पुणे : माजी आमदार, शिवसेना (शिंदे) पक्षाचे पुणे शहराचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ‘लक्ष्य’ केले असताना मोहोळ हे एकाकी आणि सत्ताधारी भाजपचे नेते गप्प..असे चित्र निर्माण झाले आहे. मोहोळ हे पुण्यातील प्रभावी नेते असून, त्यांच्या बाजूने उभे राहात धंगेकर यांच्याविरोधात रान उठवण्याऐवजी भाजपने मात्र बचावात्मक पवित्रा घेतला असल्याने यामागील ‘करता करविता’ कोण? याचीच चर्चा सध्या पुण्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळत एकमेकांवर टीका-टीप्पणी करू नका, असा आदेश दिल्यानंतरच पुण्यात भाजप-शिवसेना (शिंदे) पक्षात जुंपली आहे. माजी आमदार धंगेकर यांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीवरून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मोहोळ यांच्यावर जाहीर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धंगेकर यांना समज दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुण्यात ‘मिशन १२५’चा नारा देतानाच महायुतीतील मित्रपक्षावर टीका करू नका, असा आदेशही दिला. मात्र, त्यानंतर धंगेकर आणि मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ हे पुण्यातील जनसंपर्क असलेले प्रभावी नेते आहेत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरही त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष या महत्त्वाच्या पदांबरोबर खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री पद असा त्यांचा अल्पावधीतच राजकीय प्रवास जोमाने झाला आहे. त्यांची लोकप्रियता पाहून विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेपर्यंत पोहोचले. अर्थात त्यामध्ये तथ्य नसल्याचे भाजपकडून लगेचच स्पष्ट करण्यात आले. मोहोळ यांच्या राजकीय प्रवासाचा वेग भाजपच्याच काही नेत्यांच्या पचनी पडलेला नसल्याचे सांगण्यात येते. धंगेकर हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोहोळ यांच्यावर एकेक आरोप करत असताना भाजपचे काही मोजके स्थानिक नेते वगळता अन्य पदाधिकारी हे गप्प बसले असल्याचे दिसून येते.
शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे मोहोळ यांच्याबाजूने उघडपणे बोलले आहे. अन्य भाजपचे नेते सध्या बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. धंगेकर हे जैन बोर्डिंग प्रकरणावरून मोहोळ यांच्यावर आरोप करत आहेत. मोहोळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. संबंंधित बांधकाम व्यावसायिकापासून ते विभक्त झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता धंगेकर यांनी वैयक्तिक पातळीवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. महापौर असताना मोहोळ हे जैन बोर्डिंग प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकाचे वाहन वापरत होते, असाही आरोप केला. त्यावर महापालिकेच्या वाहनाऐवजी स्वत:ची गाडी वापरणारा पुणे शहरातील पहिला महापौर होतो, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. धंगेकर यांच्या प्रत्येक आरोपाचे मोहोळ हे स्वत: खंडन करत आहेत. धंगेकर हे वैयक्तिक पातळीवर टीका करत असताना भाजपचे स्थानिक नेते मात्र अद्यापही बघ्याच्या भूमिकेत असल्याने मोहोळ हे एकाकी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे यामागील ‘करता करविता’ कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
धंगेकर यांना ‘अभय’?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यानंतरही माजी आमदार रवींद धंगेकर यांनी महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करणे थांबविले नसल्याने धंगेकर यांना पक्षातूनच ‘अभय’ असल्याचे सांगण्यात येते. धंगेकर यांची हकालपट्टी होणार, अशी आशयाच्या पोस्ट प्रसारित होत असताना धंगेकर यांनी ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर कारवाई केलेली नाही. त्यांचे नेहमी पाठबळ राहील,’ असे स्पष्ट केले आहे.
