Mahagathbandhan Face Bihar देशात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगानेही याअंतर्गत तयारी सुरू केली आहे. राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. एनडीएने पुन्हा एकदा नितीश कुमारच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील हे स्पष्ट केले आहे.
परंतु, महागठबंधन अजूनही अनेक गोष्टींवर अडले आहे आणि त्यांच्यात अजूनही अनेक निर्णयांबाबत अनिश्चितता आहे. महागठबंधन चा चेहरा कोण असेल? २०२० मध्ये युतीला सत्तेत आणणाऱ्या आरजेडीच्या तेजस्वी यादव यांना संधी दिली जाईल की काँग्रेस पक्ष राहुल गांधींनाच महागठबंधनचा चेहरा करतील, यावर आता वाद सुरू झाला आहे. नेमका हा वाद काय? महागठबंधनचा चेहरा नक्की कोण असेल? त्याविषयी जाणून घेऊयात.

प्रकरण काय?
- आरजेडी, काँग्रेस, डावे पक्ष, व्हीआयपी आणि इतरांचा समावेश असलेल्या महागठबंधनचा चेहरा कोण असेल, यावरून पक्षांमध्ये मतमतांतर असल्याचे पाहायला मिळत आहे.
- युतीतील प्रमुख पक्ष असलेल्या आरजेडीने आधीच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
- तेजस्वी यादव यांनीदेखील आपली महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाही. या वर्षी एप्रिलमध्ये पाटण्यातील भव्य ‘मुशर-भुईया महारॅली’ दरम्यान बोलताना तेजस्वी यांनी सार्वजनिकरित्या या पदासाठी आपण योग्य असल्याचे म्हटले.
२०२० च्या निवडणुकीत तेजस्वी यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. या निवडणुकीत आरजेडीने ७५ जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून नोकऱ्या आणि शिक्षणासारख्या मुद्द्यांवरून ते नितीश सरकारला लक्ष्य करत आले आहेत आणि त्यांची लोकप्रियताही वाढली आहे. विशेषतः तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता अधिक आहे. बिहारच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या यादव-मुस्लीम मतपेढीतही ते केंद्रस्थानी आहेत. अनेक सर्वेक्षणांमध्ये त्यांना नितीश कुमार यांच्यानंतर सर्वात पसंतीचे मुख्यमंत्री म्हणून स्थान दिले आहे.
वादविवादाचे कारण काय?
काँग्रेसचा असा विश्वास आहे की, जरी नितीश कुमार मुख्यमंत्री असले तरी एनडीए मोदींवर जास्त अवलंबून आहे. तशाच चेहऱ्याची आवश्यकता विरोधकांनाही आहे आणि तो चेहरा राहुल गांधी असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. बिहारमध्ये राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यांनी बिहारमध्ये अनेक सभा घेतल्या आहेत, मतदार यादीतील सुधारणांविरुद्ध ९ जुलै रोजी झालेल्या बिहार बंदसारख्या प्रमुख निषेधांमध्ये ते सहभागी झाले आहेत आणि ते तेजस्वी यादवांबरोबर एकाच व्यासपीठावरदेखील दिसले आहेत. भारत जोडो आणि न्याय यात्रेनंतर ते राष्ट्रीय विरोधी पक्षाचे केंद्रीय व्यक्तिमत्त्व ठरले आहेत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नव्हे तर महागठबंधनचा चेहरा म्हणून निवडणूक लढवावी, असे काँग्रेसचे सांगणे आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, यामुळे धर्मनिरपेक्ष मते एकत्र येतील आणि युतीला त्याचा फायदा होईल.
महागठबंधनमध्ये जागावाटपावरून वाद?
मुख्य म्हणजे महागठबंधनमध्ये जागावाटपावरूनदेखील तणाव निर्माण होत आहे. काँग्रेसला यावेळी अधिक जागा हव्या आहेत, परंतु २०२० च्या यशाने आणि आरजेडीच्या वर्चस्वामुळे जागावाटपासाठी तेजस्वी यादव फारसे उदार होणार नाहीत. परंतु, सूत्रांचे असे सांगणे आहे की, बिहारमधील त्यांच्या कमकुवत स्थितीची जाणीव असलेली काँग्रेस दबावाचे राजकारण करत आहे. कन्हैया कुमार आणि पप्पू यादव यांसारख्या प्रभावशाली पण ध्रुवीकरण करणाऱ्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे आघाडीतील अंतर्गत द्वंद्व दिसून येत आहेत.
जूनमध्ये काँग्रेसचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांचा चेहरा सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून एकमताने ठरवला जाईल. ते विधानच पुरेसे होते की, तेजस्वी यादव यांना स्पष्ट मान्यता मिळणे अद्यापही अशक्य आहे. त्यामुळे आता महागठबंधनमधील जागावाटपाचे गणित बघता हे स्पष्ट आहे की, त्यांचे अद्याप एका चेहऱ्यावर एकमत झालेले नाही. एनडीए आपल्या नेतृत्वाबाबत आधीपासून स्पष्ट असल्याने याचा निवडणुकीत त्यांना फायदा होऊ शकतो, तर महागठबंधनसाठी यामुळे अनेक आव्हाने निर्माण होऊ शकतात.