Arvind Kejriwal AAP on Rahul Gandhi : लेहमध्ये बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. यादरम्यान आम आदमी पार्टीने शनिवारी (तारीख २७ सप्टेंबर) आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमुळे राजकीय वाद निर्माण झाला असून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. आम आदमी पार्टीकडूनही त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जात असल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वांगचुक यांच्या अटकेवर केजरीवाल काय म्हणाले?

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एक पोस्ट शेअर करीत भाजपावर टीकास्त्र सोडले. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हुकूमशहा म्हणून उल्लेख केला. “रावणाचा आणि कंसाचा जसा अंत झाला, तसाच अंत हिटलर आणि मुसोलिनी यांचाही झाला होता. आज लोक त्या सर्वांचा द्वेष करतात. सध्या आपल्या देशात हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. हुकूमशाही आणि अहंकार बाळगणाऱ्यांचा शेवट खूपच वाईट होणार,” असे केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

संजय सिंह यांचीही मोदी सरकारवर टीका

सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी मोदी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. “मोदी सरकार देशद्रोही असून वांगचुक हे देशभक्त आहेत. एनएसए अंतर्गत वांगचुक यांना अटक करणे हे हुकूमशाही आणि हिटलरशाहीचे प्रतीक आहे. गांधीवादी पद्धतीने सोनम वांगचुक लडाख आणि कारगिलला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत होते. मोदी सरकार मानसिक दिवाळखोरीला बळी पडले आहे. वांगचुक यांना अटक करणे ही त्यांची मोठी चूक आहे. लडाखमधील लोकांना निषेध करण्यापासून रोखल्याने मोठे जनआंदोलन होईल,” असा इशारा सिंह यांनी दिला.

आम आदमी पार्टीच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

आम आदमी पार्टीने शनिवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “देशाचे प्रख्यात समाजसेवक आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा खोटा खटला दाखल करून मोदींच्या हुकूमशाही सरकारने त्यांना तुरुंगात टाकले आहे. देशाचे तथाकथित विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र या घटनेवर मौन बाळगले आहे. यापूर्वी भाजपा सरकारच्या भारत–पाकिस्तान सामना आयोजित करण्याच्या निर्णयावरदेखील राहुल गांधींनी मौन बाळगले होते,” अशी टीका आपने या पोस्टमधून केली.

राहुल गांधी भाजपाचे एजंट आहेत का? आपचा सवाल

“राहुल गांधी हे केवळ काही मोजक्याच मुद्द्यांवर भाजपाला विरोध करतात; पण ज्या मुद्द्यांवरून जनतेमध्ये भाजपाविरोधी देशव्यापी लाट उसळलेली असते तिथे ते गायब होतात हे आता जगजाहीर झाले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली किती विमाने पाडली हे विचारणारे राहुल गांधी आता सोनम वांगचुक यांच्या अटकेवर गप्प का आहेत? राहुल गांधी हे भाजपाचे एजंट आहेत का?” असा प्रश्नही या पोस्टमधून विचारण्यात आला. विशेष बाब म्हणजे, आपने या पोस्टबरोबर संसदेतील एक जुना फोटोही शेअर केला. या फोटोमध्ये राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेताना दिसून येत आहेत. सदरील फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होताच काँग्रेसचे नेते आक्रमक झाले.

‘आप’च्या टीकेला काँग्रेसचं प्रत्युत्तर

आम आदमी पार्टीने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या ‘भाजपाचा एजंट’ टीकेला काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी सणसणीत उत्तर दिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आपच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका खेरा यांनी केली. “दिल्ली निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीचा थोडाफार शिल्लक असलेला मानसिक तोलही ढासळला आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्या पक्षाची बिकट अवस्था झाली आहे. सर्वांनी ‘आप’साठी दोन मिनिटांचे मौन पाळावे,” अशी उपरोधिक टिप्पणी पवन खेरा यांनी केली, तर राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याआधी आम आदमी पार्टीने आत्मपरीक्षण करावे, असा टोला काँग्रेसच्या एका नेत्याने अरविंद केजरीवाल यांना लगावला.

अरविंद केजरीवाल यांनीही केली होती टीका

दरम्यान, महिनाभरापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला होता. सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात ‘साठगाठ’ असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जर असे नसते, तर नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला अटक झाली असती असे ते म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युती होती. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवत स्वबळावर सत्तास्थापना केली आणि आम आदमी पार्टीला पराभवाच्या छायेत ढकलले, तेव्हापासून काँग्रेस आणि आपच्या नेत्यांमध्ये कटूता आल्याचे सांगितले जाते. काँग्रेसबरोबरच्या वाढत्या तणावामुळे आम आदमी पार्टीने जुलै महिन्यात इंडिया आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

सोनम वांगचुक यांच्या अटकेवर राहुल गांधी काय म्हणाले?

दरम्यान, सोनम वांगचुक यांना बुधवारी (तारीख २४ सप्टेंबर) अटक झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी रविवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लडाखमधील लोकांवर त्यांच्या संस्कृती आणि परंपरेवर हल्ला केला जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला. “लडाखमधील जनतेने आपला आवाज उठवला, त्याला उत्तर म्हणून भाजपाने चार तरुणांना ठार मारले आणि सोनम वांगचुक यांना तुरुंगात टाकले. हत्या थांबवा, हिंसाचार थांबवा, धमकावणे थांबवा आणि लडाखमधील जनतेची मागणी मान्य करा,” असे राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.