Prashant Kishor on Nitish Kumar Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराला वेग दिला आहे. राज्यात सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून काँग्रेसप्रणीत महाआघाडी विरोधी पक्षात आहे. गेल्या अनेक दशकांपासून या दोन्ही आघाड्यांमध्येच निवडणुकीची लढत पाहायला मिळत होती. यंदा मात्र प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तिरंगी लढत होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कुणाची सरशी होणार याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागून आहे. यापार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी ‘न्यूज १८’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. ते नेमके काय म्हणाले? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेत बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. तब्बल पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यात ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर १४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या निवडणुकीनंतर बिहारच्या राजकारणातील एका युगाचा अंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि पाचवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले जात आहे.
बिहार निवडणुकीबाबत प्रशांत किशोर काय म्हणाले?
आमचा पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मोठा प्रभाव टाकणार असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत केला. इतकेच नाही तर निवडणुकीनंतर नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, असे भाकितही त्यांनी यावेळी केले. “गेल्या ३५ वर्षांपासून विविध राजकीय पक्षांनी बिहारची सत्ता उपभोगली आहे. आता राज्यातील लोकांना परिवर्तन हवे आहे. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्याऐवजी बिहारमधील जनतेला नवीन नेतृत्व हवे आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. त्याशिवाय स्थलांतराचे प्रमाण वाढल्याने मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे”, असे प्रशांत किशोर म्हणाले.
जन सुराज्य पार्टीमुळे महाआघाडीचे नुकसान?
प्रशांत किशोर यांच्या पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप महाआघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. जन सुराज्य पार्टी मुस्लीम मतांचे विभाजन करून निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अप्रत्यक्ष मदत करणार असल्याचा दावाही विरोधी पक्ष करीत आहेत. त्याबाबत प्रशांत किशोर यांना प्रश्न विचारला असता, “राजकीय पक्ष घाबरले असून जाणून बुजून आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यावरून असे दिसून येते की आमचा पक्ष हा चांगल्या मार्गावर आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही २४३ जागांवर उमेदवार देणार आहोत. आमच्या पक्षाच्या तत्वांनुसार, कुठलाही जातीयवाद न करता प्रत्येक समुदायातील उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी दिली जाईल”, असे उत्तर प्रशांत किशोर यांनी दिले. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाही या निवडणुकीत मोठे नुकसान सहन करावे लागेल, असा दावाही त्यांनी केला.
जन सुराज पक्षाला किती जागांवर यश मिळणार?
विधानसभा निवडणुकीत जन सुराज पक्षाला नेमक्या किती जागांवर यश मिळणार? असा प्रश्न प्रशांत किशोर यांना ‘न्यूज १८’ च्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “आम्ही २४३ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. त्यापैकी बऱ्याच जागांवर आम्हाला विजय मिळण्याची आशा आहे. एकतर पक्षाला मोठे राजकीय यश मिळेल, नाहीतर आमचे १० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले. लालू प्रसाद यादव यांनी महाआघाडीत सामील होण्याची ऑफर दिली तर तुमचा काय प्रतिसाद असणार? असाही प्रश्नही यावेळी प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला. त्यावर, “आम्ही कोणाबरोबरही युती करणार नाही. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि आरजेडीप्रणीत महाआघाडी हे आमचे राजकीय विरोधक आहे. निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. केवळ यंदाच नव्हे तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही कुणाबरोबरच युती करणार नाही”, असे उत्तर प्रशांत किशोर यांनी दिले.
नितीश कुमार यांचा पक्ष किती जागा जिंकणार?
राज्यात सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे नितीश कुमार यांच्या हाती आहेत. यंदाची विधानसभा निवडणुकही त्यांच्याच नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत जनता दल युनायडेटला किती जागा जिंकण्यात यश मिळू शकते, असा प्रश्न प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “नितीश कुमार यांच्या पक्षाला २५ पेक्षा जास्त जागांवर यश मिळणार नाही. तसे झाल्यास मी राजकारण सोडून देईल. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी बिहारच्या मतदारांनी नितीश यांच्यावर विश्वास दाखवला होता, पण यावेळी मतदार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही”, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. इतकेच नाही तर नितीश कुमार हे यापुढे मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, असे भाकितही त्यांनी केले आहे.
महाआघाडीबाबत प्रशांत किशोर यांना काय वाटते?
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा काढली होती. या यात्रेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याबाबत प्रशांत किशोर यांना विचारले असता, “राहुल गांधी यांचा बिहारच्या राजकारणात जास्त प्रभाव नाही. लालू प्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष हा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा घटकपक्ष आहेत. त्यांनी जेवढ्या जागा दिल्या, तेवढ्याच काँग्रेसला लढवाव्या लागतील. यापूर्वी लालू प्रसाद यादव हेच राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणत होते. त्यांचा निवडणूक खर्चही करीत होते. मात्र, तेजस्वी यांनी महाआघाडीची सूत्रे हाती घेतल्यापासून सर्वकाही बदलले आहे. आरजेडीला या निवडणुकीत समाधानकारक यश मिळेल असे वाटत असले तरी काँग्रेसचा सुपडासाफ होऊ शकतो”, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला.