शाश्वत आहे की त्याची भीती का वाटावी? संपूर्ण वेळ आयुष्यावर खर्ची घाला. संपूर्ण मेंदू मृत्यूवर कशाला केंद्रीत करता? तरच जीवन विकसित आणि समृद्ध होईल. कारण सर्व काही अनिश्चित आहे. त्यामुळे त्यात मेहनत केली पाहिजे. गोष्टी सुधारल्या पाहिजे. म्हणजे मृत्यूच्या आधी तुम्ही उद्देशाने जगलं पाहिजे. त्यामुळेच तुम्हाला मृत्यूची भीती सोडली पाहिजे. शेवटी मृत्यू येणारच आहे. मृत्यू कधी येणार याची चिंता करण्यात अर्थ नाही. मृत्यू जेव्हा यायचा असेल तेव्हा येणारच, त्यात घाबरण्यासारखं काय? असंही मोदी यांनी सांगितलं.

भविष्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत यावरही मोदींचं उत्तर

भविष्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण मानवी सभ्यतेचं पृथ्वीवरील भविष्य काय आहे? असा सवाल लेक्स यांनी विचारला. त्यावरही मोदींनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. “मी स्वभावानेच आशावादी आहे. निराशावाद आणि नकारात्मकता माझ्या आसपासही येत नाही. त्यामुळे हे सर्व माझ्या डोक्यात येत नाही. जर आपण मानव जातीचा इतिहास पाहिला तर असंख्य संकटाना पार करून मानव जात पुढे आली आहे. काळानुसार बदल स्वीकार केला आहे. प्रत्येक युगात मानवाने नव्या गोष्टी स्वीकारण्याचं औदार्य दाखवलं आहे”, असं मोदी म्हणाले.