कोल्हापूर : अहिनकुल नाते असलेले कागल मधील अजित पवार गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शाहू उद्योग समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या कागल, मुरगुड नगरपालिकेसाठी एकत्र येण्याच्या निर्णयाने तालुक्यातच निर्णय तर जिल्ह्यात राजकीय वादळ घोंघावत आहे. समरजित घाटगे यांना पुणे पदवीधर मतदारसंघात निवडून आणून विधिमंडळात पाठवण्याच्या हालचाली यामागे असल्याचे सांगितले जाते. यातून हसन मुश्रीफ यांना पुत्र नविद यांस कागल विधानसभा निवडणूक मतदार संघातून निवडून आणणे सोपे जाणार असून स्वत: मुश्रीफ लोकसभा निवडणुकीला उभे राहून दिल्ली गाठण्याचे स्वप्न साकारण्याची रणनीती असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कागल तालुका आणि विधानसभेचे राजकारण नेहमीच वादळी ठरले आहे. या मतदारसंघातील दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यातील दोन दशकाच्या संघर्षाने राजकीय राळ उठली होती. हसन मुश्रीफ आणि विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यातील राजकीय तानेबाणेही चांगले चर्चेत आले होते. विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांची साथ सोडून कागल मतदारसंघात स्वतंत्र अस्तित्व दाखवायला सुरुवात केली.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर घाटगे यांनी मतदारसंघाची चांगली बांधणी केली. परंतु विधानसभा निवडणुकीला उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात पहिल्यांदा अपक्ष म्हणून लढत दिली. तर गेल्यावेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मते आजमावल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली. दोनदा अपयश आले असले तरी घाटगे यांनी तिसऱ्या निवडणुकीसाठी तयारी चालूच ठेवली.
कागल तालुक्यातील हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष कालपर्यंत भलताच चर्चेत होता. तथापि काल सायंकाळी हसन मुश्रीफ व समरजित घाटगे या दोघांनी कागल व मुरगुड नगरपालिकेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दोघांच्याही कार्यकर्त्यांची झोप उडवणारा ठरला. आहोत. गेली अनेक वर्ष दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांचे तोंडही पाहत नव्हते. नव्या राजकीय सोयरिकीतून या तालुक्यातील सेनेचे माजी खासदार संजय मंडलिक व भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार संजय घाटगे यांना चांगलाच धक्का बसला आहे.
मुश्रीफ व घाटगे यांची राजकीय जवळीक दोन नगरपालिकांपुरती असल्याचे दिसत असले तरी त्यामागे मोठ्या राजकीय खलबती असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांची चर्चा झाली. त्यातून या दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. पण याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काहीच माहिती नसल्याचे सांगितले जाते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हसन मुश्रीफ यांना अधिक वरचे स्थान देण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपाने मुश्रीफ यांचा चेहरा पुढे करून मुस्लिम मते मिळवण्याची रणनीती आखलेली आहे.
त्याचबरोबर मुश्रीफ यांचा कागल विधानसभेचा पारंपारिक संघर्ष थांबवण्यासाठी समरजित घाटगे यांना पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समरजित घाटगे हे एकदा का विधिमंडळात पोचले की पुढे कागलमध्ये मुश्रीफ यांच्यासमोर तगडा प्रतिस्पर्धी उरणार नाही. त्यामुळे येथून पुत्र नवीद मुश्रीफ यांना निवडून आणणे त्यांना शक्य होणार आहे. मुश्रीफ यांनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांना लोकसभा निवडणुकीत ही विजयी व्हायचे आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांना आपल्या बाजूला वळवल्याने मुश्रीफ यांचे दिल्ली दरबारी राजकारण करण्याचे स्वप्न साकार होणार आहेत.
दरम्यान समरजितसिंह घाटगे यांनी कोणतीही कल्पना न देता हसन मुश्रीफ यांच्याशी संधान साधल्याबद्दल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तर संजय मंडलिक यांनीही हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्या युतीवर टीकेचे आसूड ओढले आहेत.
