कोल्हापूर : कोल्हापुरात जिल्हा शिवसेनाप्रमुख पदाच्या संभाव्य नियुक्तीपदावरून कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. संजय पवार यांच्याकडे उप नेते जिल्हाप्रमुख पद असताना आता जिल्हाप्रमुख पदासाठी युवा सेना जिल्हा अधिकारी जिल्हाधिकारी हर्षल सुर्वे, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांनी दावा केला करीत एकापरीने पवार यांना आव्हान दिले आहे. यातून ठाकरे शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण रंगल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पदाधिकारी पदावर अनेक वर्षापासून आहेत. वर्षभरापूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी पक्ष नेतृत्वावर टीका करीत पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर हातकणंगले व शाहूवाडी विधानसभा मतदारसंघासाठी संजय चौगुले तर इचलकरंजी, शिरोळ तालुक्यासाठी वैभव उगळे यांची निवड करण्यात आली होती.

बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त मुंबईमध्ये राज्यभरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्याचे संकेत देण्यात आले. त्याचा आधार घेऊन आता जिल्ह्यांमध्ये नव्या इच्छुकांनी पदासाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यांमध्ये दीर्घ काळापासून पदावर पदाधिकारी बदलावेत अशी मागणी ही अधून मधून होत होती. तथापि संपर्कप्रमुखांचा आशीर्वाद आणि मातोश्रीशी असलेले संबंध यामुळे बदल होत नव्हता. आता मातोश्री बदलूनच भाकरी फिरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याने इच्छुकांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत.

त्यातूनच कोल्हापूरमध्ये जिल्हाप्रमुख पदासाठी आतापासूनच इच्छुकांनी कंबर कसली आहे. त्यामध्ये दोन नावे प्रामुख्याने आघाडीवर दिसत आहेत. हर्षल सुर्वे यांनी युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. रायगड जिल्ह्याची जबाबदारी ही त्यांनी निभावली आहे. करोना टाळेबंदी काळात त्यांनी केलेले मदत कार्य उल्लेखनीय ठरले होते. १९ वर्ष त्यांनी शिवसेनेचे निष्ठा पूर्व काम केले आहे. संजय पवार यांच्या जवळचे म्हणून हर्षल सुर्वे ओळखले जातात. दुसरीकडे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनीही या पदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. शेकाप मधून सुरुवात केलेले इंगवले हे मधल्या काळात जिल्ह्यातून हद्दपार होते. त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश करताना आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत कार्य केले. क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेचे वाट धरल्यानंतर त्यांच्यात व इंगवले यांच्यात तेढ निर्माण झाले. दोघांमध्ये वाद चांगलाच रंगला होता. तर आता इंगवले यांनी पवार यांच्या जिल्हाप्रमुख जागेवर नजर ठेवली असल्याने या दोघांमध्ये कसे संबंध राहतात यावरही बरेच अवलंबून आहे. एकंदरीतच जिल्हाप्रमुख पदाबद्दल होणार होणार का आणि झाला तर कोणाला संधी मिळणार, कोणाचे पंख कापले जाणार याकडे लक्ष लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.